मुख्य सामग्रीवर वगळा

जगावर मंदीचे सावट

कोरोनाच्या संकटाच्या झळा संपूर्ण जगभर बसल्या आहेत. त्यातून आता जग सावरत असतानाच जागतिक मंदीचे सावट घोंगावताना दिसत आहे. एक तर बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यात अनेक ठिकाणी नोकर कपातीवर भर दिला जात आहे. त्यात मोठ-मोठ्या कंपन्याही मागे नाहीत. त्याचा जबर फटका सहन करण्याची वेळ लोकांवर आलेली आहे. त्यामुळे आगामी काळात मंदीचे सावट घोंगावण्याची भीती व्यक्त होत आहे. जगभरातल्या विविध देशातल्या केंद्रीय बँका वेगाने व्याजदर वाढवत आहेत. हे पाहता २०२३ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जाऊ शकते. मंदीच्या भीतीने नोकरदार वर्गामधली भीती आणखीनच वाढली आहे. कारण कोरोना काळात ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावर काढून टाकण्यात आलं, पगार कमी करण्यात आले हे सगळं त्यांच्या डोक्यातून गेलेलं नाही.

आर्थिक पॅकेजच्या नावावर प्रचंड उधळपट्टी, चीनमध्ये कोव्हिड प्रतिबंधामुळे सप्लाय चेन व्यवस्थेवर झालेला परिणाम, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती यामुळे खाद्यान्नाच्या किमती दशकातील सर्वाधिक इतक्या झाल्या आहेत. परिणामी अमेरिकेची केंद्रीय फेडरल बँक, बँक ऑफ इंग्लंड, जपानची केंद्रीय बँक या विकसित देशांमधील शिखर बँकांनी व्याजदर वाढवण्याची तयारी केली आहे. चीनच्या केंद्रीय बँकेने व्याजदर वाढवण्याची तयारी केलेली नाही, पण या बँकेने व्याजदरातली कपात रोखली आहे. व्याजदर वाढवले तर कंपनी आणि सर्वसाधारण ग्राहक दोघांसाठी कर्ज महाग होतं. कंपन्या आपला विस्तार रोखतात. सर्वसामान्य माणूस खर्च कमी करू लागतो. यामुळे मागणी घटते आणि आर्थिक घडामोडींचा वेग मंदावतो. यामुळे अर्थव्यवस्था मंदीत लोटली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक घडामोडी मंदावल्या की त्याचा सर्वाधिक फटका नोकऱ्यांना बसतो. गेल्या आठवड्यात जागतिक बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जागतिक अर्थव्यवस्थेत रिकव्हरीनंतरची सगळ्यांत मोठी घसरण झाली आहे. १९७० नंतर अशी घसरण पाहायला मिळते आहे. अमेरिका, चीन आणि युरोपीय अर्थव्यवस्था अशा जगातल्या ताकदवान अर्थव्यवस्थांमध्ये घसरण पाहायला मिळते आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला थोडासा जरी धक्का बसला तरी जगाला मंदीचा सामना करायला लागू शकतो.

पतमानांकन संस्था फिच ने वर्ष २०२२ आणि २०२३ साठी अमेरिकेच्या आर्थिक वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. अमेरिकेतील महागाई आणि मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात होत असलेली वाढ अमेरिकेला १९९० सारख्या मंदी कडे ढकलत आहे, असे भाकित फिचने व्यक्त केले आहे. पुढील वर्षी अमेरिकेची अर्थव्यवस्था केवळ ०.५ टक्के वाढेल, असा अंदाज फिचच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी जूनमध्ये १.५ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अमेरिकेत मंदीची शक्यता कमी आहे, असा अंदाज फिचच्या अर्थतज्ज्ञांनी वर्तवला होता. परंतु २०२४ मध्ये बेरोजगारीचा दर सध्याच्या ३.५ टक्क्यांवरून ५.२ टक्क्यांपर्यंत वाढेल. म्हणजे लाखो नोक-या बुडतील. मात्र, मागील दोन मंदीच्या तुलनेत ही संख्या कमी राहील, असेही फिच ने म्हटले आहे. फिचने म्हटले की, पुढील वर्षभरात घरगुती उत्पन्न आणि ग्राहक खर्चात घट होण्याची अपेक्षा आहे. यामुळे २०२३ च्या दुस-या तिमाहीत विकास दर घटेल. अमेरिकेत सप्टेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त महागाई वाढली आहे. वाढत्या महागाईच्या दबावामुळे फेडरल रिझर्व्ह पुढील महिन्यात व्याजदर ०.७५ टक्क्याने वाढवू शकते. पुरवठ्यात सुधारणा आणि तेलाच्या किमती कमी होऊनही अमेरिकेतील चलनवाढ फेडरल रिझर्व्हच्या २ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा वरच राहिली आहे.

जगभरातल्या नोकरदार माणसांना नोकरी राहील की नाही याची भीती आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार कोव्हिडच्या आधी जगभरात २५ कोटी पूर्णवेळाच्या नोकऱ्या संपुष्टात आल्या होत्या. जागतिक अर्थव्यवस्थेची आता जी स्थिती आहे ते लक्षात घेता हे चित्र पुन्हा उद्भूव शकतं. यंदा जुलै महिन्यापर्यंत अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील ३२,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट आणि मेटासारख्या मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यातील  प्राइसवॉटरकूपरहाऊसच्या अहवालानुसार जगभरातल्या ५०  टक्के कंपन्या कपातीची तयारी करत आहेत. अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने १ हजार कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये विविध विभागात कार्यरत कर्मचा-यांचा समावेश आहे. कंपनीने मात्र नेमके किती कर्मचारी काढले हे सांगण्यास नकार दिला. मायक्रोसॉफ्टने म्हटले की, इतर कंपन्यांप्रमाणे आम्ही आमच्या व्यावसायिक प्राधान्यांचे नियमितपणे मूल्यांकन करतो. या आधारे संरचनात्मक बदल केले जातात. 

भारतातदेखील महागाई नियंत्रणाचे कारण पुढे करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, प्रत्यक्षात महागाई नियंत्रणात आलीच नाही. तथापि, कर्जदारांना भुर्दंड सहन करण्याची वेळ आली. तसेच भारतीय अर्थव्यवस्थाही सावरण्याऐवजी अधिक गर्तेत अडकत चालली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.भारतात गेल्या सहा महिन्यात स्टार्टअप कंपन्यांनी ११,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. परिस्थिती आणखी चिघळली तर येत्या वर्षअखेरीपर्यंत ही संख्या ६०,००० पर्यंत जाऊ शकते. कपात करणाऱ्यांमध्ये ईकॉमर्स कंपन्या अग्रणी आहेत. यानंतर एडटेक स्टार्टअपचा क्रमांक लागतो. अमेरिका आणि युरोपात मंदी आली तर भारताची निर्यात कमी होईल. यामुळे टेक्सटाईल, ज्वेलरी, पेट्रोलियम प्रॉडक्ट, फार्मा, ऑटोसारख्या पारंपरिक निर्यात क्षेत्राशी निगडीत उद्योगातील नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. मंदी आली तर विदेशी आणि देशांतर्गत पर्यटकांची संख्या कमी होऊ शकते. याचा थेट परिणाम हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला होऊ शकतो. या क्षेत्रात संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातील माणसं काम करतात. यामुळे देशातली बेरोजगारीची स्थिती आणखी चिघळू शकते. कोव्हिडनंतर भारतीय अर्थव्यवस्थेत रिकव्हरीला सुरुवात झाली आहे. पण मंदी आली तर रिकव्हरीचा वेग घटेल. यामुळे देशात रोजगार निर्माण होण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल.

संपूर्ण जग सध्या वाढत्या महागाईवर उतारा काढण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिका आणि युरोपात महागाई गेल्या चार दशकातील सर्वोच्च स्थानी पोहोचली आहे. भारतातही महागाई रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या पातळीच्या वर आहे. कोव्हिडनंतर मागणीत वाढ, युक्रेन-रशिया युद्धामुळे ऊर्जा, इंधन आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे महागाईत वाढच झाली आहे. वाढत्या महागाईने जगातील बहुतांश अर्थव्यवस्थांच्या गळ्याभोवती फास आवळला आहे. जगभरातल्या बँका व्याजदर वाढवून महागाईचा फास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मंदी आली तर मोठा फटका बसेल कारण कोरोनानंतर अर्थव्यवस्था सावरलेल्या नाहीत. नीट वेग पकडलेला नाही. त्यामुळे मंदी आली तर मोठी उलथापालथ होईल.

- सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...