ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर ते खलनायकापर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना महाराष्ट्रभूषण देऊन राज्य सरकारने एका बहुरूपी कलाकाराचा सन्मान केला आहे. मराठी रसिकांची पोचपावती या निमित्ताने त्यांना मिळाली आहे.
अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. गिरगावातील चिखलवाडीमध्ये अशोक सराफ यांचे बालपण गेले. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. त्यांना आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं, पण त्यांनी नीट शिकावं आणि मग एखादी चांगली नोकरी करावी असं अशोक सराफ यांच्या वडिलांना वाटत होतं. त्यांनी वडिलांचा शब्द पाळत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरू केली. त्यासोबतच आपला अभिनयाचा छंद जोपासत ते नाटकांत काम करू लागले. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. लगीन घाई, सारखं छातीत दुखतंय, प्रेमा तुझा रंग कसा? मनोमिलन, झालं एकदाचं, व्हॅक्यूम क्लिनर, हमीदाबाईची कोठी, संगीत संशय कल्लोळ, हसतखेळत आदी नाटकातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत.
अशोक सराफ यांनी १९६९ पासून चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतरही काही वर्षं बँकेत काम केले. अशोक सराफ यांना खरी ओळख मराठी चित्रपटातून मिळाली. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, वजीर, भस्म्या, खरा वारसदार, धुमधडाका, गंमतजंमत, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपट केले, त्यापैकी १०० व्यावसायिक हिट ठरले. अशोक सराफ यांनी मराठीसोबतच ५० हिंदी आणि एका भोजपुरी चित्रपटात काम केले. विनोदी भूमिका साकारणं हा त्यांचा हातखंडाच. त्यामुळेच ते बहुतांश मालिका, चित्रपट आणि नाटकात विनोदी पात्र साकारताना दिसले. त्यांनी विनोदी सिनेमांमधून तुफान लोकप्रियता मिळवली. त्यांचं काम पाहून त्यांना सिनेविश्वातील लोक 'अशोक सम्राट' म्हणू लागले. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या कलाकाराने मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं आहे.
आत्ताच नव्हे तर अगदी पूर्वीपासून कलाकारांनी चित्रपटांमध्ये एखादी नवी स्टाईल ट्राय केली की तो ट्रेंडच सेट होतो. कलाकारांच्या केसांपासून ते कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टींकडे चाहते फॅशन म्हणून पाहात असतात आणि हेच ट्रेंड ते फॉलोसुद्धा करत असतात. अशोक सराफ यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या शर्टची वरची दोन बटने नेहमी उघडी असत. तुम्ही जर त्यांचे चाहते असाल तर एव्हाना ही गोष्ट तुमच्या नजरेतून चुकलेली नसेल. शर्टची दोन बटने उघडी असण्यामागचं कारण एकतर फॅशन हे आहेच पण त्याचं खरं कारण म्हणजे अशोक सराफ यांना शर्टची पूर्ण बटने लावल्याने अस्वस्थ वाटत असे. त्यांना यामध्ये गुदमरल्यासारखं व्हायचं. आणि शर्टची दोन बटने उघडी ठेवल्याने त्यांना फारच मोकळं आणि छान वाटायचं. अशात त्यांना अतिशय मोकळेपणाने कामही करता यायचं. आणि म्हणूनच मामा आपल्या शर्टची वरची दोन बटने नेहमी उघडी ठेवत. परंतु कालांतराने त्यांच्या चाहत्यांना ती फॅशन वाटू लागली आणि अशाप्रकारे त्यांनी हा नवा ट्रेंड सेट केला.
अशोक सराफ यांना सिनेइंडस्ट्रीमधील लोक मामा या नावाने ओळखतात. मराठीत कलाकारांचा अजिबात तुटवडा नाही, पण आपल्या भाषेच्या सीमा ओलांडून एखादा नट देशव्यापी ओळखला जातोय किंवा त्यासाठी प्रयत्न करतोय असं दिसत नाही. एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही ह्या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार ह्या देशाने खूप कमी पाहिले, पण अशोक सर ह्या बाबतीत देखील अपवाद ठरले. विनोद हा नैसर्गिक असतो त्याला कुणाचा अपमान न करता सादर कसं करावं? हे अशोक सराफ यांच्या अभिनयातून दिसून येतं. गोंधळात गोंधळ, राम राम गंगाराम, गोष्ट धमाल नाम्याची आणि सुना येती घरा या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. तर पांडू हवालदार सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना राज्य सरकारच्या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. तर मायका बिटुआ या सिनेमातील कामाबद्दल त्यांना भोजपुरी फिल्म पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगभर नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास सन १९९५ पासून सुरुवात झाली. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये २५ लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अशोक सराफ यांचे मनोरंजन क्षेत्रातील योगदान पाहता ते ख-या अर्थाने महाराष्ट्र भूषण आहेतच. मराठी सिनेसृष्टीला फुलविण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. निश्चितच महाराष्ट्र सरकारने अत्यंत योग्य व्यक्तीला हा सन्मान दिला आहे..
-सुरेश मंत्री
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा