जुनी पिढी म्हणजे अशी माणसं ज्यांच वय साधारणतः ८० ते ९० च्या घरात आहे. आम्ही म्हटलं तर मधल्या पिढीतले ज्यांनी मागच्या पिढीतलं बरच काही जवळून बघितलय आणि नव्या पिढीला अनुभवतोय. अत्यंत समाधानी असणाऱ्या या मागच्या पिढीबद्दल नव्या पिढीला फारसं काही माहिती नाही. येत्या १० ते १५ वर्षांमध्ये ही जुनी पिढी जिचा काळच वेगळा होता ती आपल्याला सोडून जाणार आहे. नव्या पिढीला या जुन्या पिढीतील कळाव म्हणून हा लेख प्रपंच.
उद्याची चिंता नसणारी, अत्यंत समाधानी जगणारी ही पिढी. जी कमी पैशातही आनंदी असायची. लवकर झोपणारी व सकाळी लवकर उठणारी ही पिढी. जिची दिवसाची सुरुवात प्रसन्न पहाटेने व्हायची. भूपाळी ऐकायला मिळायची. सकाळ होताच पक्षांचा किलबिलाट ऐकू यायचा. कोंबडा आरवायचा. दंड-बैठकांना सुरुवात व्हायची. सगळे पुजा-पाठाला लागायचे. आजच्या सारखी धावपळ नव्हती. कुठे जायची घाई नसायची. मोठे ताजी पोळीभाजी घेऊन कामाला जायचे तर लहान हुंदडत शाळेत. स्कुटर, कारचा जमाना नव्हता, दोन पायावर मात्र विश्वास होता. आजच्या सारखी वाहनं न मोठ्यांना लागायची न लहानांना शाळेत जाण्यासाठी स्कूल बस. सर्वात मोठं वाहन काय तर सायकल. एकाच सायकलवर चौबलसीट घेऊन जायचा दम होता. ना पिकनिकला ना टुरला जाणं होत. मैदानी खेळ खेळले जायचे. कबड्डी, लंगडी, कंचे (गोट्या), विटीदांडू हे खेळ खेळले जायचे. एकत्र येऊन खेळल्यामुळे आयुष्यभराचे मित्र जुळले जायचे. मोबाईल किंवा करमणुकीची आजच्यासारखी डिजिटल साधनं नसल्याने एकमेकांसाठी भरपूर वेळ होता, दिवस-रात्रीचा वेळ हा कुटुंबियांसाठी असायचा. कमी पैशात सगळा आनंद होता. नाटक, सिनेमा मुलांना दाखवणं माहित नव्हतं, केव्हा असं कधीच नव्हतं.
मुलांना जरबेत ठेवण्याचा अधिकार होता, मुलांना वेगळा वेळ देण्याचा प्रश्नचं नव्हता. लग्न वडीलधाऱ्या मंडळीकडून बांधली जायची. मुलींची लग्न उपवर होताच लवकर लावली जायची. त्यामुळे फ्रॉकातून लवकर साडीत जायचे लागायचे. आवाज उठवायची सोय नव्हती. काहीही बोलायची हिंमत नव्हती, जसं आहे तसं पत्करावं लागायचं. पदरात पडलेलं पवित्र असायचं. मुलांच्या शाळेच्या गरजा खूप कमी होत्या. डोनेशन सारख्या गोष्टी नव्हत्या. मिळेल त्या शाळेत अॅडमिशन व्हायचे. गाईडची सोय नव्हती. शिकवणीचा तर प्रकार नव्हताच. त्यामुळे पुस्तकांचा आधार होता. पुस्तक ही सहसा जुनीच वापरलेली असायची, तीही वेळेवर भेटत नसत. पेन्सील, रबर वर्षातून एकदाच मिळे. एकच दप्तर शाळा संपेपर्यंत चालायचे. दप्तर म्हणजे तरी काय, साधी गोणपाटाची पिशवी असायची ती. शाळेत रोज भाजी-पोळीचाच डब्बा असायचा. कधी-कधी गूळ -तूप पोळीचा मेवा असायचा. गुरूजींचा, बाईंचा मुलांवर मोठा धाक होता. धडे-पाढे लगेच पाठ व्हायचे. त्यामुळे गणित कधी चुकायचे नाही तर व्याकरण नाही जमत असं व्हायचे नाही. आणि जर काही चूक झालीच तर गुरूजी कान पिळायचे, प्रसंगी झोडपायचे. आपली मुलं नेमक कोणत्या वर्गात शिकताहेत हे फार कमी पालकांना माहित असायच. पण शिक्षणाला खूप महत्व होत, शिक्षण हेच केवळ लक्ष्य होत. कपडे फार कमी मिळायची. दोन सदरा-चड्डी, फ्रॉक वर्षभर चालायचे आणि फाटलेच तर ठिगळ लावून वापरायचे. कुणाच्या चपला, कपडे कुणीपण वापरायच्या. तुझं-माझं अस काही नसायच.
सण मोठ्या उत्साहाने साजरे व्हायचे. फक्त सणा-सुदीलाच गोड-धोड व्हायचे. संक्रातीला तर महिला वर्ग नटून- थटून बसायचा. दिमाखात हळदी- कुंकू साजरं व्हायच. दिवाळीची तर विशेष मजा असायची. पहाटे अभंग्यस्नानाची घाई असायची. सुगंधी अंगावर नवे कपडे चढवायचे, मनसोक्त फटाके उडवायचे. घरगुती स्वर्गीय फराळाचा आस्वाद, आनंद घेतला जायचा. मोकळ्या वेळात दिवाळी अंक वाचला जायचा. गप्पा-टप्पा करत दिवाळीच्या सुट्ट्या कधी गेल्या ते कळत नसे. उन्हाळ्यात तर खरी बहार यायची. आंब्याच्या खोली समोर टोपली भरून आंबे खायला मज्जा यायची. उन्हाळी कामांना वेग यायचा. महिला वर्गाची पापड्या-कुरवड्या करायची जणू चढाओढ लागायची. त्या लख्ख उन्हात वाळवायच्या. रात्री थंडगार पन्ह प्यायच आणि रात्रीच्या चांदन्यात गप्पा मारत गच्चीवर झोपी जायच.
संयुक्त कुटुंब पद्धतीवर विश्वास असायचा. त्यामुळे घर नेहमी माणसांनी भरलेल असायच. एकमेकांना आधार होता. सगळे मिळून प्रश्न सोडवायचे. घरात मोठ्यांचा मोठा धाक होता. त्यांच्या शब्दाला मोठा मान होता. व्यवस्थितपणा शिवाय पर्याय नव्हता. कामाचे वाटप नकळत व्हायचे. घरातल्या प्रत्येकाला त्याची जबाबदारी आणि कामे वाटून दिलेली असायची. हात-पाय सारखे चालत असायचे. हसत-खेळत कामाचा डोंगर उपसला जायचा. थोडीशी कुरबुर व्हायचीच पण ती मोठी माणसं सावरायची. स्वंयपाक घरात बायकांची मक्तेदारी असायची. पाहुण्यांचा घरात नेहमी राबता होता. त्यामुळे चुलीवर चहाच धड हे चढलेलच असायच. दिवस कधी संपला हे कळायचं नाही. दिवे लागण्याच्या आत सगळे घरी यायची. देवाला दिवा लावून शुभम करोती म्हणायची. सर्वांनी मिळून साधसं सात्विक जेवण करायच आणि गुजगोष्टी करत अंथरूणावर आडवं व्हायचं.
ही लोकं खूप प्रेमळ होती. माणुसकीने भरलेली होती. जीव गेला तरी चालेल पण दिलेला शब्द पाळणारी होती. लोकांचा एकमेकांवर विश्वास होता. रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाला दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार केला जायचा. एकमेकांची आस्थेने चौकशी केली जायची. संकटकाळी एकमेकांना जमेल तशी मदत करणारी ही पिढी. उधळपट्टी पेक्षा खिशातला पैसा जपून वापरणारी आणि शक्यतो घरीच जेवणारी ही पिढी. साधं राहणीमान असणारी, समाधानी, अर्थपूर्ण आणि दुस-यांना प्रेरणा देणारी ही पिढी. समोरच्यांची काळजी करत जीवन जगायच असत ही या पिढीची शिकवण.
ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली ही डोळे विझत चाललेली म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यातील चालती बोलती विद्यापीठं. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. पायात झिजलेल्या वहाणा, डोळ्यावरचा चष्मा किमान दोन-तीन ठिकाणी जोडलेला वा दोरीने बांधलेला. गळ्यात तुळशीची माळ आणि कडदोरा हीच काय त्यांची संपत्ती. मंदिरातून घरी आल्यावर नातवाला घेऊन गावभर अभिमानाने मिरवतील. पारावर बसुन एकमेकांशी गप्पा मारणारी. एक बोलणार आणि बाकी सर्व ऐकणार. गप्पांचे विषय अगदी साधे आणि सोपे. माती अनं नाती. डोळ्यात आसवं आली तरी धोतराच्या सोग्याने कुणालाही कळणार नाही अशी अलगद पुसतील. डोळ्यात पाणी का आले याची कधी वाच्यताही करणार नाहीत. ना बीपी न डायबेटिस. माफक गरजा आणि माफक आवडी निवडी. मोबाईल, कॉम्प्युटर, सोशल मीडिया, लाफ्टर क्लब, मॉर्निंग वॉक अशा कोणत्याही सोंगाची त्यांना गरज नाही. स्वतःचे आयुष्य हेच त्यांचे तत्वज्ञान. गावातल्या कुशीत जन्माला येऊन शिवारातल्या मातीत हसतमुखाने प्राण सोडणारी. असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. त्यांच्या सोबत त्यांची महत्वाची शिकवण ही त्यांच्याबरोबरच जाईल. त्यानंतर राहिल तो फक्त स्वार्थ, अविश्वास, चैन, वखवख, असंवेदनशिल मन, भकास, कोडेगेपणा असणारी, मोबाईलच्या आभासी जगात जगणारी आधुनिक पिढी. कटू आहे पण हेच सत्य आहे.
- सुरेश मंत्री.
.jpeg)
Very nice sir
उत्तर द्याहटवा