भारतात दिवसेंदिवस तरुणाई ऑनलाईन गेममध्ये अडकत चालली असून, ऑनलाईन गेम्सच्या व्यवसायात भारत जगात चौथा देश ठरला आहे. २०२२ मध्ये भारतात १५०० कोटी वेळा गेम्स डाऊनलोड केले आहेत. हे चीन, अमेरिका आणि जपाननंतर जगात सर्वात जास्त प्रमाण आहे. याचे सर्वात मोठे कारण भारतातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आणि स्वस्त मोबाइल डेटा आहे. गेमिंग कॅपिटल फंड लुमीकाईनुसार भारतात २०२२ मध्ये ऑनलाईन गेम्सचा व्यवसाय सुमारे ८९६७ कोटी रुपयांचा आहे. यावरून भारतातील तरूणाईमध्ये ऑनलाईन गेमचे वेड किती वाढले आहे, याचा अंदाज येतो.
कोरोना लॉकडाउनच्या काळात सुरक्षित सामाजिक वावराचं बंधन पाळण्यासाठी घरच्या घरी ऑनलाईन गेम्सचा पर्याय स्वीकारला गेला. त्यामुळे ऑनलाईन गेमिंग करणाऱ्यांची संख्या वाढली. घरबसल्या नातेवाईकांबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर ऑनलाइन गेम्सचे डाव मोठ्या प्रमाणावर रंगताना दिसले. मध्यंतरीच्या काळात पबजी या गेमचं वेड वाढल्यामुळे तो खेळण्यावर या गेमच्या कंपनीकडून काही निर्बंध घालून देण्यात आले होते. मात्र ल्युडो, सापशिडी, बुद्धिबळ, पत्ते यांसारख्या ग्रुपनं खेळल्या गेम्सवर कोणतेच निर्बंध नसल्यामुळे हे गेम खेळण्याकडे अनेकांचा ओढा या काळात वाढला होता. ऑनलाईन गेम करमणूक नव्हे तर आता कमाईचे साधन बनले आहे. गेम बनवण्यापासून खेळण्यापर्यंत पैसे मिळत आहेत. २९ वर्षीय सलमान अहमदने गेमर होण्यासाठी गुगलची नोकरी सोडली. गेमर म्हणून तो दरमहा सुमारे १० लाख रु. कमावतो. त्याने चिनी मोबाइल कंपनी रेडमीपासून स्किन केअर कंपनी मामाअर्थपर्यंतच्या ब्रँडशी करार केले आहेत. ई-स्पोर्टसच्या माध्यमातूनही कोट्यवधी रुपये बक्षिसांची रक्कम मिळत असते. २३ वर्षीय सलोनी पवार ही भारतातील पहिली महिला आहे, जिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित एखाद्या ई-स्पोर्टस स्पर्धेत भाग घेतला आहे. ही स्पर्धा २०१९ मध्ये थायलंडमध्ये झाली होती. ती म्हणते की, प्रथम कुटुंबाने साथ दिली नव्हती. मात्र, पैसे येत गेल्यावर त्यांना लक्षात आले की, यातही संधी आहे. हैदराबादमध्ये १८ ते २० नोव्हेंबरपर्यंत ८० लाखांच्या बक्षिसांच्या ३ ई-स्पोर्टस स्पर्धा मोबाइलद्वारे हजारोंनी पाहिली होती.
खेळ खेळणे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, पण ते मैदानी असावेत. इंटरनेट क्रांती पूर्वी सुर-पारंब्या, लपंडाव, कबड्डी, विटी दांडू, खो-खो अशा प्रकारचे मैदानी खेळ मोठ्या प्रमाणावर खेळले जायचे. आज एका क्लिकवर हजारो ऑनलाईन व्हिडिओ गेम्स सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आता लहान मुलांपासून तरूणाई सुद्धा या आभासी असणा-या ऑनलाईन गेम्सनाच पसंदी देत असल्याने मैदानी खेळ खेळणे कमी झाले आहे. आजची तरूणाई थोडासाही फावला वेळ मिळाला की, ऑनलाईन गेम्स खेळताना दिसते. चालताना, हॉटेलमध्ये चहा घेताना, सिग्नल लागले असताना ही तरूणाई सहज गेमची पूढची लेव्हल पार करते. अनेक तरूण एकत्र आल्यानंतर एकमेकांना गप्पा मारण्याऐवजी हातात मोबाईल घेवून ऑनलाईन गेम्स खेळण्यात गुंतलेले दिसतात. ऑनलाईन गेम खेळणे आणि तो जिंकणे, हा या तरूणांसाठी आता प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. दिवसातला थोडा वेळ गेम खेळणे ठिक आहे. पण गेमिंगच्या सवयींमुळे गंभीर आजार होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार एखादी व्यक्ती मोकळ्या वेळेत सतत मोबाईल गेम्स खेळत असेल तर तिला एखादा गंभीर आजार आहे असे समजायला हरकत नाही. त्यांनी ऑनलाईन गेमच्या आजाराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील यादी जाहीर केली आहे. यामध्ये ‘घातक गेमिंग’ आणि ‘गेमिंग डिसऑर्डर’ असे दोन प्रकार दिलेत. त्यामुळे जास्त वेळ गेम खेळणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. बहुंतांश ऑनलाईन गेम्स मध्ये हिंसेचे प्रमाण जास्त असल्याने हे गेम्स खेळत, त्यातील मारधाडीच्या टास्क पूर्ण करता-करता तरूणांमध्ये हिंसात्मक भावना वाढत आहे. सोबत सतत ऑनलाईन गेम्स खेळल्यामुळे दृष्टीदोषासारख्या शारीरिक आजारांबरोबर मानसिक आजार जडण्याची शक्यता असते. काही वर्षांपूर्वी ब्लू व्हेल या ऑनलाईन गेमने जगभरात हाहाकार माजवला होता. भारतात या गेमच्या आहारी जाऊन अनेकांनी आपला जीव गमावला होता. तात्पुरती उपाययोजना म्हणून सरकारनं इंटरनेटवरील या गेम्सच्या लिंक हटवण्याचे आदेश दिले, तर तिकडे अमेरिकेत गेम बनवणाऱ्या संचालकाला अटक झाली होती. त्यामुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली होती. ५ जीचा शुभारंभ भारताच्या ऑनलाइन गेमिंगला मोठा बाजार देईल. २०२६ पर्यंत भारतात १०० कोटी स्मार्टफोन असतील. मार्च २०२७ पर्यंत हा ऑनलाईन गेमींगचा व्यव्हार ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यात तरुणाई आणि मुलेदेखील या ऑनलाईन गेमिंगमध्ये आणखी जखडून जाण्याचा धोका आहे.
- सुरेश मंत्री
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा