मुख्य सामग्रीवर वगळा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : समतेचा शिल्पकार



 "जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव..." 

मराठी माणसाच्या ओठांवर आजही घुमणाऱ्या या ओळी केवळ गीत नाहीत; त्या परिवर्तनाची मशाल आहेत. ही मशाल प्रज्वलित करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यविश्वातील असे तेजस्वी व्यक्तिमत्त्व आहे की, ज्यांनी विद्यापीठाच्या पदव्या मिळवल्या नाहीत; पण जीवनाच्या विद्यापीठात त्यांनी वेदना, संघर्ष, श्रम आणि स्वाभिमानाचे सर्वोच्च शिक्षण घेतले. म्हणूनच त्यांच्या लेखणीतील प्रत्येक शब्दाला वास्तवाचा गंध आहे आणि प्रत्येक साहित्यकृतीला माणुसकीचा स्पर्श आहे.मराठी साहित्याच्या इतिहासात अनेक प्रतिभावंत झाले; पण आयुष्याच्या विद्यापीठात घडलेला, समाजाच्या जखमांवर शब्दांचे फुंकर घालणारा आणि अन्यायाविरुद्ध लेखणीला तलवारीची धार देणारा साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अद्वितीय आहे.

१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म झाला. समाजव्यवस्थेच्या तळागाळात जन्मलेल्या या लेकराला शिक्षणाची संधी मिळाली नाही. परंतु ज्याला शाळा मिळाली नाही, त्याने जीवनालाच गुरू मानले. भूक त्यांचा पहिला शिक्षक होती, दारिद्र्य दुसरा, तर संघर्ष तिसरा. याच अनुभवांनी त्यांच्या प्रतिभेला धार दिली. कवी कुसुमाग्रज म्हणतात, "साहित्य हे समाजाचे आरसे असते." पण अण्णाभाऊंचे साहित्य आरशापेक्षाही अधिक होते. त्यांनी समाजाचे केवळ प्रतिबिंब दाखवले नाही, तर त्या समाजाला स्वतःचा चेहराही दाखवला.
                                    मुंबईतील चिरागनगर झोपडपट्टीत जगताना त्यांनी उपेक्षितांच्या आयुष्याचा जवळून अनुभव घेतला. ते म्हणत, "जे मी जगलो, पाहिलं आणि अनुभवलं, तेच मी लिहिलं." त्यामुळे त्यांच्या कथांतील पात्रे कागदावर जन्मलेली नाहीत; ती रस्त्यावर, झोपडपट्टीत, शेतात, विटभट्ट्यांवर आणि गिरण्यांमध्ये जगणारी खरी माणसे आहेत. अण्णाभाऊ साठे यांनी अवघ्या वीस वर्षांत मराठी साहित्याला अफाट अशी देणगी दिली. ३७ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, ११ पोवाडे, ३ नाटके आणि शेकडो लावण्या, गीते, वग, गवळणी—ही संख्या केवळ आकडा नाही; ती एका ज्वलंत प्रतिभेचा इतिहास आहे.
त्यांच्या 'फकिरा' या कादंबरीने मराठी साहित्यात नवा इतिहास घडवला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्या सामान्य माणसाचा हा महाकाव्यात्मक संघर्ष आहे. या कादंबरीला १९६१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला. वि. स. खांडेकरांनी तिचे कौतुक करताना अण्णाभाऊंच्या कथनशक्तीची विशेष दखल घेतली होती. 'स्मशानातील सोनं', 'कोंबडीचोर', 'बरबाद्या कंजारी', 'रामोशी', 'सापळा', 'मरीआईचा गाडा', 'बंडवाला' या कथांमध्ये त्यांनी समाजातील तळागाळातील माणसांच्या जीवनसंघर्षाला शब्द दिले. 'वैजयंता' या कादंबरीत तमाशा कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण करून त्यांनी स्त्रीजीवनाच्या वेदनांनाही वाचा फोडली. 'माकडीचा माळ' ही भटक्या-विमुक्त समाजाचे वास्तव मांडणारी मराठीतील अग्रगण्य कादंबरी मानली जाते. अण्णाभाऊ केवळ लेखक नव्हते; ते पत्रकार, लोककलावंत, गायक, शाहीर आणि समाजप्रबोधनकार होते. लोकयुद्ध, युगांतर, मराठा यांसारख्या वृत्तपत्रांत त्यांनी लेखन केले. त्यांच्या लेखणीने समाजातील विषमता उघडी पाडली. तमाशाला "लोकनाट्य" म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांनी तमाशातील अश्लीलतेला फाटा देऊन सामाजिक आशयाला केंद्रस्थानी आणले. "प्रथम वंदू भूचरणा" म्हणत त्यांनी देवाऐवजी श्रमाला, माणसाला आणि भूमीला वंदन करण्याची नवी सांस्कृतिक दिशा दिली.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंच्या शाहिरीने जनतेच्या मनात ज्वाला पेटवल्या. शाहीर अमर शेख आणि द. न. गव्हाणकर यांच्यासह त्यांनी लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनजागृती केली. त्यांच्या पोवाड्यांत इतिहास होता, वर्तमानाचे भान होते आणि भविष्याची स्वप्नेही होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा संदेश अण्णाभाऊंनी गीतांमधून लोकांपर्यंत पोहोचवला. "जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव" हे गीत आजही परिवर्तनवादी चळवळीचे प्रेरणागीत आहे. त्यांच्या लेखणीत डॉ. आंबेडकरांची समता, महात्मा फुल्यांची सामाजिक न्यायाची भावना आणि श्रमिकांच्या जीवनाचा जाज्वल्य संघर्ष एकत्रित दिसतो. १९६१ मध्ये त्यांनी सोव्हिएत रशियाचा दौरा केला. त्यांच्या प्रवासवर्णनातून जगाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी दिसते. त्यांच्या साहित्याचे इंग्रजी, रशियन, फ्रेंच, झेकसह अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. हे त्यांच्या साहित्याच्या जागतिक मूल्याचे द्योतक आहे. 
                            दुर्दैवाने, आयुष्यभर जनतेसाठी लिहिणाऱ्या या साहित्यसैनिकाला त्याच्या हयातीत अपेक्षित सन्मान मिळाला नाही. उपेक्षा, आर्थिक हालअपेष्टा आणि एकाकीपणा त्यांच्या वाट्याला आला. पण काळानेच त्यांच्या कार्याची साक्ष दिली. आज त्यांच्या साहित्यावर देश-विदेशात संशोधन होत आहे. विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांचे साहित्य स्थान मिळवत आहे. १८ जुलै १९६९ रोजी हा शब्दांचा योद्धा काळाच्या पडद्याआड गेला. पण विचार कधी मरत नाहीत. अण्णाभाऊंची लेखणी आजही अन्यायाविरुद्ध बोलते, शोषितांना उभारी देते आणि माणुसकीचा पुरस्कार करते.
आजच्या काळात अण्णाभाऊ साठे यांचे स्मरण म्हणजे केवळ हार घालणे नव्हे; तर त्यांच्या विचारांशी प्रामाणिक राहणे होय. समाजात जोपर्यंत विषमता, अन्याय आणि शोषण आहे, तोपर्यंत अण्णाभाऊंचे साहित्य जिवंत राहणार आहे. संत तुकारामांनी भक्तीला शब्द दिले, महात्मा फुल्यांनी सत्यशोधनाला दिशा दिली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा संविधानिक पाया घातला आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या सर्व विचारांना जनतेच्या बोलीत, गाण्यात, पोवाड्यात आणि साहित्यामधून लोकचळवळीचे रूप दिले. अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे लेखक नव्हते; ते संपूर्ण मानवतेच्या स्वाभिमानाचे लेखक होते. त्यांनी साहित्याला केवळ सौंदर्य दिले नाही, तर संघर्षाचे धैर्य दिले. त्यांनी शब्द लिहिले नाहीत; त्यांनी इतिहास घडवला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नाव म्हणजे संघर्षाची पताका, समतेची मशाल आणि माणुसकीचा अखंड उत्सव आहे. त्यांच्या लेखणीने उपेक्षितांना भाषा दिली, शाहिरीने जनतेला उभारी दिली आणि विचारांनी परिवर्तनाचा मार्ग दाखवला.
"ज्यांच्या शब्दांत भुकेचा आक्रोश आहे, श्रमिकांच्या घामाचा सुगंध आहे, विद्रोहाची ज्वाला आहे आणि समतेचे स्वप्न आहे, त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-सुरेश मंत्री 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...