मुख्य सामग्रीवर वगळा

सामाजिक चळवळीचा आधारस्तंभ हरपला!

 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा असं त्यांच वर्णन करता येईल. समाजातील सर्वात तळातील घटकाला न्याय मिळवून देणे, हाच त्यांचा ध्यास होता. संघर्षमय जीवन जगत त्यांनी प्रत्यक्ष कामातून समाजवादाची मूर्त प्रतिमा उभी केली. त्यांचा आशावाद, परखड विचार, निस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी असलेली नाळ हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे मोठे बळ होते. बाबा आढाव यांचे कार्य म्हणजे समाजहितासाठीचे निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य कसे असावे, याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रगत, विचारशील चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून महाराष्ट्राने समाजसेवेचा महान तपस्वी गमावला आहे.

बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुणे येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असे आहे. बाबांनी प्राथमिक शिक्षण पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक शाळेतून घेतले आणि उच्च शिक्षण पुण्यातील शिवाजी मराठा शाळेतून घेतले. १९५२ मध्ये त्यांनी ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि पुण्यातील त्यांच्या नाना पेठेतील घरी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. लहानपणी बाबा भाऊसाहेब रानडे, एस.एम. जोशी, नारायण गणेश गोरे, एन.जी. गोरे आणि राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी सिद्धांतांनी प्रेरित झाले. त्यांच्या सुरुवातीच्या काळात, त्यांनी राष्ट्र सेवा दलात भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, बापूसाहेब काळदाते यांच्यासह इतर समाजवादी नेत्यांसोबत काम केले जे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांचे जवळचे मित्र आणि सहयोगी बनले. सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी आपले करिअर बदलण्याचा त्यांनी निर्णय घेतला. १९५५ मध्ये, बाबांनी हमालांना संघटित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले, पहिली असंघटित कामगार संघटना हमाल पंचायतची १९६३ मध्ये स्थापना केली. हमाल पंचायत पंचायत या संघटनेच्या माध्यमातून कामगारांसाठी स्वस्त जेवणाचा उपक्रम राबवला. ते तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि याच पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य केले होते. नगरसेवक असताना त्यांनी वंचितांसाठी काम केले आणि झोपडपट्टीवासीयांसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक प्रश्न सोडवले. स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय बंद करुन सातत्याने सामाजिक जीवनात मग्न राहिलेल्या बाबांनी लढवलेली १९६७ ची खेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक व पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकपदाचा १९७१ साली दिलेला नगरसेवकपदाचा राजीनामा वगळता बाबा राजकारणाच्या फंदात नंतर पडले नाहीत.

राजकीय जीवनासोबतच, त्यांनी आपले आयुष्य कष्टकरी समाजासाठी वेचले. त्यांनी असंघटित कामगारांसाठी आयुष्य वेचलं. वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचे आधारस्तंभ म्हणून काम केले. हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघटन उभे केले. पुण्यात रिक्षा चालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या हक्क आणि मागण्यांसाठी रिक्षा पंचायत ही संघटना त्यांनी स्थापन केली. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली. ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ त्यांनी सुरू केली. जातीभेद झुगारून समाजात सामाजिक समानता आणणे हा या चळवळीमागे हेतू होता. या चळवळीद्वारे, त्यांनी गावातील सर्व लोकांसाठी सार्वजनिक पाणवठ्याचा वापर समान करण्यासाठी संघर्ष केला. गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाड्याच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी त्यांनी आंदोलने केली. तसेच महिलांची पहीली शाळा असलेल्या भिडे वाड्याच्या ठिकाणी स्मारक करण्यासाठी त्यांनी ठाम भुमिका मांडली हाेती. सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी दिलेला लढा हा कायम स्मरणात राहील. 

त्यांचे कार्य केवळ चळवळीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी माणुसकी आणि समतेचे मोल जपल. त्यांनी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले. बाबा आढाव यांनी सामाजिक चळवळी आणि कष्टकरी वर्गाचे जीवन दर्शवणारे महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये ‘एक गाव – एक पाणवठा’, त्यांचे आत्मचरित्रात्मक लेखन ‘मीच तो माणूस’ आणि ‘एक साधा माणूस’, ‘जगरहाटी’, ‘रक्ताचं नातं’, ‘असंघटित कामगार : काल, आज आणि उद्या’, ‘जातपंचायत : दाहक वास्तव’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक चिंतन’ ही काही महत्त्वाची पुस्तके आहेत. या पुस्तकांनी वाचकांच्या मनावर खोल प्रभाव पाडला. बाबा आढाव यांना त्यांच्या अतुलनीय सामाजिक योगदानाबद्दल अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. यामध्ये पुण्यभूषण पुरस्कार (२००६), 'द वीक' मासिकाने दिलेला 'मॅन ऑफ द इयर' सन्मान (२००७) आणि टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट जीवनगौरव पुरस्कार (२०११) यांचा समावेश आहे.

बाबा आढाव यांची एक सत्यशोधक विचारवंत म्हणून असलेली कारकीर्द जवळपास ७० वर्षांची होती. बाबांचे सामाजिक आणि राजकीय जीवन आजच्या सामाजिक जीवनात करिअर करु पाहणाऱ्याना मार्गदर्शक ठरावे असे आहे. परिवर्तनवादी चळवळीचा वसा घेऊन, महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीशी नाते जपून अनेक आंदोलने चळवळी करित संस्थात्मक कार्याची जोड देत बाबानी आपले आयुष्य सर्व सामान्यासाठी वेचले आहे. आता बाबा आढाव आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनामुळे सामाजिक आणि कामगार चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली आहे. त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आता आपल्यातून निघून गेले. ते कायम स्मरणात राहतील, त्यांचे विचार येणा-या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.

-सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...