महाभारताच्या
कथेमध्ये जादूच्या तलावाच्या शेजारी बेशुद्ध पडलेल्या आपल्या चार भावांकडे पाहत
असलेल्या युधिष्ठिराला यक्षाने विचारले होते की, सर्वात
मोठे आश्चर्य काय आहे? युधिष्ठिराने उत्तर दिले की,प्रत्येक
माणसाला हे माहित असते की, त्याचा मृत्यू हा निश्चित आहे मात्र तरीही
प्रत्येक जण असा जगतो जस त्याचा मृत्यू हा कधीच येणार नाही. आपल्या जन्मासोबतच
मृत्यूसुद्धा निश्चित झालेला असतो. जीवन आपल्या मृत्यूला पूढे ढकलत असते. आपण
वाढदिवसाला शुभेच्छा देतो मात्र गुरु रविंद्रनाथ टागोर यांनी म्हटले होते की,वाढदिवसाच्या शुभेच्छा कशासाठी? आयुष्य तर एका वर्षांनी घटले आहे.
भगवान गौतम
बुद्धांना सुद्धा बालपणीच ज्ञात झाले होते की, म्हातारपण येते
त्यासोबत आजारपण येते आणि मृत्यू सुद्धा होतो.मृत्यू पासून कितीही दूर पळा तो
कोणालाही टळलेला नाही. एका इराकी कथेनूसार बगदाद मध्ये एक व्यक्ती घराबाहेर पडली
आणि त्याला वाटेतील एका चौकात आपला मृत्यू उभा असलेला दिसला. तो पळत घरी परत आला
आणि आपल्या मालकाला म्हणाला की, माझा मृत्यू मी
चौकात उभा असलेला पाहिला आहे. आपण मला आपला घोडा दयावा जेणेकरून मला समाराला पळून
जाता येईल. मालकाने त्याला घोडा देवून टाकला. काही वेळानंतर मालकही आपल्या घराबाहेर
पडला आणि त्याला सुद्धा तोच मृत्यू उभा असलेला दिसला. मालकाने विचारले, तू माझ्या नौकराला का घाबरवले? मृत्यूने उत्तर
दिले की, मी सुद्धा त्याला पाहून हैराण होतो की, तो इथे काय करित आहे? त्याची आणि माझी भेट तर चार तासानंतर समारा मध्ये
होणार होती.
सर्वोच्च
न्यायालयाच्या पाच न्यायाधिशांच्या संविधान पिठाने इच्छा मृत्यूवर काही अटींसह
मोहर लावली आहे. ही मोहर जीवन आणि मृत्यूच्या दार्शनिक संबंध वा फक्त मृत्यूच्या
अपरिहार्यतेवरच नाही तर समाजात वृद्धांच्या एकाकीपण आणि आजारपणामुळे निर्माण
झालेल्या सामाजिक संकटाकडे गांभिर्याने दिलेले लक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाने
इच्छा मृत्यूच्या बाबतीत जो निर्णय दिला आहे तो खरोखरच ऐतिहासिक आहे. या निर्णयाचे
निश्चितच दूरगामी परिणाम होतील.सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की,घटनेत जसा प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला
आहे तसा मरण्याचाही अधिकार आहे. घटनेच्या परिशिष्ट-२१ मध्ये याचा उल्लेख आहे.या
संदर्भात सरकारला लवकरात लवकर कायदा करायला हवा.सोबतच आत्महत्येच्या प्रयत्नाला
गुन्हा समजले जावू नये.
इच्छा मृत्यूची बाब अरुणा
शानबाग मुळे चर्चेत आली जी एका घटनेमुळे गेली ४२ वर्षे कोमात आहे. मुंबईच्या किंग
एडवर्ड महाविदयालयाच्या परिचारिका एखादया मैत्रीणीसारख तिची या ४२ वर्षात काळजी
घेत आहेत. बाहेरच्या काही लोकांनी तिच्या इच्छा मृत्यूची मागणी लावून धरली होती
याउलट काही लोकांनी तिच्या जीवनासाठी लढाई लढली. न्यायालयाने तिचे जीवन सन्मानजनक
बनवण्यासाठीच्या प्रत्नांचा सन्मान केला होता त्यामुळेच इच्छा मृत्यूची काळी सावली
आपली शुद्ध हरवलेल्या या अजाण जीवावर गेल्या ४० वर्षात पडू दिली नव्हती.
आता वाढता तणाव
प्रत्येकाला एकाकी करत आहे.कुटुंब विभक्त होत आहेत. मुलं कुटुंबापासून दूर
आहेत. आई-वडिल एकटे आहेत.फ्लॅट मध्ये कटणा-या जीवनात म्हातारपण एका नाईलाज आजारात
बदलून जाते. एक छोट्या मात्र क्रुर प्रक्रियेचे आपण सर्व भागिदार होत चाललो आहोत. अशा
अवस्थेत जगणे असाहय होवून जाते. मग केवळ मृत्यूची वाट पहावी लागते आणि
नैसर्गिकरित्या तो काही लवकर येता येत नाही अशांना इच्छा मृत्यू हा सन्मानजनक
मृत्यूचा पर्याय बनेल.
दूसरी बाब म्हणजे
अनेकदा डॉक्टरला माहित असते की,पेशंट वाचणार
नाही. त्याच्या आजारामुळे त्याचा मृत्यू निश्चित आहे. तरीही डॉक्टर हे सांगण्यास
धजावत नाहीत की,पेशंटचा मेडीकल सपोर्ट काढला पाहिजे. खरंतर अशा
स्थितीत पेशंटचा मेडीकल सपोर्ट काढणेच पेशंटसाठी योग्य ठरते मात्र डॉक्टरला
पेशंटचे नातेवाईक त्यांच्या विरोधात तक्रार करतील याची भीती असते. पेशंटचा मृत्यू
निश्चित आहे हे माहित असुनही वैद्यकीय उपचारांच्या साहयाने त्याचा मृत्यू काही
कालावधीसाठी टाळला जातो याचा त्रास पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांनाही
होतो. त्यांचे लाखो रुपये उपचाराच्या नावावर खर्च होतात आणि काही दिवसानंतर पेशंट
दम तोडतो. अशात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर स्थिती बदलेल.
सर्वोच्च
न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, प्रत्येक व्यक्तीला
आत्मसन्मानाने जगण्याचा आणि मरण्याचा अधिकार आहे आणि हा जीवनाचा भाग आहे.अशात
व्यक्तीला आता आपले इच्छा पत्र बनवून ठेवता येईल कारण जेंव्हा ती व्यक्ती गंभीर
आजारी पडेल आणि तिच्या वाचण्याची काहीच शक्यता नसल्यास मेडीकल सपोर्ट काढून
टाकण्यासाठी लेखी स्वरूपात मेडीकल बोर्डला सांगता येईल. सोबतच आत्महत्येच्या
प्रयत्नांकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. जर कोणी जीवनात त्रस्त असेल आणि
आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचत असेल तर तो गुन्हा ठरू नये. या बाबतीत मात्र
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींमध्ये एकमत नाही. सरकारने काही वर्षांपूर्वी या
बाबतीत कायदा करण्याचा विचार केला होता मात्र असा कायदा झालाच नाही.
असो इच्छा मृत्यू या
क्रुर प्रक्रीयेतून निघण्याचा एक दिर्घ श्वास घेण्यासारखा मार्ग आहे.सर्वोच्च न्यायालयाने जर इच्छा मृत्यूचा मार्ग
मोकळा करून दिला नसता तर वृद्धापकाळामुळे त्रस्त झालेल्या लोकांची निराशा आणखीनच
वाढली असती.
- सुरेश मंत्री.

Nice
उत्तर द्याहटवाThanks
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवा