"शिवाजी महाराज' हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर जपला. या मंत्राच्या साह्याने "वन्ही तो चेतवावा । चेतविता चेततो।' या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली. बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड पेरले. त्यांच्या प्रेरणेने अनेक शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले. ऐतिहासिक वस्तू, वास्तू आणि कागदपत्रे यांच्याकडे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहण्याची दृष्टी शिवशाहिरांनी दिली. अनेक अभ्यासक आणि संशोधकांना त्यातून प्रेरणा मिळाली. हुंदडणारी उत्साही तरुण मुले गडकोटांच्या भेटीला जाऊ लागली. बाबासाहेबांकडून तो तेजस्वी इतिहास समजावून घेऊ लागली. शिवचरित्राच्या अभ्यासाचे, संशोधनाचे, श्रवणाचे, दर्शनाचे, अध्यापनाचे एक नवे पर्व सुरू झाले. सनावळी आणि दप्तरांमधला इतिहास शिवशाहिरांनी ललितरम्य पद्धतीने अनेक पिढ्यांना ऐकवला. वाणी नव्हे खधार। की विजेचा लोळ चर्रर्र। करी शिवसृष्टीचा उच्चार। जणू घन गडगडती।। अशी बाबासाहेबांची तेजस्वी वाणी होती.
बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे असं त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यांचा जन्म जुलै १९२२ मध्ये झाला होता. पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड होतं. तरुणपणापासून ते पुण्यातच स्थायिक झाले. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या भक्तीचा विषय होते. सहाव्या वर्षांपासून वडिलांबरोबर त्यांनी किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास प्रारंभ केला. भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेतून कामाला सुरुवात केली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी त्यांनी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी विमानाने, मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला. रात्ररात्र दप्तरे चाळून शिवचरित्राची सामग्री मिळवली. शिवचरित्र लिहून तयार झाले; ते प्रकाशित करण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा पैसे जमवायला बाबासाहेबांनी मुंबईच्या भाजीबाजारात कोथिंबीरही विकली. या शिवगाथेची वाचकांनी अक्षरशः पारायणे केली. या शिवचरित्राचे कौतुक करताना आचार्य अत्रेंनी "मराठा'तल्या अग्रलेखात लिहिले "... हे शिवचरित्र गद्य आहे की, काव्य आहे, इतिहास आहे की नाट्य आहे, याचा शब्दागणिक भ्रम पडतो. हे अमर शिवचरित्र कालिदासाच्या कल्पनेने आणि भवभूतीच्या भावनेने लिहिणारा एक महाकवी, हे अमर शिवनाट्य शेक्सपीअरच्या ज्वलंत भावनेने लिहिणारा महान नाटककार या महाराष्ट्रात जन्माला यावा हे केवढे मोठे भाग्य ! '. बाबासाहेबांचे शिवचरित्रावर पहिले जाहीर व्याख्यान २५ डिसेंबर १९५४ रोजी नागपूर येथे झाले. तेव्हापासून "शिवचरित्रकथन' हा त्यांचा ध्यास निश्वास बनला. गेली ६६ वर्षे अव्याहतपणे बाबासाहेब व्याख्यानातून शिवचरित्र सांगत होते. भारतभर आणि देशाच्या सीमा ओलांडून बाबासाहेबांची परदेशातही शेकडो व्याख्याने झाली. अमेरिकेत एकेका दिवशी त्यांची पाच व्याख्याने झाली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. राजा शिवछत्रपती, पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. बाबासाहेबांचं सर्वात मोठं काम मानलं गेलं ते जाणता राजा हे महानाट्य. ते १९८५ मध्ये नाट्यमंचावर आलं. तेव्हापासून १२५० पेक्षा जास्त प्रयोग जाणता राजाचे झालेले आहेत. महाराष्ट्राच्या १६ जिल्ह्यांमध्ये जाणता राजाचे शो झाले. तसेच आग्रा, दिल्ली, भोपाळ, अमेरीका इथेही हे महानाट्य सादर केलं गेलं. जवळपास २०० कलाकार हा प्रयोग सादर करायचे. त्यात हत्ती, घोडे, उंट यांचाही समावेश असायचा. त्यामुळे स्टेजवर एका नाटकाचा प्रयोग होतो असं न वाटता प्रत्यक्षात छत्रपतींचा काळ उभा रहात असे. दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर त्याचे प्रयोग सुरु व्हायचे. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून २००७ साली त्यांना मध्य प्रदेश सरकारनं कालिदास सन्मान दिला. या नाटकाचे हिंदी आणि इंग्रजीसह इतर ५ भाषांमध्ये भाषांतरण झाले आहे. सर्व नाट्यविषयक संकल्पनांना ओलांडून जाणारे आणि संपूर्ण शिवचरित्र नाट्यरूपाने मांडणारे "जाणता राजा' हे बाबासाहेबांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले महानाट्य गेली पस्तीस वर्षे जगात गाजत आहे. या अपूर्व प्रयोगाने इतिहासाचे रोमांचकारी दर्शन घडविण्याबरोबरच नवा इतिहास निर्माण केला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना गेली अनेक दशके महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही शिवचरित्र नेण्याचे श्रेय त्यांना दिलं जातं. पण अनेक प्रसंगी त्यांना विरोध झाला आहे, त्यांच्या कामावर टीकाही झाली. २०१५ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना मिळू नये अशी मागणी देखील काही संघटनांनी केली होती. 'दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हा असत्य इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडला', हा त्यांच्यावरील मुख्य आक्षेप त्यावेळी होता. "बाबासाहेब पुरंदरे यांनी दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी भूमिका कुठेच घेतलेली नाही," असं भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य पांडुरंग बलकवडे सांगतात. त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर काही राजकीय पक्ष देखील समोरासमोर आले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या निवडीवर विरोध दर्शवला होता तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुरंदरे यांचं समर्थन केलं होतं. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या १० लाख रकमेपैकी फक्त १० पैसे स्वतःकडे ठेऊन त्यात १५ लाख स्वतःचे घालून ती रक्कम पुरंदरे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत म्हणून दिली होती. त्यानंतर २०१९ मध्ये पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
व्यासंग हीच त्यांची विश्रांती होती. वेळेबाबत ते तत्पर होते. अकारण कोणीही वेळ वाया घालवू नये यासाठी "कामे पडली अनंत। वेळ मात्र मर्यादित। म्हणोनि व्यर्थ गप्पांत। कालक्षेप न की जे।।' असा सुविचार त्यांनी घरात लावला होता. शिकण्याची अनिवार ओढ असलेली नानाविध जातिधर्माची मुले पुरंदरे वाड्यात राहून शिकली. समाजाला ते सतत देत राहिले. बाबासाहेबांचा गौरव करताना प्रा. शिवाजीराव भोसले म्हणाले होते, "बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था आहे हेच उमगत नाही. व्यक्ती म्हणावं तर तिचं कार्य महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. संस्था म्हणावं तर तिच्या कोठेही शाखा नाहीत. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक आणि संशोधक असले तरी ते स्वतःला इतिहासकार म्हणवून घेत नव्हते. त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटणारे लोक त्यांना "शिवशाहीर" म्हणतात, पण त्यापुढे जाऊन ते म्हणायचे की "मला काही म्हटलं नाही तरी चालेल. पण शिवचरित्र वाचा. बाबासाहेबांच्या निधानानंतर राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यासहीत इतर मान्यवरांचाही समावेश आहे.
- सुरेश मंत्री.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा