लेखक, कविवर्य, वात्रटिकाकार श्री. भारत सातपुते यांचे 'जागरण' हे आत्मचरित्र वाचनात आले. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक आणि बोलके आहे. आत्मचरित्राचा नायक म्हणजे स्वत: लेखक. त्याच्या जीवनातील बहुतांश काळ यात शब्दबद्ध केला जातो. कुठल्याही आत्मचरित्राची सुरूवात लेखकाच्या बालपणापासून होते. लेखकाचा अतीशय सामान्य कुटुंबात झालेला जन्म, हालाखीत गेलेले बालपण आणि शिक्षणासाठी केलेला संघर्ष पुस्तकाच्या पूर्वार्धात आहे. रस्त्यावर ओरडत चालले तर ‘‘ते खायला घे’’ म्हणून आईजवळ रडत बसायचे. आईकडे कुठले पैसे ? केसावर बंबई मिठाई मिळायची. आईने विंचरून न्हाणीच्या तुराटयांनी खचून ठेवलेले केस त्याला देऊन आमचे लाड पुरवायचे. दोन चार दिवसाला पुन्हा तो आला की पुन्हा आईजवळ हट्ट धरायचा, तवा आई चिडून म्हणायची, ‘‘आता कुठून घेऊ, मेले केसही जास्त गळत नाहीत ?’’ ‘कान तुटलेली काटवट अन एका बाजुला पळी व दुस-या बाजूला उलथने असलेले आई बरीच वर्ष जपू जपू वापरीत होती. सांडस नसल्याने पदराने धरून चुलीवरले भगुने उतरून घ्यायची. एकाच परातीत दोघे दोघे जेवायचे कारण घरात दोन दोनच जरमनच्या पराती, वाटया, तांबे असायचे. त्यातला मोठा तांब्या तर हागणदारीलाही वापरायचे. पुन्हा राखेने घासून खंगाळून तोच तांब्या पाणी प्यायला घ्यायचे’. अशा आणि ब-याच प्रसंगातून लेखकाच्या बालपणीची हालाकीची परिस्थिती सचित्र उभी करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.
शिक्षक म्हणून सेवा काळात विविध परीक्षेत घेतलेली कॉपी विरोधी भूमिका, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करताना विद्यार्थी हितासाठी घेतलेल्या कठोर भूमिका यातून निर्माण झालेले शञु व त्यामुळे आलेली अनेक संकटं यात चित्रीत करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार लेखकांनी उघडपणे मांडला आहे. ऊस तोड कामगारांसाठी शासनाने सुरू केलेल्या हंगामी वस्तीगृहाच्या चालकांनी राजकीय नेत्यांच्या आणि शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिका-यांच्या पाठींब्यामुळे केलेली कोटयावधी रूपयांच्या शासकीय निधीची लुट आणि लेखकाने हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी केलेले प्रयत्न शिक्षण क्षेत्राचे वास्तव दाखवणारे आहेत. हल्ली पुरस्कार कसे मिळतात, याचे यथोचित वर्णन लेखकाने केले आहे. माध्यमिक शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना 'सुट्टी विना शाळा' हा आगळा वेगळा उपक्रम आणि यातच सहकारी शिक्षिकेने दाखल केलेला खोटा विनयभंगाचा गुन्हा यामुळे प्रशासनाने या उपक्रमाकडे केलेले दुर्लक्ष, सेवानिवृतीनंतर पेन्शन साठी केलेला संघर्ष अशा अनेक प्रसंगातून लेखकाचा एकूण जीवनसंघर्ष व शिक्षकी पेशाशी असणारी प्रामाणिकता लक्षात घेण्याजोगी आहे.
आत्मचरित्र लिहिणे खूप कठिण असते. कुठल्याही आत्मचरित्रात लेखकाचे संपूर्ण जीवन कधीही येत नाही. शिवाय काही घटना-प्रसंगांचे विस्मरण झालेले असते. मात्र ज्या काही घटना आठवतात आणि महत्वाच्या वाटतात त्या अगदी बारीक सारीक तपशिलासह लेखकाने मांडल्या आहेत. आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहणे अवघड असते. ते ज्याला जमते तो आपल्या वर्तनाचा वस्तुनिष्ठ विचार करू शकतो. परखड आत्मपरीक्षण करू शकतो आणि प्रामाणिकपणे आपल्या आयुष्याचा पट वाचकांसमोर उभा करू शकतो. जागरण' या आत्मचरित्रा द्वारे गत जीवनाचा आलेख तटस्थपणे काढण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. तशी भारत सातपुते यांची आणि माझी फार ओळख नाही आणि प्रत्यक्ष कधी भेट ही नाही परंतु या आत्मचरित्र वाचनातून हा व्यक्ती आणि त्यांचे एकूण व्यक्तीतत्व कसे असेल याचे चित्रच माझ्यासमोर उभा टाकले. हे आत्मचरित्र लेखकाला वाचकांच्या नजरेत सामान्याकडून असामान्याकडे नेणारे आहे. आम्हा वाचकांना सुद्धा प्रेरणादायी आहे. 'जागरण' हे आत्मचरित्र सुविचारांचा जागर करणारे आहे. मी काही अभिजात लेखक, साहित्यिक किंवा समीक्षक नाही. माझ्या परीक्षणाची भाषा अलंकारिक, साहित्यिक चौकटीत कदाचित बसणार नाही. जवळपास ६० पुस्तके प्रकाशित असणाऱ्या श्री. भारत सातपुते यांच्या आत्मचरित्राचे परीक्षण करण्याइतका मी नक्कीच मोठा नाही. श्री. भारत सातपुते यांच्या 'जागरण' या आत्मचरित्रास माझ्या खूप-खूप शुभेच्छा !
पुस्तक : जागरण
लेखक : भारत सातपुते (८०८७६९५०००)
प्रकाशक : मांजरा प्रकाशन, लातुर
पृष्ठे :३०२
किंमत : ६०० रुपये
पुस्तक परीक्षण
- सुरेश मंत्री.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा