संकट कधीच सांगून
येत नाही.ज्या गोष्टींबाबत कधी आपल्या पूर्वजांनीही कधी विचार केला नसेल त्याही
अचानक संकटात येतात. जगात वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत त्याप्रमाणे संकटेही
वेगवेगळ्या प्रकारची असतात हे आपल्याला विसरून चालणार नाही.सरळ शब्दात सांगायचे
झाल्यास जग हे नानाविध संकटांनी आणि त्यांचा सामना करणा-या शूर-विरांनी भरलेले
आहे.नुकतेच काहीं दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार
परिषद घेवून त्यात ज्याप्रकारे लोकशाही संकटात असल्याची आशंका व्यक्त केली
त्यामुळे मला सुद्धा नैतीक बळ मिळाले आहे की, मी सुद्धा माझ्या
वैवाहिक जीवनातील संकटांबाबत काही गोष्टी आपल्यासमोर ठेवू ईच्छीतो. या जगात मी काही
एकटा पति नाही जो या संकटाला झेलत असेल. जवळपास सर्व प्रकारचे पति या संकटाला झेलत
रोजचे जीवन जगत,मरत व्यतीत करीत आहेत.माझे हे वैयक्तीक मत आहे की, वैवाहिक जीवनातील अडचणी संकटापेक्षा वेगळ्या
नाहीत. या संकटाची तलवार सतत डोक्यावर लटकत असते.पति होण्याच्या नात्याने या
संकटाला मी रोज कसे तोंड देतो हे माझे मलाच माहित.
पहिल्यांदा मलाही
वाटत होते की,वैवाहिक जीवनात आनंद ही आनंदआहे.या जीवनात प्रेम
ही प्रेम आहे, प्रेमाशिवाय काही नाही. जीवनात चोविस तास वसंतही
वसंत आहे.सुरूवातीला पत्नीच्या हट्टात माझ्याप्रती मला सन्मान दिसत होता. तिच्या या
हट्टांना पूर्ण करण्यासाठी मी जीवनात जेवढी तत्परता दाखवली तेवढी शालेय जीवनात
उत्तीर्ण होण्यासाठी कधी दाखविली नसेल. मात्र काळ जस-जसा लोटत गेला तस-तसे सर्व
काही बदलत गेल. स्वत:च स्वातंत्र्य धोक्यात असल्याची जाणिव होवू लागली. रंग बेरंग
होवू लागला. कधी-कधी अस वाटते की,कोणत्या संकटात
येवून फसलो मात्र आता काहीच होवू शकत नाही न. एकवेळेस आपण समाजात जावून लोकशाही
धोक्यात असल्यामुळे या विरोधात आवाज उठवू शकतो मात्र आपली पत्नी वा वैवाहिक
जीवनाच्या विरोधात बोलण्याची हिंमत बांधू शकत नाही. अहो, जग काही म्हणेल अथवा आपल्यावर हसेल याअगोदर आपली
पत्नी वा कुटुंबीयांनी आपले तीन तेरा वाजवलेच समजा.
मी असे बरेच
मोठे-मोठे लोक बघितले आहेत जे मंचावरून मोठी-मोठी क्रांतीकारी भाषणे देतात आणि घरात
गेले की,पत्नीपूढे
गरीब गाय होवून बसतात माना त्यांना काही माहीतच
नाही, समाज
वा देशात काय चालले आहे. आपल्या वैवाहिक
जीवनाची लोकशाही धोक्यात असल्याबाबत ते कधी ब्र सुद्धा काढणार नाहीत मात्र
घराबाहेर पडले की देशाची लोकशाही धोक्यात असल्याबाबत संपूर्ण देशात हाहाकार माजवून
देतील. यामुळेच तर मी देशाच्या लोकशाहीची चिंतासोडून आपल्या वैवाहिक जीवनाची
लोकशाही अबाधित ठेवण्याकडे कटाक्षाने लक्ष देत असतो. तसा मी भारताच्या लोकशाहीच्या
बाबतीत निश्चिंत आहे. आपल्या देशाची लोकशाही कधीच धोक्यात येवू शकत नाही. आता तर
देशात ५६ इंच छातीची सरकार आहे,जी देशाची लोकशाही
अबाधित ठेवण्यासाठी कटीबद्ध आहे. या सरकारने पाकिस्तान आणि चीनची कशी पूंगी वाजवली
हे तर आपण बघितले असेलच. अमेरिका आपल्या लोकशाहीने प्रभावित झाली आहे तर नुकतेच
इस्त्राईलचे पंतप्रधान आपल्या लोकशाहीची भरभरून प्रंशसा करून आपल्या मायदेशी परतले
आहेत.
आपली लोकशाही किती
भक्कम आहे याची चूणूक पंतप्रधान मोदींच्या विदेश दौ-यांवरून दिसून येत आहे. संपूर्ण
जगात भारताच्या लोकशाहीची चर्चा आहे आणि ईथे काही लोकांना भारताची लोकशाही धोक्यात
असल्याची जाणिव होत आहे. आश्चर्यच आहे! मी तर
म्हणतो, आपल्या वैवाहिक जीवनाच्या स्वातंत्र्याला वाचवणे
महत्वपूर्ण आहे कारण यावरच माझा-आपला जीवनाचा आनंद टिकून आहे.ही लोकशाही वाचली तर
असे माना देश, समाज आणि दूनियेत सर्व काही व्यवस्थित आहे. देश
आणि सरकारच्या बाबतीत नाराजी ठेवली जावू शकते मात्र आपल्या पत्नीच्या बाबतीत
नाराजी व्यक्त करणे म्हणजे आपल्या पायावर स्वत:च धोंडा मारून घेणे किंवा विनाशकाले
विपरीत बुद्धी म्हणता येईल. याला विनोद समजू नका. मी शंभर टक्के खरे बोलतो
आहे. आपल्या वैवाहिक जीवनाच्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवा. देशाची लोकशाही
वाचवण्यासाठी आपली सरकार आणि सेना सक्षम आहे. निश्चिंत रहा.
-सुरेश मंत्री,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा