भारतात बेरोजगारीचे प्रमाण मोठे असल्याने आजचा हा युवक बेरोजगार तर आहेच सोबत हाताला काम नसल्याने दारू, अफू, चरस, गांजा या सारख्या व्यसनांच्या आहारी गेलेला, व्हाटसअप, फेसबुक सारख्या सोशल मीडिया वर आपला जास्तीत जास्त वेळ घालवणारा, बेजबाबदार, गुन्हेगारी प्रवृती व दहशतवादाकडे वळलेला दिसून येतो. युवकांच्या या स्थितीला फक्त युवकच जबाबदार आहे, असे म्हणून आपल्याला आपले हात झटकून मोकळे होता येणार नाही. आजची युवक पिढी एवढी मनमानी करणारी व बेजबाबदार का आहे ? याचा आपण कधी विचार केला आहे का ? त्यांच्या भाव-भावनांना कधी समजून घेतले आहे का ? स्पष्टपणे म्हटलं तर नाही. आजचे युवक भरकटलेले आहेत असे म्हणण्याचा अधिकार आपल्याला बिलकुलच नाही. दुस-याकंडे बोट दाखवणा-यांनी स्वत:कडे उठणा-या चार बोटांकडेही बघितले पाहिजे. युवकांना नावे ठेवणा-या या पिढीने त्यांच्यासमोर नेमका कोणता आदर्श निर्माण केलाय याचे आत्मपरिक्षण करणे गरचे आहे. अनियंत्रित लोकसंख्या वाढीने अनेक समस्या निर्माण करणा-या या पिढीने युवक पिढीबद्दल फक्त चिंता व्यक्त करून चालणार नाही.
जेंव्हा आपण भारतीय वर्तमानकालीन युवकांच्या स्थितीबद्दल भळभळून बोलतो, त्यांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करतो तेंव्हा आपण भूतकाळात डोकावून बघितले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आजाद हे युवक त्याकाळच्या युवकांचे प्रेरणास्थान होते. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, प्रसंगी प्राणाचे बलिदान दिले. या युवकांकडे पाहूनच समकालिन युवकांच्या रक्तात एक वेगळा उत्साह संचारत होता. हे युवक या तरूणांना आपला आदर्श मानीत असत. भूतकाळ जेवढा खराब तसा वर्तमान त्याची सावली आणि भविष्य तर आणखीनच खराब. ऐकायला-वाचायला या गोष्टी निश्चीतच निराशाजनक वाटतील, पण जर थंड डोक्याने विचार केला, स्वत:लाच जर प्रश्न विचारला की, आजच्या या तरूण पिढीला मागच्या पिढीने काय वारसा दिलाय ? कसले संस्कार आणि कसला समाज दिलाय ? तर युवकांच्या आजच्या अवस्थेचे उत्तर आपल्याला निश्चित मिळेल. मी भूतकाळा बद्दल बोलतोय म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळाबद्दल नाही तर स्वातंत्र्योत्तर काळाबद्दल गेल्या ७५ वर्षांबद्दल बोलतोय. काय बघितलं आपण या ७५ वर्षात ? वाढत चाललेली गुन्हेगारी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा असेही म्हणता येईल की गुन्हेगारांचे राजकीकरण, वाढत चाललेला भ्रष्टाचार, वाढता जातीयवाद आणि बेरोजगारी. जेवढं वाईट करता येईल ते मागच्या पिढीने केलं. अर्थात सगळ्याच गोष्टी वाईटच झाल्या असं नाही. प्रत्येक समाजात वाईट गोष्टींसोबत चांगल्याही गोष्टी होत असतातच. मात्र भूतकाळात वाईट गोष्टींनाच जास्त प्राधान्य दिलं गेलं हे सत्य आहे. जर असा समाज युवकांच्या पूढे आदर्श म्हणून असेल तर आजच्या या युवक पिढीला दोष देवून काय उपयोग ?
भारतीय युवक नवक्रांती करायला तयार आहे, मात्र त्याला कोणीतरी रोखू पाहतयं ते म्हणजे राजकीय क्षेत्र आणि त्यातील भ्रष्ट राजकारणी. राजकारणात आता देशप्रेमाची जागा घराणेशाही, जातीयवाद, सत्तेच्या हव्यासाने घेतली आहे. राजकीय क्षेत्रावर फक्त वयस्कर लोकांचाच बोलबाला आहे आणि फक्त बोटावर मोजण्याइतकेच युवक आहेत. राजकीय क्षेत्राचे वातावरण दिवसेंदिवस गढुळ होत चालले आहे. भारताच्या राजकारणात आता असे युवक नेते नाहीत जे युवक वर्गात नवा उत्साह भरतील. राजीव गांधी सारख्या युवा नेतृत्वाने देशाच्या विचारात एक नवा उत्साह निर्माण करण्याचे काम केले. त्याच्या फलस्वरूप देशाने प्रगतीचे शिखर गाठले. मात्र या युवा नेत्याच्या अकाली निधनाने देश पूढे हवा तसा प्रगती करू शकला नाही. देशातील युवक गलीच्छ राजकारणाचे बळी पडत गेले आहेत आणि आजही पडत आहेत. हुशार राजकारणी या युवकांचा निवडणूकीच्या कामासाठी तात्पुरता वापर करतात आणि निवडणूक संपताच त्यांना वा-यावर सोडतात. बरीच नेते मंडळी केवळ आपल्या सोईसाठी युवकांचे पालनपोषण करतात. त्यांना आळशी बनवितात. त्यामुळे युवकांनी आता जागे होवून प्रस्थापित राजकिय नेते मंडळींच्या मागे न धावता स्वत: सक्रीय राजकारणात उडी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे.
आज भारतीय नेतृत्व युवक वर्गाला योग्य संधी देण्यात अपयशी ठरले आहे. तो बेरोजगारीची मार खातो आहे. हाताला काम नसल्याने केवळ सोशल मीडियाच्या आभासी जगात जगत निराशेच्या गर्तेत ढकलला जात आहे. थोर महापुरुषांनी समाजहितासाठी, धर्महितासाठी आपले जीवन व्यतीत केले आहे. आजचा युवक हा आजच्या आधुनिक जगातील नागरिक आहे. तो सुदृढ, सशक्त, प्रगल्भ व सुविचारक्षम आहे. आजघडीला देशातील युवकांनी सोशल मीडियाच्या नादी न लागता महापुरूषांचे जीवनचरीत्र अभ्यासायला हवे व त्यामधून आपल्या हस्ते समाजहित, धर्महित तथा राष्ट्रहित हे कसे साधले जावू शकते, याचाही विचार करायला हवा आणि त्या अनुषंगाने कार्यतत्पर व्हायला हवे. फक्त युवकांनी बुद्धीजीवी लोकांच्या संपर्कात राहून बुद्धीजीवी बनायचे की बुद्धीवाद्यांच्या संपर्कात राहून बुद्धीचातुर्याने समाजमनावर अधिराज्य गाजवायचे हे मात्र, युवकांच्या हाती आहे.
आज विद्यापिठातून पदव्यांची भेंडोळी घेऊन बाहेर पडणारा युवक नोकरीसाठी भटकत आहे. आज भारतात कामाचा योग्य मोबदला मिळत नाही म्हणून परदेशात जाणा-या युवकांची संख्या जास्त आहे. ते भारतात तेंव्हाच परततील जेंव्हा त्यांना येथे योग्य संधी उपलब्ध होतील. त्यांना रोखण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. आज सुदैवाने देशाला नरेंद्र मोदींसारखे हुशार पंतप्रधान लाभले आहेत. त्यामुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुद्धा बदलला आहे. मेक इन इंडिया सारखे उपक्रम देशात सुरू झाले आहेत. आज देशाला हुशार, उद्योगी आणि कर्तबगार युवकांची खरी गरज आहे. देशातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. युवा पिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपलं म्हणणं समाजापूढे मांडणारी नव्या जोशाची पिढी. या युवकांचा उत्साह, त्यांची सर्जनशिलता, अष्टपैलुत्व आश्चर्यकारक आहे. त्यांना अधिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. आजचा तरूणच देशाची उद्याची दशा आणि दिशा ठरवणार आहे. आजच्या तरूणांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि कुशल नेतृत्वाची. देशाची बांधणी हे युवकच करतात आणि करतीलही. जर युवक शक्तीचा योग्य वापर केला नाही तर चुकीचा वापर होवु शकतो. आपल्याला देशातील, खेड्यापाड्यातील युवकांवर भर द्यावा लागेल. देशाची मोठी ताकद असलेल्या युवक पिढीला जर असेच प्रभावहीन, नेतृत्वहीन व दिशाहीन ठेवले तर उद्याचे चित्र आजच्या पेक्षा भयावह असणार आहे.
- सुरेश मंत्री.
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा