देशाला स्वातंत्र्य
मिळाल्या नंतर देशातील तत्कालीन नेत्यांनी देशात गांधीजींच्या स्वप्नातील रामराज्य
आणण्याचा संकल्प केला होता.मात्र त्यानंतर तत्कालीन राजकीय पक्षांत खुर्ची
मिळवण्यासाठी संघर्ष सुरु झाला,राजकीय पक्षांनी आपले
वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गांधीवादी दृष्टीकोन नाकारल्यामुळे राजकारण आणि
गुन्हेगारी यांचे घट्ट संबंध प्रस्थापित होण्यासाठी मदत मिळाली.जातीयवाद
मिटवण्याच्या नावावर सुद्धा या प्रकियेला बळ दिले गेले.वर्तमान स्थितीत राजकारणाच्या गुन्हेगारीकरणात ज्या तिव्र गतीने वाढ होत आहे हे पाहून
कोणीही म्हणू शकतो की आपण आपल्या देशात रामराज्य आणण्याचा मुळ ध्येयापासून पूर्णपणे
भरकटलो आहोत.
आजवर देशात राजकिय
लोकांनी करोडो रुपयांचे घोटाळे केलेले समोर आले आहेत.या संदर्भात अनेक उदाहरणे
आपल्याला घेता येतील.सुरेश कलमाडी यांच्यावर कॉमन वेल्थ गेम मध्ये १०० कोटींचा
घोटाळा केल्याचा आरोप होता.त्यांना या बाबतीत तिहार जेलची हवा ही खावी लागली.माजी
केंद्रीय दूर संचार मंत्री ए.राजा यांच्यावर टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात १,७६०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री
मायावती यांच्यावर ताज हेरीटेज कॉरीडोअर
केस आहे.त्यांनी २००७-०८ मध्ये २६ करोड रुपये कर भरला जो त्यावर्षी देशातील
सर्वाधीक कर भरणा-या २० लोकांच्या यादीत येतो.त्यांच्याकडे एवढा पैसा आला कोठून?लालू प्रसाद यादव यांच्यावरील ९५० करोड रुपयाचा चारा घोटाळा,झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा-४०० करोड रुपये,मुलायमसिंग
यादव यांच्या वर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप,एम.करुणानिधी
वरिल लिट्टे या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप,तामिळनाडूच्या
मुख्यमंत्री जयललिता यांच्यावरिल करोडो रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा
आरोप,कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदुरप्पा यांच्या वरिल
भ्रष्टाचाराचे आरोप हे सगळे काय दर्शविते?महाराष्ट्रही या
बाबतीत मागे नाही.आदर्श सोसायटी घोटाळा,सिंचन घोटाळा,अणाभाऊ साठे महामंडळ घोटाळा,आदर्श सोसायटी घोटाळा ही
प्रकरणे खूप गाजली.माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे
त्यांना राजीनामा दयावा लागला.राजकीय भ्रष्टाचाराची पाळेमुळे मंत्र्यांपासून
ग्रामिण पातळीतील नेत्यांपर्यंत पोहचलेली आहेत.
राजकीय नेते आणि
गुन्हेगार यांचे संबंधही फार जवळचे असल्याचे दिसते.बिहार मध्ये बाहुबली या नावाने
ओळखल्या जाणा-या मोहम्मद शहाबुद्दीन या गुन्हेगाराला लालू प्रसाद यादव यांनी जवळ
केले.तो इथे दोन वेळा विधान सभेवर निवडूनही आला आहे. मोहम्मद शहाबुद्दीनवर अपहरण,धमकावणे,खून या सारखे अनेक गंभीर गुन्हे आहेत.त्याची
संपूर्ण बिहार मध्ये खूप दहशत आहे,अनेक वर्षे तो जेलची हवा
खात होता.मात्र नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी नुकतीच हात मिळवणी
केल्यानंतर तो जामिनावर बाहेर तात्काळ सुटून आला.दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या
अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आणि आमदारांवर गुन्हेगारी स्वरुपांचे
गुन्हे दाखल झालेले आहेत.
देशातील राजकारण्यांची
गुन्हेगारी प्रवृत्ती लपून राहीलेली नाही.२००९ च्या लोकसभा निवडणूकीत निवडून
आलेल्या ५२१ उमेदवारांपैकी १५८ (३० टक्के) उमेदवारांवर अनेक गंभीर गुन्हयांचे खटले
दाखल होते.तर २०१४ च्या लोकसभेतील ५४१ सदस्यांपैकी १८६ (३५ टक्के) सदस्यांवर
गुन्हेगारी खटले दाखल आहेत.म्हणजे यात वाढ झालेली दिसून येते.
देशातील सर्व
नागरिकांनी या बाबतीत आत्मपरीक्षण करायला हवे आणि आपण जी नैतिक मूल्ये हरवून बसलो
आहोत ती पुन्हा आत्मसात केली पाहिजेत.देशात सगळीकडे लाचखोरी,भ्रष्टाचार,काळा बाजार,जातीयवाद
आणि सांप्रदायिकता चे विष पसरत आहे.सामान्य कर्मचा-यापासून उच्चपदस्थ नेत्यांवर
वेळोवेळी भ्रष्टाचाराचे आरोप होत आले आहेत.देशातील राजकारणात गुन्हेगारीकरण
दिवसेंदिवस वाढत चालले आहे.खुर्ची किंवा राजकीय पदाच्या लालसेने नैतीक मुल्यांचा
उपहास केला जात आहे.‘येन-केन प्रकारे’ सत्ता मिळवण्याचा प्रयत्न राजकीय
नेत्यांकडून होत आहे.
सर्वप्रथम आवश्यकता
आहे ती राजकारणाच्या गुन्हेगारीकरणा मागील कारणे
शोधण्याची आणि त्यावरील उपाय शोधण्याची.सर्वप्रथम आपल्या निवडणूक प्रकीयेत सुधारणा
करण्याची आवश्यकता आहे.स्वत:जवळ भरपूर संपत्ती व शक्ती असल्याशिवाय आज कोणी
उमेदवार निवडणूकीत निवडून येवू शकत नाही.आज राजकारणात असलेल्या नेत्यांपैकी ९०
टक्के नेते एकतर धनाढय कुटुंबातील आहेत किंवा त्यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध
आहेत.आपल्या निवडणूक प्रक्रीयेचा गुणवत्तेशी कधीच संबंध राहीला नाही हे कटु सत्य
आहे.या मुळे योग्य व्यक्ती राजकारणात पूढे येत नाहीत आणि जर आल्याच तर
त्यांच्याकडे पैसा आणि शक्तीचा अभाव असल्याने त्यांचे पाय मागे खेचले
जातात.त्यामुळे या क्षेत्रापासून प्रामाणिक व सामान्य व्यक्ती दूर राहणे पसंद करू
लागले आहेत.त्यामुळे राजकारणात अशे लोक येत आहेत ज्यांच्या मध्ये देशप्रेमाच्या
भावने ऐवजी स्वार्थ साधण्याची भावना वरचढ आहे.ही देशाला लागलेली एक किड आहे.समजा
जर एखादया कार्यालयातील उच्च अधिकारी जर भ्रष्ट,अयोग्य
आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल तर अशा परिस्थितीत प्रशासनाचा कारभार स्वच्छ
ठेवणे अवघड होवून जाते.आपल्या देशाच्या राजकीय क्षेत्राची अवस्था काही प्रमाणात
याच प्रकारची आहे.
देशातील बहुतेक नेते
गुन्हेगारी प्रवृतीचे आहेत त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण होणे स्वाभाविक
आहे.हेच नेते प्रशासनात भ्रष्टाचार आणि जातीयवादाला चालना देत आहेत.देशातील अनेक
महत्वपूर्ण पदांवर योग्यतेच्या आधारावर नाही तर याच नेत्यांच्या शिफारशीवरून किंवा
सूचनेनूसार नियुक्त्या केल्या जातात.
आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये
सुद्धा तात्काळ सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.आपल्या न्याय व्यवस्थेत अनेक त्रुटी
आहेत.आजपर्यंत अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे किंवा मोठया गुन्हेगारी स्वरूपांचे आरोप
झाले आहेत.यापैकी अनेकांवर न्यायालयात खटले चालवले गेले मात्र कायदयातील पळवाटा,पद आणि संपत्तीच्या जोरावर हे नेते कायदयाच्या कचाटयातून सुटून जातात आणि
स्वत:ची प्रतीमा स्वच्छ असल्याचे सिद्ध करण्यात यशस्वीही होतात.आज पर्यंत देशात
करोडोंचे आर्थिक घोटाळे झाले मात्र यापैकी किती पैसा वसूल झाला तर असे खेदाने
म्हणावे लागेल की काहीच नाही.क्वचितच एखादया मोठया नेत्यावरिल गुन्हा सिद्ध होवून
शिक्षा झाली आहे. आपले कायदे पाहून असा प्रश्न निर्माण होतो की ते फक्त गरीब
लोकांसाठीच बनवले आहेत की काय? आपल्या कायदा व्यवस्थेत
सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील जेणेकरून सर्वांना योग्य न्याय मिळेल.देशासाठी
ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळून ६९
वर्ष होत आहेत तरी आजही आपल्या राजकारणाचा आधार जातियवाद,धर्मवाद
आणि क्षेत्रीयवाद आहे.राजकारणी लोक लोकांच्या कमजोरीचा पूर्ण फायदा घेतात.खुर्ची
मिळवण्याच्या लालसेत ही लोक एवढया खालच्या थराला जातात की लोकांमध्ये जाती,धर्माच्या नावावर भांडणे लावून स्वत:चा स्वार्थ साधून घेतात.
देशावर इंग्रज याच
कारणांमुळे राज्य करू शकले.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो लोकांनी
प्राणाचे बलिदान दिले.मात्र आपण इतिहासापासून काहीच धडा घेतलेला दिसत नाही. जर ही
अवस्था अशीच राहिली तर देशावर संकटांचे ढग पुन्हा घोंघावू शकतात हे विसरता कामा
नये.सर्व जाती,धर्माच्या,भाषा व
राज्यांच्या लोकांनी मिळून राजकारणाचे वाढत चाललेले गुन्हेगारीकरण रोखण्याचा
प्रयत्न केला पाहिजे.देशाच्या घटनेने आपल्याला दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा
विचारपूर्वक व देशाचे हित डोळ्यासमोर ठेवून केला पाहिजे.ख-या,प्रामाणिक लोकांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले पाहिजे.
आपल्या सगळ्यांची ही
नैतीक जबाबदारी आहे की, आपण देश हिताला सर्वोच्च प्राधान्य
देवू.फुटीरतावादी ताकदीचा विरोध करू,जी देशाचे तुकडे पाडू
पाहत आहे व राष्ट्रीय एकात्मतेला बाधक ठरू पाहत आहे.आपण सामुहिक प्रयत्नातूनच देशाच्या
राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीकरणाला रोखू शकतो.हे लक्षात ठेवले पाहिजे की
राजकारणातील गुन्हेगारीकरणाचा फक्त एका व्यक्ती किंवा धर्मावर प्रभाव नाही पडत तर
संपूर्ण देशावर याचा दुष्परिणाम होतो.अशा परिस्थीतीत हे आवश्यक आहे की आपण आपले
व्यक्तीगत स्वार्थ आणि मतभेद विसरून एकजुट होवून अशाच लोकांना राजकारणात येवू
दयावे जे सर्वथा यासाठी योग्य आहेत.जर आपण यात यशस्वी झालोत तर तो दिवस दूर नाही
की भारत हा विश्वात महासत्ता बनेल.गांधीजींच्या स्वप्नातील रामराज्य यईल.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा