मुख्य सामग्रीवर वगळा

विवाह संस्थेवरिल वाढता विश्वास


असं म्हणतात की,या पृथ्वीवर ८४ लाख योनी आहेत आणि या योनी पार केल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो.मनुष्य हा सर्व सजिवात श्रेष्ठ आहे हे सर्वांनाच माहित आहे.मनुष्य आपली निष्ठा,कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडण्याच्या प्रवृतीमुळेच सर्वश्रेष्ठ आहे.वैवाहिक जीवन स्विकारणे हे याच जबाबदा-यांपैकी एक आहे.याच जबाबदारीत दोन अनोळखी जीव सोबत राहणे,सुख-दु:खात वाटेकरी होण्यासोबत मरेपर्यंत एकमेकांची सोबत न सोडण्याची शपथ घेतात सोबत अपत्यांना जन्म देवून आपला वंश पूढे वाढवितात.विवाहाची ही परंपरा जवळपास सर्व जगात वेगवेगळ्या रुपाने कार्यरत आहे.मध्यंतरीच्या काळात युवक पिढीचा विवाह संस्थेवरिल विश्वास उडत चालला होता आणि त्यांचा लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याकडे कल वाढत चालला होता  मात्र नजिकच्या काही उदाहरणांवरून युवकांचा विवाह संस्थेवरिल विश्वास वाढल्याचे दिसून येत आहे.
 युवक आपले अर्धे आयुष्य लग्न न करता घालवतात ही आता ही सामान्य गोष्ट झाली आहे मात्र दिपीका पदुकोण आणि रणविर सिंह,अनुष्का-विराट कोहली,सोनम-आनंद आहुजा यासारख्या अनेक सेलीब्रेटीजनी स्वत:ला मागिल काही दिवसात लग्नाच्या बेडीत बांधून घेतले आहे.बॉलीवुड सोबत हॉलीवुड मध्ये यशस्वी झालेल्या प्रियंका चोप्रानेही आपला विदेशी प्रियकर निक जोन्स सोबत विवाह करून संसार थाटला आहे.या सेलीब्रेटीजना कशाची कमी होती की,त्यांनी विवाह संस्थेत विश्वास दाखवला.यांना विना विवाह करता जोडीदाराची कमी होती की ते आय.बी.एफ. तंत्रज्ञानाद्वारे अपत्याला जन्म देवू शकले नसते.या स्टार लोकांनी विवाह संस्थेला स्विकारले यामागे निश्चितच काही खास कारण असेल.
जबाबदा-या मनुष्याला मनुष्य बनवतात.या पृथ्वीवर ईतर प्राण्यांनी सुद्धा जन्म घेतला असून सुद्धा आपण मनुष्य त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ का आहोत? कदाचित यासाठी की,आपण जबाबदारी उचलतो,कुणाच्यातरी प्रती समर्पित राहतो.आपल्या ग्रंथातही सांगितल आहे की,विवाहाचा उद्देश विषयाशक्ती पासून मूक्त होवून क्रमश: ईश्वराकडे वाटचाल करणे आहे.याचा सरळ अर्थ हा आहे की,आपण जर कुणाच्या सोबत विवाह बंधनात अडकतो तेंव्हा संयम धारण करण्याची क्षमता आपोआप वाढत जाते.आपण विषय विकारांपासून दूर होवून कुण्या एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करू लागतो.या गुणांमुळेच आपल्याला मनुष्य म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो.यात काही शंका नाही की,आपण ज्या समाजात राहतो तो समाज मानव जातिच्या अविरत प्रयत्नांनी,संघर्षांमुळे बनला आहे.यात विवाह संस्थेची मुख्य भुमिका राहिली आहे.
ज्यावेळी मानवाच्या लक्षात आले की,तो एकटा राहण्याऐवजी जमावात राहिला तर अधिक सुरक्षित राहू शकतो तेंव्हा समाज तयार झाला.या समाजात समरसता राहण्यासाठी त्याने काही नियम बनवले त्यापैकीच एक विवाहाचे नियम आहेत.असं मानल जात की,मानव समाजात विवाहाची सुरूवात १३ व्या शतकात झाली.त्यापूर्वी कोणत्याही पुरुषाला कोणत्याही महिलेसोबत संबध ठेवण्याचे अधिकार होते.हिंदू समाजात हा विचार पूढे आला की,त्यांची मुल त्यांच नाव पूढे चालवती,त्यांच्या संपत्तीची देखरेख करतील सोबत वृद्धावस्थेत सांभाळ करतील.फक्त भारतातच नाही तर पाश्चिमात्य देशात सुद्धा विवाहाची परंपरा आहे,विवाह संस्थेत विश्वास आहे.आपल्याला आठवत असेल की,जेंव्हा हॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता ब्रेड पिट आणि एंजलिना जोली यांचा काडीमोड झाला होता तेंव्हा ब्रेड पिट डिप्रेशन मध्ये गेला होता.यामुळे जर कुठे काही कारणाने एखादा विवाह अयशस्वी झाल्याची बातमी येते त्यावेळी आपण नकारात्मक विचार न करता विवाह संस्थेच्या सकारात्मक बाबींकडे बघितले पाहिजे.जगात विवाह संस्थेची जागा घेईल अशी कोणतेही व्यवस्था नाही यात काही शंका नाही.नक्कीच हे सेलीब्रेटीज स्वत:ला एक आदर्श पती-पत्नी सिद्ध करून युवक पिढीच्या समोर एक आदर्श निर्माण करण्यात यशस्वी होतील.
-सुरेश मंत्री   

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा