आज २९ अॉगस्ट हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ह्याच दिवशी भारताचे राष्ट्रपती खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करतात. आज संपूर्ण देश हॉकीच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आठवण काढत आहे. ब्रिटीशांच्या राजवटीत गुलामांचे जीणे जगणाऱ्या भारताला जगज्जेतेपदाच्या सिंहासनावर बसवणारे मेजर ध्यानचंद यांची कर्तबगारी कोणत्याही अव्वल देशभक्तापेक्षा कमी नव्हती. १९२८, ३२ व ३६ या पाठोपाठच्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीतील सुवर्ण पदकांची हॅट्ट्रिक भारताने साजरी केली, त्यात मेजर ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता. त्या तीन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या १०१ गोलापैकी ३८ गोल तर चक्क ध्यानचंदने लगावलेले. हॉकीतील या जादूगाराविषयी लिहावं-बोलावं तितकं थोडकच.
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे २९ ऑगस्ट १९०५ मध्ये ध्यानचंद यांचा जन्म झाला.त्याचं मूळ नाव “ध्यान सिंग” आहे. परंतु ते रात्री उशीरापर्यंत हॉकीचा सराव करायचे म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांना रात्रीच्या चंद्राची उपमा देऊन त्यांचं ध्यानचंद हेच नाव प्रसिद्ध केलं! त्यांचे वडील सामेश्वर दत्त सिंग हे भारतीय सैन्यात असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. याच कारणामुळे पहिल्या सहा वर्षांनंतर ध्यानचंद यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या वडिलांना निवृत्तीनंतर उत्तर प्रदेशातील झांशीमध्ये एक जमिनीचा तुकडा मिळाला आणि तेथेच ते स्थायिक झाले. ध्यानचंद यांना मूलसिंग व रूपसिंग हे दोन भाऊ होते. त्यांना लहानपणी कुस्तीची आवड होती, पण सैन्यात दाखल होईपर्यंत हॉकीची त्यांना फारशी माहिती नव्हती. १९२२ मध्ये १६व्या वर्षी ते सैन्यात दाखल झाले. त्या वेळी सैन्याच्या रेजिमेंटमध्ये होणाऱ्या हॉकी सामन्यांत खेळताना त्यांच्या ड्रिबिलगचे कौशल्य मेजर बाले तिवारी यांच्या नजरेत भरले आणि त्यांनी ध्यानचंद यांच्याकडून हॉकीचे तंत्र व कौशल्य घोटवून घेतले.
त्यामुळे १९२२ ते १९२६ या काळात रेजिमेंटच्या तसेच विविध स्पर्धामध्ये त्यांनी आपल्या असामान्य कौशल्याची मोहर उमटवली. या त्यांच्या कर्तृत्वामुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या इंडियन आर्मी संघात त्यांची निवड झाली. त्या दौऱ्यात त्यांनी १८ सामने जिंकले, दोन बरोबरीत सुटले व एकमेव लढत त्यांनी गमावल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला. नंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी लढतींत पहिली त्यांनी जिंकली तर दुसऱ्या लढतीत मात्र निसटता पराभव झाला. या दौऱ्यावरून परतताच ध्यानचंद यांना लान्स नाईक बढती मिळाली. अॅमस्टरडॅम येथे १९२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये प्रथमच हॉकीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय हॉकी महासंघाने भारतीय संघाची निवड करण्यासाठी आंतर-परगण्यांच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. यात युनायटेड प्रोव्हिन्सेस, पंजाब, बंगाल, राजपुताना व सेंट्रल प्रोव्हिन्सेस या पाच संघांचा समावेश होता. या स्पर्धेत युनायटेड प्रोव्हिन्सेस संघाकडून खेळण्यासाठी ध्यानचंद यांनी आर्मीची परवानगी मिळविली.
सेंटर फॉर्वर्ड म्हणून खेळणारे ध्यानचंद आणि इनसाईड राईट मार्टिन यांनी अनोखा ताळमेळ दाखवत या स्पर्धेत धमाल उडवली व युनायटेड प्रोव्हिन्सेसने ही स्पर्धा आरामात जिंकली. ध्यानचंद यांच्या कौशल्यपूर्ण खेळाने सर्वानाच भुरळ घातली आणि ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघातील त्यांचा प्रवेश निश्चित झाला. ऑलिम्पिकसाठी अॅमस्टरडॅमला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ मुंबईत आला, पण मुंबईविरुद्धच्या सराव सामन्यात त्यांना ३-२ असा पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचा निरोप समारंभ तसा थंडच झाला. मात्र भारताने नंतर इंग्लंडमधील ११ सराव सामने आणि नंतर ऑलिम्पिकसाठी अॅमस्टरडॅम येथे दाखल झाल्यानंतर सराव सामन्यांमध्ये हॉलंड, बेल्जियम, जर्मनीसारख्या संघांना सराव सामन्यात धूळ चारली होती. पहिल्याच ऑलिम्पिक लढतीत भारताने ऑस्ट्रियाला ६-० असे नमवून तर बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झर्लंड या संघांवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत यजमान नेदरलँडवर ३-० असा विजय मिळवत ध्यानचंद यांनी भारताला हॉकीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पाच लढतींत त्यांनी तब्बल १४ गोल केल्याने हॉकी विश्वात हॉकीतील जादूगार अशी त्यांची कीर्ती पसरली. जाताना थंडे स्वागत झालेल्या या संघाचे विजयानंतर मात्र मायदेशात जल्लोशात स्वागत झाले. १९३२च्या ऑलिम्पिकमध्येही भारतीय संघाने अपराजित राहत अंतिम फेरीत अमेरिकेवर २४-१ असा मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी घातली.
मेजर ध्यानचंद यांचे अनेक किस्से आजसुद्धा सांगितले जातात. पण १९३६ च्या बर्लिन ऑलंपिकमध्ये ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्ताव फेटाळण्याचा किस्सा अविस्मरणीय आहे. मेजर ध्यानचंद यांचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाचा तो सुवर्णकाळ होता. तथाकथीत आर्यन संस्कृतीची, आणि काळ्या-सावळ्या रंगाच्या माणसांना गुरेढोरे संबोधणाऱ्या नाझी हिटलरच्या फॅसिस्ट जर्मनीत, या काळ्या-सावळ्या कलाकारांनं जर्मनीचा आठ विरुद्ध एक गोलनी पाडाव केला. ध्यानचंदच्या सहा गोलनी जणु हिटलरच नाक कापलं आणि तेही नाझी जर्मनीच्या राजधानी बर्लीनमधील ऑलिम्पियाडमध्ये! मेजर ध्यानचंद यांचा खेळ आवडल्यानं जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात मोठं पद देऊ केलं आणि जर्मनीसाठी हॉकी खेळण्यास सांगितलं. ध्यानचंद त्यावेळी भारतीय लष्करात लान्स नायक या कनिष्ठ पदावर कार्यरत होते. पण जर्मन सैन्यातल्या मोठ्या पदाची ऑफर ध्यानचंद यांनी स्पष्टपणे नाकारली. "मी भारताचं मीठ खाल्लं आहे. त्यामुळे भारतासाठीच कायमचा खेळत राहीन," असं ध्यानचंद नम्रपणे हिटलरला म्हणाले.
दुसऱ्या महायुद्धाआधी भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडचा प्रदीर्घ विजयी दौरा केला होता. खराब क्रीडांगण व सदोष व पक्षपाती पंचगिरी हे अडथळे लिलया पार केले होते. ध्यानचंदच्या हॉकी-स्टिकमधील जादूने न्यूझीलंडला वेड लागलं होतं. तेव्हा असं सांगितलं जायचं की, ध्यानचंदचे पांढरे कॅनव्हास शूज व पांढरा चेंडू, यापैकी चेंडू कोणता हे कोडं प्रतिपक्षास सोडवता येत नव्हतं. प्रतिपक्षाच्या मनात असा गोंधळ उडवून दिला तो फक्त एकमेव हॉकीपटुने, ध्यानचंदने. त्यांच्याहॉकी स्टिकमध्ये चुंबक असल्याचं म्हणत अनेकदा ध्यानचंद यांची स्टिक बदलण्यात आली. हा किस्सा काल्पनिक मानला, तर जगातील इतर कोणत्याही हॉकीपटुविषयी दंतकथांचे असे वलय निर्माण का झाले नाही ? क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मेजर ध्यानचंद यांना १९५६ साली 'पद्मभूषण' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हॉकीच्या या महान खेळाडूचं ३ डिसेंबर १९७९ रोजी दिल्लीत निधन झालं. मेजर ध्यानचंद यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी केली जातेय. माजी गृहराज्यमंत्री किरण रिजुजू यांनीही 'भारतरत्न'साठी मेजर ध्यानचंद यांची शिफारस करण्यात आल्याचं काही वर्षांपूर्वी म्हटलं होतं. मात्र, अद्याप मेजर ध्यानचंद यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात आलेला नाही.
-सुरेश मंत्री
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा