बजाज उद्योगाचा इतिहास राहुल बजाज यांच्या नावाला वगळून लिहिताच येणार नाही. पश्चिम बंगालमधील मारवाडी कुटुंबात १० जून १९३८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कमलनयन बजाज यांच्याकडून उद्योगाचा वारसा त्यांना मिळाला. सेंट स्टिफन्स कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात बीए केले. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चं शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या कुशल नेतृत्व शैलीने प्रतिकूल परिस्थितीत बजाज घराण्याचा व्यवसाय वाढवला. उमेदीच्या काळात त्यांनी बजाज इलेक्ट्रिकल कंपनीत तीन वर्षे काम केले. राहुल बजाज यांनी १९६४ मध्ये बजाज समूहाची सूत्रे हाती घेतली. १९६८ मध्ये बजाज ऑटोचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. राहुल बजाज यांनी ऑटो उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट काम केले. तीन दशकांपूर्वी मध्यमवर्गीय लोकांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी बजाज स्कूटर ची निर्मिती केली. या दुचाकीने मध्यवर्गीयांच्या स्वप्नांना पंख लावण्याचे काम केले. सर्वसामान्यांच्या वाहनविषयक गरज ओळखून स्कूटरपासून ते भन्नाट स्पोर्टस् बाईक बनवून सर्वसामान्यांच्या जीवनाला बजाज यांनी गती प्राप्त करून दिली. वर्षभराचे वेटींग असायचे तरीही लोकं पैसे भरुन ‘बजाज बुक’ केली असे अभिमानाने सांगायचे. बजाज ही केवळ कंपनी नव्हती तर सर्वसामान्यांसाठी ‘हमारा बजाज’ बनल्याचे ते द्योतक होते. या किमयेचे राहुल बजाज हेच जादुगार होते. त्यांच्या कारकिर्दीतील ‘एम फिप्टी’ आणि ‘एम एटी’ या दोन बाईकनी तर विक्रीचा विक्रम नोंदविला होता. त्यानंतर ही कंपनी वाढतच गेली. हमारा बजाज ही बजाज कंपनीची टॅग लाईन देशातील नागरिकांच्या मनात आजही घर करून आहे. बजाज उद्योग समुहाच्या दुचाकींना ग्राहकांची पहिली पसंती होती. नव्वदच्या दशकात जेव्हा भारतात उदारीकरण सुरू झाले आणि भारत खुल्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करू लागला. भारतीय दुचाकींना जपानी मोटरसायकल कंपन्यांकडून स्पर्धा मिळू लागली, तेव्हा राहुल बजाज यांनी कंपनीला पुढे नेले. त्यांच्या नेतृत्वाखाली ३० वर्षांत बजाज ऑटोने नेत्रदीपक प्रगती केली. बजाज ग्रुपची प्रमुख कंपनी बजाज ऑटोची उलाढाल ७.२ कोटी रुपये होती, जी आज १२,००० कोटी रुपये झाली आहे. बजाजने दुचाकी विक्रीत देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे. तिच्या उत्पादनांचा पोर्टफोलिओही वाढला आहे. राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखालीच त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळाले. बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष या नात्याने राहुल बजाज यांनी गेली ४० वर्षे आपल्या कुटुंबीयांचा समृद्ध वारसा सांभाळला. प्रदीर्घ काळ बजाज ऑटोसोबत काम केल्यानंतर त्यांनी मोठ्या विश्वासाने २००५ साली सुपुत्र राजीव बजाज यांच्याकडे उद्योगाची धुरा सोपवली होती. २००८ मध्ये त्यांनी बजाज ऑटोचे तीन युनिट्समध्ये विभाजन केले. यामध्ये बजाज ऑटो, फायनान्स कंपनी बजाज फिनसर्व्ह आणि होल्डिंग कंपनीचा समावेश आहे. प्रकृती अस्वास्थ्य आणि वृद्धापकाळामुळे त्यांनी गेल्यावर्षीच अध्यक्षपद सोडले होते.
राहुल उत्कृष्ट संभाषणकार तर होतेच सोबत आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जात. कोणत्याही पक्षाचे सरकार असो ते त्यांच्या बाबत स्पष्ट शब्दात मत नोंदवायचे. राहुल बजाज हे केवळ उद्योजक नव्हते तर ते समाजकार्यासाठीही अनेकदा मदत करायचे. व्यवसायाच्या पलीकडे, त्यांना समाजसेवेची आवड होती. स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. उद्योग क्षेत्रात कार्यरत असूनही राहुल बजाज यांनी आयुष्यभर सामाजिक भान जपले. त्यांच्या दातृत्वाच्या गुणामुळे अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध राहिले. २०२० साली त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बजाज समुहाच्यावतीने १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. विशेष म्हणजे २०२० मध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशात पहिल्यांदाच लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच बजाज यांनी सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत ही घोषणा केली होती. “आम्ही आमच्या समुहाच्या २०० स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सरकारबरोबर काम करत असून ज्यांना मदतीची सर्वाधिक गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यासाठी आम्ही काम करु,” असा विश्वास बजाज समुहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी ही मदत जाहीर करताना व्यक्त केला होता.
आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात राहुल बजाज यांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राहुल यांना आयआयटी रुरकीसह सात विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलं आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलकडून 'माजी विद्यार्थी'चा विशेष पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी 'नाइट इन द ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर' म्हणून नियुक्ती केली होती तसेच भारत सरकारने राहुल बजाज यांची १९७५ ते १९७७ या कालावधीत ऑटोमोबाईल्स अँड अलाईड इंडस्ट्रीज विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. सन १९७५ मध्ये 'राष्ट्रीय गुणवत्ता हमी' या संस्थेने 'मॅन ऑफ द इयर' या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. १९९० मध्ये राहुल बजाज यांना 'बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन'च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'प्रिन्स ऑफ वेल्स'ने राहुल बजाज यांना फेब्रुवारी १९९२ मध्ये 'प्रिन्स ऑफ वेल्स इंटरनॅशनल बिझनेस लीडर्स फोरम'चे सदस्य बनवले होते. १९९६ मध्ये एफआयई फाऊंडेशनने राहुल बजाज यांना राष्ट्रभूषण पुरस्काराने गौरविले होते. २००० साली राहुल बजाज यांना लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्टने टिळक पुरस्काराने सन्मानित केले होते. २००१ मध्ये बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. २००६ ते २०१० या कालावधीत ते राज्यसभा सदस्य होते. त्यांच्या जाण्याने उद्योग क्षेत्रासह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे.
-सुरेश मंत्री .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा