उत्तरप्रदेशच्या
पोलीस विभागात चतुर्थ श्रेणी संदेशवाहक म्हणजे चपराशी पदाच्या ६२ रिकत जागांसाठी
नुकतीच जाहिरात देण्यात आल्यानंतर ९३ हजार लोकांनी या पदासाठी अर्ज केले.या
आकडयावरून देशातील बेरोजगारी किती वाढली आहे हे दिसून येते.या ठिकाणी नमूद
करण्याची विशेष बाब म्हणजे या मुठ्ठीभर जागांसाठी अर्ज करणा-यात ५० हजार पदवीधर,२८ हजार उच्च पदवीधर आणि ३७०० पीएचडी धारक
आहेत.या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता फक्त पाचवी उतीर्ण आहे मात्र अर्ज
करणा-यात पाचवी ते बारावी पास उमेदवारांची संख्या ९३ हजारांमधून केवळ ७४०० आहे.अर्जाची
ही आकडेवारी अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण करते.अस असू शकत की या ९३ हजार
उमेदवारांपैकी सगळेच बेरोजगार नाहीत.यापैकी काही जण अपेक्षीत वेतन मिळणा-या खाजगी
क्षेत्रातील पदावर काम करणारे असे शकतात.युवकांमध्ये खाजगी क्षेत्रातील
नौकरीपेक्षा सरकारी नौकरीला प्राधान्य देण्याची मानसिकता सध्या जास्त असल्यामुळे
त्यांनी सुद्धा अर्ज केले असतील तरीसुद्धा यावरून देशातील बेरोजगारी वाढत चालली
आहे हे नाकारून चालणार नाही.
आपण आता हे लक्षात
घेतल पाहिजे की सरकारी नौक-या आता खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.नुकतच केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी नौक-या राहिल्यात कुठे? अस केलेले विधान याचेच द्योतक आहे.निवडणूका
येताच प्रत्येक राजकिय पक्षांकडून मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची
आश्वासन दिली जातात नंतर मात्र ही आश्वासन हवेत विरतात.सरकारकडून रोजगार उपलब्ध
करून दिल्याची दिली जाणारी आकडेवारी सुद्धा फसवी असते.
ज्या पदासाठी केवळ
पाचवी पास शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे त्या पदासाठी पीएचडी धारक उच्च
शिक्षीत युवक अर्ज करत आहेत याचा एक सरळ अर्थ असा होतो की ते आर्थिकदृष्ट्या
अत्यंत दुर्बल अथवा सामाजिक रूपाने वंचित असणा-या वर्गाची हिस्सेदारी हिरावून घेत
आहेत कारण याच वर्गातील मुलं पाचवीनंतर शाळाबाहय होवू शकतात.देशाच्या शैक्षणिक
स्थितीबद्द्ल सुद्धा यावरून प्रश्नचिन्ह निर्माण होते.पदवी,उच्च पदवी,एमफिल,पीएचडी सारख्या पदव्या आता चपराशी पदासाठी लाचार झाल्या
आहेत हा नक्कीच चिंतेचा विषय आहे.याचा अर्थ असा होतो की,केंद्र आणि राज्य सरकारच्या कौशल्य विकास योजना
कुचकामी ठरत आहेत.
हे उघड आहे की,सर्वात कनिष्ठ पदासाठी अर्ज करणारे हे ३७००
पीएचडी धारक नक्कीच रिकामटेकडे नसतील ते खाजगी क्षेत्रात काम करत असतील.जेंव्हा
पीएचडी सारखे उच्च शिक्षण घेतल्यानंतरही चपराशीची नौकरी हे स्विकारायला तयार होतात
तेंव्हा खाजगी क्षेत्रासाठी बनवलेले कामगार कायद्यासारखे कायदे यासाठी किती
जबाबदार आहेत हे दिसून येते.खाजगी क्षेत्रात नौकरीची सुरक्षितता नाही.कुणाची नौकरी
कधी जाईल हे माहित नसत.दूसरीकडे सरकारी नौकरीच आकर्षण युवकात जास्त आहे कारण इथे
निवृत्त होईपर्यंत नौकरीवर कायम असण्याची आणि चांगले वेतन मिळण्याची हमी आणि
सुरक्षितता जास्त आहे.याच कारणामुळे उच्च शिक्षित तरूण योग्य हुद्द्यावरिल खाजगी
क्षेत्रातील नौकरी करण्याऐवजी चपराशी अथवा चतुर्थ श्रेणीमधील पदावर सुद्धा काम
करण्यासाठी तयार होत आहेत.
पीएचडी पदवी धारकांना जर आपल्या
शिक्षणारूप रोजगार मिळत नसेल तर देशात चांगल्या नौक-यांची कमतरता आहे हे आपण मान्य
करायला हव किंवा शिक्षण आणि नौकरीचा समन्वय साधला जात नाहीय अस म्हणायला हरकत नाही.यूजीसीच्या संकेतस्थळावर मी जावून माहिती घेतली
तर असे दिसून आले की,२०१६-१७ मध्ये जवळपास दोन लाख युवकांनी विद्यापीठ
आणि संबंधित महाविद्यालयात पीएचडी करण्यासाठी प्रवेश घेतला.सर्वात जास्त २७ टक्के
इंजीनियरिंग मध्ये,२६ टक्के विज्ञान शाखेत आणि २० टक्के कला शाखेत
नोंदणी झाली.या अगोदरच्या वर्षात म्हणजे २०१५ मध्ये २७,६८९ विद्यार्थ्यांना विविध विषयात पीएचडी प्रदान
करण्यात आली.प्रश्न हा आहे की,प्रत्येक वर्षी या
पीएचडी धारकांच्या शोधावर प्रामाणिकतेची मोहर लावल्यानंतरही स्वातंत्र्याच्या ७१
वर्षानंतरही नव्या सिद्धांतांच्या बाबतीत आपण इतके कोरे का आहोत?आपण दावा करतो की,शून्याचा
शोध भारतात लागला.खगोल विज्ञानातील रहस्य शोधण्यात आपण जगात पूढे राहिलो आहोत
मात्र आज एवढी संपन्नता,सुविधा आणि संपर्काची एवढी माध्यमे आसताना आपला
ज्ञानाचा झरा आटत का चालला आहे?भारतात संशोधन फक्त उपयोजित होत आहेत मात्र मूलभूत
संशोधनावर कसलाच भर दिला जात नाहीय.
देशातील विद्यापिठ आणि त्याअंतर्गत येणा-या विस्तार
केंद्रात संशोधनासाठी असणा-या सूविधा फक्त कागदावर आहेत.अनेक ठिकाणी आवश्यक
सूविधाच नाहीत तर कुठे योग्य कर्मचारीच नाहीत.देशातील पीएचडी करणा-या संशोधकांच्या
विद्या वेतनावर कोट्यावधी रूपये आत्तापर्यंत सरकारने खर्च केले आहेत तरीसुद्धा या शोधकर्त्यांचा
समाज आणि सरकारला काय फायदा उठविता आला?हे संशोधनकर्ते
आता समाजासाठी कोणते मौलिक कार्य करत आहेत?आपले उच्च शिक्षण
केवळ भ्रष्टाचाराने युवकांना पीएचडीने दिक्षीत करत आहे.लाखो रूपये खर्च केले की
पीएचडी कसलेही संशोधन न करता मिळवता येते हे सत्य आहे.आपल्या आसपास भ्रष्टाचार बघणा-या
या युवकांना मग असे वाटते की,बेरोजगारीच्या या समुद्रात
हात-पाय मारण्याऐवजी ऐनकेन प्रकारे काही जुगाड लावून सरकारी नौकरीला विनोद बनून
चिकटलं तर आपल जीवन सार्थक होईल.देशातील पीएचडी धारक जर चपराश्याची नौकरी करण्यात
धन्यता मानत असतील तर नक्कीच देशातील शिक्षणाची अवस्था वाईट आणि परिणामी देशाचे
भवितव्य अंधकारात आहे.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा