‘पद्मावती’ चित्रपटावरून सूरू
असलेला वाद आता शिगेला पोहचला असून,चित्रपटातील कलावंतांना जीवे मारण्याच्या तसेच हात-पाय तोडण्याच्या धमक्या
विविध संघटनांकडून मिळत आहेत.अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने
अभिनेत्री दीपिका पदुकोनला जीवंत जाळणा-यास एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे तर
हरयाणातील भाजपाच्या एका नेत्याने दीपिका पदुकोन व दिग्दर्शक संजय लीला भन्सालींचे
शिर कापणा-यास दहा कोटींचे बक्षिस देवू अशी घोषणा करीत अभिनेता रणवीर सिंगचे पाय
तोडण्याची धमकी दिली आहे.दूसरीकडे या वादग्रस्त चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप
घेत ती काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने
फेटाळली.अदयाप या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने यात
हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.या वादाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी
या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.
कोणी याला राजपूतांचा अपमान
म्हणत आहे तर कोणी हिंदूंचा.दूसरीकडे कोणी असा तर्क लावत आहेत की,हिंदू धर्म एवढा कमजोर नाही की,कोण्या एका चित्रपटामुळे तुटेल.या संबंधी एक बाब महत्वाची आहे ती म्हणजे
या सगळ्या गोष्टी ते लोक बोलत आहेत ज्यांनी अदयापपर्यंत हा चित्रपट बघितलेला नाही
कारण हा चित्रपट सध्या प्रदर्शितच झालेला नाही.या चित्रपटात काय आहे आणि काय नाही
हा वेगळा विषय आहे,मात्र विना चित्रपट पाहता काही मत व्यक्त
करणे हे फक्त घाईचेच नाही तर चूकीचे सुद्धा आहे.खरंतर माझा विषय हा त्या लोकांशी
संबंधित आहे जे या चित्रपटाचा विरोध करणा-या लोकांना हा तर्क देवून रोखत आहेत की
राणी पद्मावती ही केवळ कथा आहे.शक्यता आहे की,आपण म्हणाल की
आपल्या घटनेने अभिव्यक्ती स्वतंत्रता दिली आहे आणि कोणालाही आपले मत व्यक्त
करण्याचा अधिकार आहे.निश्चितच कोणत्याही विषयावर अभिव्यक्ती स्वत्रंतेच्या आधारावर
प्रत्येक व्यक्ती आपले मत व्यक्त करू शकतो मात्र इतिहासाच्या बाबतीतही अस करण्याची
सवलत असावी का?लोकशाही,मानवतावादी
मूलतत्वांची आदर्श मार्गदर्शिका असलेल्या आपल्या घटनेत भाषण व अभिव्यक्ती
स्वातंत्र्य प्रदान करताना इतरांच्या अभिव्यक्तीची जोपासना करत,त्यांचे अधिकार,श्रद्धा अबाधित राखत तुम्ही तुमच्या
अधिकारांचा उपभोग घेवू शकता,ही प्रगल्भ जाणीव करून देण्यात
आलेली आहे हे विसरून चालणार नाही.
इतिहासाचा अर्थ असा आहे की,जे खरंच घडलेले आहे आणि त्यात पुन्हा बदल
होवू शकत नाही.इतिहासाच्या अभ्यासानेच कोणत्याही देशाच्या वा समाजाच्या भूतकाळाला
समजण्यासाठी मदत मिळत असते.या माध्यमातूनच आपल्याला कळते की,कोणताही
देश वा समाज आपल्या दिर्घ कालावधीत कशा प्रकारे विकसित झाला,त्यांचे
शौर्य कसे होते,त्यांची जीवनशैली कशी होती इत्यादी.इतिहास हा
सत्यावर आधारित असतो आणि या सत्याला लिहिणा-यांचा एक कथाकार म्हणून निश्चितच
सन्मान झाला आहिजे पण इतिहासाला नाकारून त्याला केवळ एक कथा म्हणने चूकीचे आहे.आज
जे लोक कोण्या एका विदेशी इतिहासकाराचा आधार घेवून म्हणत आहेत की,राणी पद्मीनी कोण्या एका कविच्या कल्पनेतून अवतरलेली कल्पना आहे त्यांनी एकदा
चित्तोडच्या किल्ल्याला भेट दिली पाहिजे आणि तेथील जौहर कुंड बघितला पाहिजे.त्यांनी
तेथील महिलांशी बोलल पाहिजे ज्या आजही राणी पद्मीनी आणि त्यांच्यासोबत जौहर
करणा-या महिलांच्या शौर्याचा गुणगान आपल्या मुलांकडे करताना थकत नाहीत.
पराक्रमाचा हिमालय उभा
करणा-या राणी पद्मीनी अर्थात पद्मावतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा करणारे हेच
लोक आहेत जे मागे म्हणत होते की,भगवान
श्रीराम मात्र केवळ एक कल्पना आहेत आणि ते केवळ रामायण आणि श्रीरामचरित्रमानस
सारख्या काव्यग्रंथांचा केवळ पात्र आहेत.जरा विचार करा की,हा
हल्ला कोण्या राजपूत वा क्षत्रिय घराण्यावर नाही तर त्या गौरवशाली सनातन
परंपरेच्या इतिहासाला नष्ट करण्याचा कुत्सित प्रयत्न आहे ज्यात समर्पण ही आहे,प्रेमासोबत त्याग ही आहे,धाडसासोबत करुणाही आहे,आत्मसन्मानासोबत कर्तव्यबोधही आहे,ज्यात वीरतेसोबत
धैर्यही आहे,चातुर्यासोबत नैतिकताही आहे,ज्यात कर्मठतेसोबत दूरदृष्टीताही आहे,ज्यात
शालिनतेसोबत प्रेरणाही आहे,ज्यात निष्पक्षपातीपणासोबत
स्पष्टताही आहे,ज्यात सत्कर्मासोबत समजदारपणाही आहे.
आज चर्चेचा विषय हा नसला
पाहिजे की,भारतीय इतिहासाचे हे शत्रू
जे लिहीत आहेत,जे बोलत आहेत ते वाचावे अथवा ऐकावे की नाही.आज चर्चा यावर झाली नाही पाहिजे की,असे लोक जे करत
आहेत याचा स्विकार केला पाहिजे की नाही.चर्चा या गोष्टीवर नाही झाली पाहिजे की,केवळ एक चित्रपट बनवल्याने कोणी समुदाय विशेष धोक्यात येतो की नाही.चर्चा
या गोष्टीवर झाली पाहिजे की,इतिहासासोबत छेडछाड स्वीकाहार्य
केली पाहिजे की नाही.या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी राणी
पद्मावती या ऐतिहासिक चरित्रावर आधारित कथानकात वाटेल तसे बदल केल्याचा आरोप होत
आहे.खरंतर इतिहासाचा अभ्यास न करता त्याचे धंदेवाईक सादरिकरण करण्याचा पराक्रम
त्यांनी या अगोदरच केला आहे.यापूर्वी बाजीराव-मस्तानी या चित्रपटात इतिहासाचे
विकृतीकरण त्यांनी केले होते.मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद असलेले पहिले बाजीराव
पेशवे रणधुरंधर म्हणून ओळखले जातात.या सेनानीची पत्नी एका नृत्यांगनेसोबत दरबारात
नृत्य करेल का?त्यांची पत्नी काशीबाई या एका पायाने अधू
होत्या,मग त्या असे नृत्य कसे काय करू शकणार?
जिथपर्यंत पद्मावती
चित्रपटाचा विषय आहे,जर यात असं
काही आहे ज्यामुळे भारतीय इतिहासाच्या स्वाभिमानावर कलंक लागेल तर निश्चितच हा
चित्रपट बनवणा-या व्यक्तीला शिक्षा मिळाली पाहिजे मात्र काय खरे आणि काय खोटे हे
समजण्यासाठी चित्रपट तर प्रदर्शित होवू द्या.असही होवू शकत की,जो राजपूत स्त्रीयांचा स्वाभिमान मेवाडच्या गल्ल्यांपर्यंत सिमीत राहिला
आहे त्याची गौरवगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत पोहचेल.आणखीन
एक गोष्ट म्हणजे या चित्रपटाला घेवून जे कथित राजपूत प्रतिनिधी आंदोलने करित आहेत
त्यांना हे समजल पाहिजे की,राणी पद्मावती या केवळ राजपूत
समाजाच्या स्वाभिमानाच्या प्रतीक नाहीत तर त्या भारताच्या स्वाभिमानाच्या प्रतीक
आहेत.आज जाती,धर्म आणि संप्रदायाच्या नावावर आपण या महान
व्यक्तींना वाटून घेतले आहे.कमीत-कमी देशाच्या शौर्याला आणि स्वाभिमानालातरी
जातीच्या नावावर कोणीच वाटून घेवू नका.
-सुरेश मंत्री.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा