मुख्य सामग्रीवर वगळा

विचारांचे भावविश्व : विचार मंथन

विचारमंथन हा लेखसंग्रह आहे. यामध्ये विविध विषयांवरचे एकूण ३४ लेख असून पुस्तकास प्रा.डॉ. श्रीमती शैलजा बरुरे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. मुखपृष्ठ उमेश डोंगे यांचे आहे. या पुस्तकाची अनुक्रमणिका चाळल्यानंतर वाचकांच्या सर्वप्रथम लक्षात येते की, विविध विषयावरील लेखांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. लेखकाने आपल्या मनोगतामध्ये शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून काम करत असताना नवीन प्रवेशित विद्यार्थिनीचे नाव "नकोशी" आहे हे

पाहिल्यानंतर तिच्या जन्माची आणि तिच्या नकोशा असण्याची कथा सर्वप्रथम उजेडात आणली. शिक्षण विभागाने हा लेख प्रकाशित होताच, या मुलीच्या नाव बदलाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आणि त्या विद्यार्थिनीचे नाव बदलण्यात आले. एक शिक्षक, एक स्तंभ लेखक एका विद्यार्थिनीला तिच्या नकोशा असणाऱ्या अस्तित्वाला शिक्षण विभागाच्या आणि जीवनाच्या केंद्रस्थानी आणतो. मला वाटतं लेखन, साहित्य मग ते कोणत्याही प्रकारच असो, स्तंभ लेखन, ललित अथवा वैचारिक किंवा कथा, कादंबरी, कविता या सगळ्यांचा उद्देश माणूसपण जिवंत ठेवून माणसाला जगण्यासाठी आधार देणे, कधी कधी उभारी देणं हाच साहित्याचा हेतू असतो. 

भारतात शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेली मरगळ झटकण्यासाठी अशा कृतीशील शिक्षकांची गरज भागविणारे श्री. सुरेश मंत्री यांच्या विचार विश्वामध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकिय, आर्थिक, विज्ञान व तंत्रज्ञान अशा मानवी जीवनातील अत्यावश्यक विविध क्षेत्र व त्यात निर्माण झालेले प्रश्न-समस्या, त्यावरील उत्तरांची चर्चा यांना स्थान आहे. ही केवळ समकालीन प्रश्नांची चर्चा असली तरी सुद्धा मानवाच्या भविष्यासाठी, भावी पिढ्यांसाठी, शाश्वत विकासासाठी कोणती पावले उचलली जाणे आवश्यक आहे आणि संपूर्ण मानवी समूहासाठी उत्तरे शोधणारी ही लेखमाला आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ तत्कालीन समस्यांचा आढावा घेणारे लेखन ठरत नाही. याची उपयुक्तता सर्वकालिन आहे. विचारमंथन हे पुस्तक व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व विकास, सुजाण पालकत्व, जबाबदार नागरिकत्व अशा कोणत्याही अंगाने वाचकाने पुस्तक हातात धरल्यानंतर त्याला हवे ते मुद्दे या पुस्तकात मिळू शकतात. 

लोक काय म्हणतील ? या लेखामध्ये लेखकाने लोकांच्या इच्छा आकांक्षांचे ओझे मनावर न बाळगता विविध दाखले देत त्यातही अंबाजोगाई सारख्या शहरातील स्थानिक लोकांची विशेषत: धीमंत राष्ट्रपाल यांच्या लोकजागर या संस्थेची ओळख आणि उदाहरण देऊन लोक काय म्हणतील ? या आजारावरचे उत्तर सांगितले आहे. आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आपण सर्वजण तंत्रस्नेही झालो आहोत. जगण्यासाठी आपल्याला संगणक, मोबाईल, इंटरनेट यासारखी साधने आणि फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर यासारखी समाज माध्यम अत्यावश्यक ठरत आहेत. ही साधने वापरता वापरता आपण या साधनांच्या अधीन झालो आहोत आणि त्यातून नव्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लेखकाने या सगळ्या प्रश्नांचा वेध घेण्यासाठी या पुस्तकामध्ये जीवघेणी सेल्फी, मोबाईलचे युग, इंटरनेटच्या बाहेर सुद्धा जीवन आहे या लेखांचा समावेश केलेला आहे. तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम वापरणाऱ्यांना निश्चितपणे माहीत नसतात. लेखकाने या पुस्तकात अतिशय वैज्ञानिक पद्धतीने या सर्व दुष्परिणामांची चर्चा केली आहे. आत्मविश्वास सारख्या छोट्या लेखामध्ये आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे, असे सांगत असतानाच आजच्या युगामध्ये तंत्रज्ञानापासून दूर राहात नकारात्मक भावना व अपप्रवृत्ती पासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी विविध उपायांची चर्चा या लेखामध्ये केली गेली आहे. आपल्याला शाश्वत विकास हीच आपली एकमेव गरज असून भावी पिढ्यांचं नुकसान न करता आज मला माझी जीवनशैली बदलण्याची कशी गरज आहे अथवा उपलब्ध असणाऱ्या अनेक गोष्टींचा आनंद घेताना कोणाचेही नुकसान मग त्यामध्ये आजूबाजूचे पशुपक्षी, प्राणी व पुढे जन्माला येणाऱ्या मानवी पिढ्या यांचा विचार करायला जीवनशैली बदलण्याची गरज हा लेख शिकवतो. मानवाने केलेल्या प्रगतीला आपण विकास असे म्हणतो मुळामध्ये हा विकास आहे की विनाश याचे निकष आपल्याला तपासावे लागणार आहेत. काही गोष्टी साध्य करण्यासाठी आपण अनेक चांगल्या गोष्टींचा विनाश केलेला आहे. याची चर्चा विकासाकडे की विनाशाकडे ? या लेखामध्ये करण्यात आली आहे.

विचार मंथन या पुस्तकात सुरेश मंत्री यांनी अनेक व्यक्ती चित्रे ही रेखाटली आहेत. हजारो अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर लिहिलेला लेख म्हणजे सिंधुताई च्या आयुष्याची संघर्षमय कहाणी होय. ती वाचकांना अत्यंत प्रेरणा देणारी आहे. एखाद्या व्यक्तीचे चित्रण करत असताना एकूण त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या अनेक पैलूंना छोट्याशा लेखामध्ये सामावून घेणं, ही खरे म्हणजे लेखकाची कसरत असते. असाच काहीसा अनुभव लोक लेखक अण्णाभाऊ साठे या लेखामध्ये ही आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. उत्तम लिहिण्यासाठी उत्तम वाचनही लेखकाची आवश्यक किंवा अपरिहार्य गरज असते, याची साक्ष पुढच्या लेखात म्हणजे लोकनेते राजर्षी शाहू महाराज या लेखात येते. अभिनयाचा जादूगार : दिलीप कुमार या लेखातही दिलीप कुमार यांच्या विषयी लिहीत असताना अतिशय नवख्या वाचकांना दिलीप कुमार यांच्या वडिलांची नाशिकच्या देवळाली मध्ये मालकीच्या फळबागा होत्या. ही माहिती सांगून आश्चर्याचा धक्का दिला आहे. दिलीप कुमारच्या अभिनयावर प्रेम करणाऱ्या जुन्या जाणत्या प्रेक्षकांबरोबरच या पुस्तकाचे, नव्या पिढीचे, युवावाचकही दिलीप कुमारच्या प्रेमात पडण्याची शक्यता आहे. लेखकाची निरीक्षण शक्ती, व्यक्त होण्याची पद्धती व सशक्त आशय असणारे लेख हे या पुस्तकाची अत्यंत महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. जिंकलस पोरी हा मीराबाई चानू यांच्यावरील लेख, शेतकऱ्याचा मुलगा निरज चोप्रा याच्यावरील लेख अथवा चक दे इंडिया या लेखांमधूनही क्रीडा क्षेत्रातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू त्यांचे वैयक्तिक जीवन संघर्ष, त्यांनी केलेली दैदिप्यमान कामगिरी, नोंदविले गेलेले विक्रम याची लेखक नोंद घेतो. अष्टपैलू शिक्षक अष्टपैलू विद्यार्थी घडवू शकतात. अशी गरज विचारमंथनचे लेखक पूर्ण करताना दिसून येतात.

विचार मंथन च्या निमित्याने लेखकाने अनेक स्त्री प्रश्नांचा आढावा घेतला आहे. नकोशी सारख्या लेखामधून भारतात व विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये स्त्री जन्माची होत असलेली अवहेलना वर्णन केली आहे. अनेक मुलीं जन्मानंतर 'नकोशी' असतात म्हणून त्या नकोशी नावानेच संबोधल्या जातात. परंतु भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाची काळजी घेणे हे भारतीय संविधानाने सोपवलेली जबाबदारी एक शिक्षक म्हणून पार पाडताना  श्री. सुरेश मंत्री यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. केवळ आपल्या लेखनाची गरज म्हणून हा माणूस स्तंभ लेखन अथवा पत्रकारिता करत नाही तर आपल्या अवतीभवती त्याला जे दुरुस्त करता येणे शक्य आहे तो त्या सगळ्या व्यवस्था दुरुस्तीचे काम करतो आहे. खरंच ती सध्या काय करते..? या लेखामधून महिला सक्षमीकरण अथवा महिलांचा विकास याची केवळ सांख्यिकीय प्रचाराची मानसिकता लेखकाने उघड केली आहे. स्त्रियांसाठी, लहान मुलांसाठी हळवा झालेला हा शिक्षक मातृहृदयी आहे. लहान मुले, स्त्रिया यांच्यासाठीचं हे हळवेपणच लेखकाला माणूस म्हणून एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. सजग लेखकाने त्याच्या दृष्टीने पाहिलेलं हे समकालीन जग विचारमंथन च्या स्वरूपात आपल्यासमोर येत आहे. लेखकाने पुस्तक आपल्या हाती दिले आहे. आता आपण लेखकाच्या आशावादाला वाचक व संवेदनशील माणूस म्हणून प्रतिसाद देऊया. आपण शाश्वत विकासासाठीचे वाटाडे होऊया.

लेखक - सुरेश मंत्री

प्रकाशक – शॉपीजन.इन

पृष्ठ - १६१

किंमत – २६०/- (सवलतीसह) 

- प्रा. अंकिता वाघ (लोहिया), संगमनेर







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...