अनुष्का शर्मा आणि
विराट कोहली यांच्या प्रेम संबंधाची परिणीती लग्नामध्ये झाली या गोष्टीला जास्त
दिवस झाले नाहीत..त्यांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण देशात त्यावेळी मोठया उत्साहाने
होत होती. त्यांची पहिली भेट ते लग्नापर्यंतच्या प्रवासाची चर्चा सगळ्या न्यूज चॅनल, वर्तमानपत्रे
आणि सोशल मीडियावर घडवून आणली जात होती.आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
त्यांच्या लग्नाच्या स्वागत सभारंभाला हजेरी लावून या नवविवाहित दांपत्याला भावी
जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.या जोडीचा एक-एक फोटो प्रेमाच्या यशस्वीतीचे उदाहरण
म्हणून बघीतले जावू लागले. मात्र याच्या काही दिवसानंतर आणि वैलंटाइंस दिवसाच्या
अगोदर अंकित नावाच्या तरूणाची दूस-या धर्माच्या मुलीसोबत प्रेम करण्याचा गुन्हा
केल्यामुळे खुलेआम हत्येची बातमी येते तिही देशाची राजधानी दिल्लीत घडलेली.एकीकडे
आपला समाज प्रेमाचा आनंद साजरा करतो तर दूसरीकडे याच प्रेमाला सहन करू शकत नाही हा
किती विरोधाभास आहे.
याचा अर्थ असा की,प्रेम चित्रपटात,सेलीब्रेटीजचे
किंवा इतर कुणाचे असेल तर ते चांगले वाटते मात्र आपल्या कुटुंबात त्याने आपले पाय
पसरू नयेत. आपल्या घराचा उंबरठा ओलांडताच त्याला पायदळी तुडवले जाईल. आता वेळ आली
आहे की आपण भारतीय प्रेमाच्या संबंधातील आपल्या मनातील मळ चांगल्या त-हेने स्वच्छ
करू.हे खरे आहे की, प्रेमासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नाही केवळ
त्याचा योग्य अर्थ लक्षात घ्यायला हवा. मात्र भारतीय समाजात वैलंटाइंस दिवस हा
प्रेमाच्या अभीव्यक्तीचा दिवस बनून राहिला आहे. सतत विरोध होवूनही या दिवसाला साजरा
करणा-यांची संख्या दरवर्षी वाढतच चालली आहे. याहीवर्षी या दिवसाला अनूसरून कोटयावधी
रुपयांचा बाजार झाला. आपले प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आणि भेट वस्तू यांचा
वापर करून प्रेमींनी आपाअपल्या पद्धतीने प्रेम व्यक्त केले.या वस्तू खरेदी
करणा-यात मग आपल्या घरातील कोणीच नसेल असे आपल्याला का वाटते?
अनेकांनी तर आपल्या
प्रियकराला अथवा प्रेयसीला या दिवशी शुभेच्छा न देता आपल्या आई-वडिलांना शुभेच्छा
दिल्या. यात त्यांचे काहीच चूकले नाही कारण दिवस फक्त प्रेमाचा होता मग ते
प्रियकर-प्रेयसीतील असो, पती-पत्नीतील असो वा आपले आणि आई-वडिलातील असो. जी
लोक या दिवसाला आपल्या माता-पित्यासोबत जोडतात ती आपल्या अज्ञानाचा परिचय देतात. आई-वडिलच्या
प्रती खरे पेम काय आहे हे जाणण्यातही आपली चूक होत गेली आहे. आपल्या भारतात आई-वडिच्या
प्रती पूर्वापार चालत आलेले कर्तव्य निभावणे म्हणजेच प्रेम मानले गेले आहे. त्यांची
प्रत्येक गोष्ट मान झुकवून, आपले मत व्यक्त न करता मानने यालाच
त्यांच्याप्रती असलेले प्रेम समजले गेले आहे.
या प्रक्रीयेत मुल
आणि आई-वडिल यांच्यात कोणत्याही स्वस्थ संवादाची शक्यता दिसून येते का? आज्ञाकारी मुलगा किंवा मुलगी बनणे म्हणजेच
आई-वडिलांप्रती खरे प्रेम आहे? आई-वडिलांसोबत
मुलांचे नाते तेंव्हाच दृढ बनते जेंव्हा दोन्ही पक्ष एक-दूस-याला समजून
घेतात. त्यांच्यामध्ये स्वस्थ संवाद होत असेल. कर्तव्य निभावण्याला बाजूला ठेवून एक
दूस-याच्या मनातील गोष्टी समजून घेत असतील. केवळ मुलं मोठी होत नाहीत तर
त्यांच्यासोबत आई-वडिलही मोठी होत जातात हे उगाच म्हटले जात नाही. अशाच जागी प्रेम
निर्माण होते. नाहीतरी आपल्या देशात अधिकाधिक नाती आपल्या कर्तव्य पूर्तीच्या
नावावर निभावली जातात. आई-वडिलांसोबत वैलंटाइंस दिवस साजरा करताना आपण स्वत:लाच
प्रश्न विचारला पाहिजे की, खरंच आपल्यातप्रेम निर्माण झाले आहे की नाही की
अस आहे आपला सर्व खटाटोप एक चांगली मुलगी किंवा चांगला मुलगा दाखवण्यापर्यंतच
मर्यादित आहे.
कोणत्याही नात्याची
खरी कसोटी आपण स्वत:च आहात.याशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीला कसोटी बनवून मग ते
प्रियकर-प्रेयसी असो वा आई-वडिलांसोबतच्या नात्याचे मोल मोजण्याचा प्रयत्न केला
जात असेल तर आपण हे चूकीच करत आहात. भारतात तर या दिवशी प्रेमी युगलांच्या प्रती
लोक तिरस्काराने बघतात. अंकित सोबत जे झाले त्यावरून असे दिसते की, जगाला अहिंसा आणि प्रेमाचा धडा देणा-या हा देश
नविन पिढी सोबत अशा प्रकारची हिंसा का करत आहे? अंकीतच्या या प्रेम प्रकरणाला माझा धार्मिक
रंग देण्याचा कसलाच हेतू नाही. अनेकांनी मात्र याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न
केला. मग त्या शेकडो-हजारो प्रेमी युगलांच्या मृत्यूला आपण कोणता रंग द्याल ज्या
एकाच धर्मातील असताना सुद्धा केवळ जाती आणि वर्ण भेदामुळे रोज होत आहेत? आपण हे का लक्षात घेत नाही की, अंकितचे जीवन धार्मिक
द्वेष आणि दुर्भावनेमुळे संपले नाही तर यामागे आपल्या समाजाची ती विचारधारा आहे जी
प्रत्येक धर्मात आहे.दूस-या धर्माच्या मुलीवर प्रेम केले म्हणून केवळ अंकितच मारला
गेला नाही तर यापूर्वीही प्रेम करण्याची किंमत अनेकांनी आपला जीव गमावून दिली
आहे. आपण आपल्या आसपास बघितले तर अशी कितीतरी उदाहरणे दिसतील जिथे धर्म तर सोडाच
सजातीतसुद्धा प्रेम करण्यावरून अनेकांचे जीवन त्यांच्या कुटुंबीयांनी संपविले आहे. ज्या संस्कृतीला वाचवण्याच्या नावाखाली अशा हिंसा
केल्या जात आहेत ती संस्कृतीतरी प्रेमाशिवाय जीवंत राहू शकेल?प्रश्न हा ही आहे की,प्रेमामुळे कुणाच्या सत्तेला धोका आहे?
कोणत्याही
संस्कृतीचा आधार हा प्रेम आहे. प्रेमामुळेच संस्कृती बहरत जाते. या संस्कृतीचे
स्वयंघोषीत ठेकेदार प्रेमाविना समाजात कोणत्या पद्धतीने सांमजस्य कायम ठेवू शकतात? यांच्याकडे सद्भावनेला जागा नाही का?प्रेमापासून वंचित असणारे हे कोण लोक आहेत जे
जगालाही प्रेमापासून वंचित ठेवू ईच्छीतात? कोणत्याही दिवसाला विशेष म्हणून साजरा करणे न
करणे संपूर्णपणे वैयक्तीक बाब आहे. वैलंटाइंस दिवस साजरा न करून कोणी कमी आधुनिक
होणार नाही आणि साजरा करूनही कोणी जास्त आधुनिक होणार नाही. दोन्ही स्थितीत
प्रेमाचा खरा अर्थ सजजून घेणे हा एकमेव पर्याय आहे. फक्त पैसा आणि शक्तीची भाषा
समजणा-या या काळात प्रेमाला स्विकारून आपण स्वत:ला आतून वाचवू शकाल आणि आपल्या या
कृतीमुळे आपली संस्कृती आणि जग वाचेल.
-सुरेश मंत्री.

Khupch sundar aani vastav !
उत्तर द्याहटवाThx Sir
उत्तर द्याहटवा