मुख्य सामग्रीवर वगळा

अभिनयातील वात्सल्यमूर्ती हरपली!

मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे नुकतेच वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी दीदींची तब्बेत ढासळली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. याआधी मार्च महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडलेली होती. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. सुलोचना दीदींचे जाणे हे मराठी प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपट विश्वात देखील त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. त्यांचा सदैव हसरा चेहरा आणि त्या सात्विक चेहऱ्यावरील तेज चाहत्यांसाठी मोठी समाधानाची बाब होती. त्यांच्या जाण्यानं चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हिंदी-मराठी सिनेसृष्टीचा प्रदीर्घ काळ ज्यांनी ’याचि देही याचि डोळा’ जगला अशा फार थोड्या दिग्गज कलाकारांपैकी सुलोचना दीदी एक. त्यांचा जन्म कोल्हापूरमधल्या खडकलाट गावी ३० जुलै १९२८ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव तानीबाई आणि वडिलांचे नाव शंकरराव दिवाण होते. बालपणी गावातील तंबूमध्ये दाखविले जाणारे अनेक चित्रपट त्यांनी त्याकाळी पाहिले आणि त्यांच्या मनात याच काळात अभिनयाची व कलेची आवड रुजली. लहानपणीच त्यांच्या आईवडीलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांच्या मावशी बनुबाई लाटकर यांनी केले. या मावशीला त्यांच्याबद्दल एवढा विश्वास होता की ही मुलगी नाव काढणार! त्यामुळे तिच्याबरोबर आपल्या गावाचं नावही मोठं होऊ दे, म्हणून त्यांनी तिचं आडनाव लावलं ‘लाटकर'. अर्थात लाटकर हे आडनाव ना त्यांच्या माहेरचं नाव आहे ना सासरचं. ते नाव आहे त्यांच्या गावाचं! 

सुरूवातीला मास्टर विनायक यांनी आपल्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ या संस्थेत सुलोचना यांना १९४३ साली ‘ज्यूनियर आर्टिस्ट’ म्हणून नोकरीस घेतले. याच साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’च्या ‘चिमुकला संसार’ या चित्रपटातून सुलोचनाजींनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी पहिल्यांदा छोटीशी भूमिका साकारली. याच सुमारास त्यांचा परिचय लता मंगेशकर यांच्याशी झाला व त्यांनी सुलोचनादीदींना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. सुरुवातीच्या काळात त्यांना भालजी पेंढारकर यांचं मार्गदर्शन लाभलं होतं. त्यांची भाषा ग्रामीण ढंगाची होती. त्यांची भाषा शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची. त्यामुळे त्यांना बरेचदा टीका सहन करावी लागत असे. भालजी पेंढारकर यांनी त्यांची भाषा सुधारावी म्हणून एक संस्कृत मासिक त्यांच्याकरता लावले. ते वाचणे हे चांगलेच क्लिष्ट काम होते. पण त्याबद्दल तक्रारीचा चकार शब्द न काढता सुलोचनाबाई चिकाटीने त्या भाषादिव्यातून गेल्या. त्यांची थट्टा व नक्कल करणारे महाभाग ‘पारिजतक’च्या चित्रीकरणाच्या वेळी सुलोचनाबाईंना संस्कृतप्रचुर संवाद अस्खलितपणे बोलताना पाहून थक्क झाले. भालजींनीच त्यांचे विशाल, भावपूर्ण डोळे पाहून त्यांचे नामकरण ‘सुलोचना’ असे केले व हेच नाव पुढे चित्रपटसृष्टीत रुढ झाले. 

                                                                     शिक्षण अवघं चौथीपर्यंतच झालं असलं तरी सुलोचनादीदींनी चित्रपटसृष्टीत आपले नाव सुवर्णाक्षरात लिहिले आहे. सुमारे सात दशके आपल्या अभिनयाने मनोरंजन करणाऱ्या सुलोचना लाटकर ह्या मनोरंजन जगतात आणि चाहत्यांमध्ये सुलोचना दीदी या नावाने परिचित होत्या. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांनी, मराठा तितुका मेळवावा, मोलकरीण, बाळा जो जो रे, सांगते ऐका, सासुरवास, वहिनीच्या बांगड्या अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले होते. मोलकरीण आणि एकटी या सिनेमात दीदींनी साकारलेली सोशिक आईची भूमिका तर लाजवाबच. 'भाऊबीज’ या चित्रपटासाठी ‘चाळ माझ्या पायात’ ही सुलोचनादीदींनी सादर केलेली लावणी आणि ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटासाठी त्यांनी साकारलेली जिजाबाईंची भूमिका तर इतकी लक्षवेधी ठरली की, प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेले आदराचे स्थान अधिकच बळकट झाले. मराठी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. हिंदी चित्रपट सृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबर आणि नंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीता बाली, बबिता, नीतू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. त्यांचा मोतीलाल यांच्या बरोबरचा ‘मुक्ती’ हा चित्रपट गाजला. याशिवाय त्यांनी आये दिन बहार के, कटी पतंग, नाटक, चिराग, संबंध अशा हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला होता. सुलोचना दीदी यांची कारर्किद अत्यंत मोठी असून त्यांनी २५० मराठी आणि १५० हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर होता. विशेष म्हणजे सुलोचना दीदी यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका केली आहे. दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासोबतही सुलोचना दीदी यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या. त्यांना उपजत लाभलेले सोज्वळ सौंदर्य आणि अतिशय भावदर्शी चेहरा या बाबींमुळे त्यांना चरित्र अभिनेत्रीच्या अप्रतिम भूमिका सादर करण्याची संधी मिळाली. प्रेमळ सोशीक आई, सालस बहीण, समजूतदार वहिनी या त्यांनी सादर केलेल्या व्यक्तिरेखा कसदार अभिनयासाठी वाखाणण्यात आल्या. शालीनता, सात्त्विकता व भूमिकेशी समरस होण्याची वृत्ती, अपार कष्ट करण्याची मानसिकता, अपयशाला सामोरे जाण्याचे धैर्य या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटसृष्टीत अजरामर झाल्या. त्यांना चित्रपटनिर्मितीचीही इच्छा होती. दिग्दर्शन करावंसंही त्यांना वाटत होतं. ते शिकायला तेवढा वेळ मात्र  मिळाला नाही. 

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या सशक्त अभिनयाचं दर्शन घडवणा-या सुलोचनाजींना आजपर्यंत शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९९९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याशिवाय २००४ मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तर २००९ मध्ये महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्रभूषण' या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. दीदींच्या जाण्यानं चाहत्यांना शोक अनावर झाला असून सोशल मीडियावर त्यांना चाहत्यांनी आदरांजली वाहिली आहे. याशिवाय हिंदी, मराठी सिनेविश्वातील सेलिब्रेटींनी देखील दीदींच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. सुलोचना दीदींच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीच्या फार मोठ्या वाटचालीचा शेवट झाला आहे.

- सुरेश मंत्री.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...