चैत्र महिन्यापासुन वसंत ऋतुच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो. चैत्र महिन्यात हिंदू धर्मातील अनेक पवित्र आणि धार्मिक सण, उपवास इत्यादी पदार्पण करतात. गुढी पाडवा हा एक भारतीय सण असून याच महिन्यात शुद्ध प्रतिप्रदेला महाराष्ट्रासह इतर काही ठिकाणी साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असल्याने हिंदू नववर्षाची सुरुवातही याच दिवसापासून होते. गुढी पाडवा दोन शब्दांच्या मिलनातून बनलेला आहे. गुढी या शब्दाचा अर्थ 'विजयाचा ध्वज' आणि पाडवा म्हणजे 'प्रतिपदा'. या दिवशी घरा-घरात गुढी उभारली जाते. ही प्रतिकात्मक गुढी आनंदाचे, सुखाचे, सकारात्मकतेचे प्रतिक म्हणून पुजली जाते. या पवित्र दिवशी लोक आंब्याच्या पानांचे तोरण बनवून आपल्या घराचे दरवाजे सजवतात आणि असे मानले जाते की त्यांच्या घरात हे तोरण बनवल्याने सुख, समृद्धी आणि आनंद मिळतो.
या पवित्र सणाच्या निमित्ताने लोक सकाळी
लवकर उठतात,
बेसन आणि उटणे लावून स्नान करतात. या दिवसापासून नविन मराठी
वर्षाची सूरूवात होत असल्याने साहजिकच पारंपारिक वेशभूषेने या सणाचे स्वागत केले
जाते. महिला वेगवेगळ्या प्रकारे साडी परिधान करतात. महिला या दिवशी खास नऊवारी
साडी, नथ, ठुशी असे पारंपारिक दागिने
घालतात तर पुरूष मंडळी धोती, सलवार,
कुर्ता असा पारंपारिक पेहराव करतात. ज्या ठिकाणी लोक गुढी पाडव्याची पूजा करतात,
ती जागा अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि शुद्ध केली जाते. लोक
उंचबांबूच्या साह्याने दारासमोर गुढी उभारतात. या गुढीच्या भोवती रांगोळी आणि इतर सजावट केली जाते, तिच्याकरता पाट मांडला जातो. टोकावर नवे वस्त्र (साडी, ब्लाउजपिस, रूमाल), गाठी, आंब्याची पानं,
कडुलिंबाची पानं, झेंडुच्या फुलांची माळ,
तांब्याच्या धातुचा लोटा अश्या सर्व वस्तुंनी ही गुढी सजवली जाते. गुढी उभारल्यानंतर तिची
पुजा केली जाते. पंचपक्वानांचा नैवैद्य दाखवला जातो. संनव्याने लग्न झालेल्या जोडप्याला गुढीपाडव्याला विशेष मान असतो. या दिवशी संपूर्ण परिसरात एक नवचैतन्य पहायला मिळतं. सर्वांच्याच घराच्या गच्चीवरून, कौलारू छप्परावरुन गुढीची दृश्यं नजरेत भरतात. दिवसभर या गुढ्या प्रत्येकांच्या दारात रुबाबात मोठ्या अभिमानाने उभ्या असतात. संध्याकाळी हळद-कुंकू वाहून गुढी
उतवरवली जाते. गुढीपाडवा हा सण केवळ महाराष्ट्रातच साजरा केला जातो असे तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण भारतभरात गुढीपाडवा साजरा केला जातो. पण साजरा करण्याची पद्धत आणि नाव मात्र वेगळे असते. आंध्रप्रदेश व कर्नाटक मध्ये याच दिवशी उगादी नावाने सण साजरा केला जातो. नवीन वर्षाचे स्वागत म्हणून अत्यंत हर्षोल्हासात दक्षिण भारतीय नागरिक हा सण साजरा करतात. सिंधी लोकं देखील याच दिवशी चेटीचंड नावाचा सण नवीन वर्षाचे स्वागत म्हणून साजरा करतात.
तुम्हाला एखाद्या नवीन चांगल्या उपक्रमाला सुरुवात करायची आहे काय ? मग हा गुढीपाडव्याचा दिवस तुमच्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. याकडे, वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर २१ मार्चला सूर्य विषुववृत्तावर असतो. वसंत संपात बिंदूपाशी असतो. पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रिमान समान असते. वसंत ऋतू असतो. या दिवसा जवळचा चांद्रमहिना सुरू होण्याचा हा दिवस असतो. हा सण साजरा करण्यामागे अनेक श्रद्धा आहेत. गुढी पाडवा हा सण विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला होता त्या दिवशी, म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला लोकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला अशी पारंपारिक समजूत आहे. तर याच दिवशी ब्रम्ह देवाने विश्वाची निर्मिती केली अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे गुढीला ब्रम्हध्वज देखील मानले जाते. आणखीन एका प्रथेनुसार शेतकरी रब्बी पिक काढल्याच्या आनंदात हा सण साजरा करतात व पीक चांगले यावे म्हणून या दिवशी शेताची नांगरणी करतात अशी देखील मान्यता आहे.
चैत्र
शुध्द प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्व आहे. या
दिवशी मीठ,
हिंग, ओवा, मिरी,
साखर आणि कडुलिंबाच्या पानांना एकत्र करून गोळी तयार केली जाते आणि
तीचे सेवन केले जाते. यामुळे पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वेचेचे
आरोग्य सुधारते, त्यामुळे या गोळीचे आयुर्वेदात अतिशय महत्व
सांगितले आहे. कडुलिंबाची पानं या दिवसांमधे अंघोळीच्या पाण्यामधे टाकुन स्नान
करणे चांगले मानले आहे. वेदांग ज्योतिष्य या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहुर्तांपैकी
हा एक मुहुर्त आहे. या दिवशी नविन व्यवसाय प्रारंभ, नविन वस्तू खरेदी, नविन
उपक्रमाचा शुभारंभ तसेच सोने खरेदी केली जाते. गुढीपाडव्यापूर्वी नवीन वर्षाचे पंचांग आणले जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचे पूजन केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवसापासून त्याचा
वापर सुरू होतो.
यंदा
शनिवारी गुढीपाडवा साजरा करण्यात येत असल्याने नववर्षाचा स्वामी शनीदेव राहिल.
यादिवशी समृद्धीयोग तसेच रेवती नक्षत्र आहे. या दिवसापासून युगाब्द ५१२४ ,२०७९ नल संवत्सर आणि आणि श्री
शालिवाहन शके १९४४ चा प्रारंभ होईल. सांगितले जात आहे की, २७ नक्षत्रांपासुन २७
लहरी निर्माण होत असतात. या २७ लहरींपैकी प्रजापति लहरी, यम
लहरी व सूर्य लहरी महत्वाच्या आहेत. या तीनही लहरींचा सृष्टी व प्राणीमात्रांवर
परिणाम होत असतो. या तीनही लहरींचे योग्य व उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढी
पाडव्याच्या दिवशी होत असते. यामुळे गुढी पाडव्याला विशेष महत्व आहे.
सार्वजनिक ठिकाणी गुढी पाडव्यानिमित्त रांगोळ्या, देखावे, शोभायात्रा काढल्या
जातात. शहरातील सर्व समाजातील लोक यात सहभाग घेतात, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि
मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केल्या जातं.
गुढीपाडवा पहाट सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. गेल्या काही वर्षांमध्ये अश्या
प्रकारच्या कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुढीपाडवा हा
खास महाराष्ट्रीयन पदार्थांसाठीही ओळखला जातो. महाराष्ट्रीयन
थाळी म्हटलं की मनात येणारे पदार्थ म्हणजे श्रीखंडपुरी, खीरपुरी,
बासुंदीपुरी, भाजीपुरी, पुरणपोळी,
मसालाभात, कोशिंबीर, चटण्या,
लोणचे, पापड, आलू वड्या,
बत्तावडे किंवा भजी. या महाराष्ट्रीयन डिशमध्ये सर्व प्रकारचे स्वाद
आणि रंग आहेत. जणू काही खाद्यपदार्थ आपल्या चव आणि रंगाने नवीन वर्षाचे स्वागत करत
आहेत. त्यामुळे यंदा गुढीपाडवा साजरा करण्यासाठी काही खास महाराष्ट्रीयन
खाद्यपदार्थ घरीच तयार केले पाहिजेत. ग्रामीण भागात या सणाच्या रुपात एक वेगळाच उत्साह संचारत असतो. शहरी भागात मात्र गगनचुंबी इमारतींची सिमेंटची जंगले निर्माण झाल्याने गुढ्या उभा करायला जागाच शिल्लक राहिली नाही. अगदी बोटावर मोजता येतील इतकी लोकं तीन-चार फुटांची काठी लाऊन आपल्या फ्लॅट पद्धतीच्या घरातील खिडकीत गुढी उभा करतात. तेंव्हा दिवसभरात त्यात अडकवलेली साखरेची गाठी घरातील लहान मुलांनी फस्त केलेली असते. केवळ मुलांना सांगण्यासाठी काही मराठी बांधव गुढीचा हा आटापिटा करतात. एक रूढ-परंपरा म्हणून असा शॉर्टकट गुढीपाडव्याचा आस्वाद घेतला जातो.
आशेची पालवी, सुखाचा मोहर
समृद्धीची
गुढी, समाधानाच्या गाठी...
मराठी
नववर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी.
गुढी
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...
- सुरेश मंत्री.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा