एकदा एका सहकाऱ्यासोबत सहज गप्पा रंगल्या होत्या. विषय होता – खरा मित्र कोण? मी त्याला विचारले, "तुझा सर्वात विश्वासू मित्र कोण आहे?" तो आत्मविश्वासाने म्हणाला, "अनेक आहेत." मी हसतच म्हणालो, "बरं, त्यापैकी चार जणांची नावे सांग." काही क्षणांत संपेल असे वाटणारे ते उत्तर बराच वेळ येईनाच. अखेर त्याने कसाबसा एकच मित्राचे नाव घेतले. तेही जणू संकोचाने. त्या क्षणी मला जाणवले—मित्रांची संख्या सांगणे सोपे असते; पण मनापासून ज्याच्यावर विश्वास ठेवता येतो, अशी व्यक्ती शोधणे मात्र फार कठीण असते. पुढे त्यानेच मला विचारले, "मग खरा मित्र कोण असतो?" मी शांतपणे उत्तर दिले, "संकटाच्या वेळी सर्वप्रथम ज्याची आठवण येते, तोच खरा मित्र." हे उत्तर ऐकून तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. कदाचित मी त्याच्या मनातीलच एखाद्या न बोललेल्या सत्याला शब्द दिले होते.
आज विज्ञानाने जग जवळ आणले आहे. एका क्लिकवर हजारो माणसे जोडली जातात; पण मनांमधील अंतर मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईलच्या संपर्क यादीत शेकडो नावे आहेत, समाजमाध्यमांवर हजारो मित्र आहेत; पण मन मोकळे करावे, अश्रू पुसावे किंवा संकटात निःशब्दपणे खांद्यावर हात ठेवावा असा माणूस कितीजणांकडे आहे? कार्यालयांमध्ये रोज एकच दृश्य दिसते. लोक येतात, आपापले काम करतात आणि दिवस संपताच कोणाशीही संवाद न साधता निघून जातात. हसण्याचे आवाज कमी झाले आहेत, मनमोकळ्या गप्पा दुर्मीळ झाल्या आहेत आणि "कसा आहेस?" या प्रश्नामागील आत्मीयताही हरवत चालली आहे.
आजची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे विश्वास हरवला आहे. ज्याला आपण मित्र म्हणतो, त्याच्याशीही मनातील सर्व गोष्टी बोलण्याचे धाडस होत नाही. मनात भीती असते—ही गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल का? माझ्याच कमकुवतपणाचा गैरफायदा घेतला जाईल का? नात्यांमध्ये संशयाची सावली पडली की मैत्रीचे आकाशही काळवंडत. एका कवीने अत्यंत मार्मिक शब्दांत म्हटले आहे—
"हर तरफ, हर जगह बेशुमार आदमी,
ही केवळ कविता नाही; ती आजच्या समाजाचे आरसे आहे. आपण स्वतःलाच विचारले पाहिजे—आपल्या मुलांना आपण नेमके काय शिकवत आहोत? स्पर्धा, तुलना, स्वार्थ आणि फायदा? की मैत्री, सहकार्य, त्याग आणि विश्वास? मित्रासोबत बाहेर जाऊन आला की आपण विचारतो, "पैसे कोणी दिले?" पण क्वचितच विचारतो, "आज मित्रासोबत वेळ छान गेला ना?" आपण त्याला खर्चापेक्षा हिशेब शिकवतो. मदतीपेक्षा व्यवहार शिकवतो. नकळत आपण मैत्रीतही नफा-तोट्याचे गणित आणतो.
खरी मैत्री व्यवहारावर नव्हे, तर विश्वासावर उभी असते. ती वेळ मागते, त्याग मागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपस्थिती मागते. मित्राला हे जाणवले पाहिजे की, "काहीही झाले तरी हा माणूस माझ्यासोबत उभा राहील. "खरा मित्र तो नसतो जो प्रत्येक गोष्टीत आपली स्तुती करतो. खरा मित्र तो असतो जो आपल्या चुकांवर स्पष्ट बोट ठेवतो, योग्य गोष्टीसाठी पाठ थोपटतो आणि चुकीच्या मार्गावर जात असताना निर्धाराने थांबवतो. कारण कौतुक करणारे अनेक भेटतात; पण सत्य सांगण्याचे धाडस करणारे फार थोडे असतात.
आज ईर्ष्येनेही मैत्री पोखरली आहे. मित्र पुढे गेला की आनंद होण्याऐवजी मनात तुलना सुरू होते. पण खरी मैत्री स्पर्धा शिकवत नाही; ती प्रेरणा देते. मित्राचे यश हे आपले अपयश नसते, तर आपल्यालाही पुढे जाण्याची प्रेरणा असते. माझा अनुभव सांगतो—मैत्री बोलण्यातून नव्हे, तर मदतीतून निर्माण होते. संकटात दिलेला हात, अडचणीत दिलेला आधार आणि निःस्वार्थी साथ—यातूनच विश्वास जन्माला येतो. विश्वासातून आत्मीयता आणि आत्मीयतेतून खरी मैत्री फुलते. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर माणूस मागे वळून पाहतो, तेव्हा त्याला बँकेतील शिल्लक आठवत नाही; आठवतात ती संकटात सोबत उभी राहिलेली माणसे.
म्हणूनच जीवनात एक तरी असा मित्र कमवा, ज्याच्यासमोर मुखवटा घालावा लागणार नाही. ज्याच्यासमोर अश्रू लपवावे लागणार नाहीत. ज्याच्याशी मन मोकळे करताना शब्द मोजावे लागणार नाहीत. कारण— "हजार मित्र असण्यात मोठेपणा नाही; मोठेपणा त्यात आहे की, हजार जण तुमच्या विरोधात उभे असतानाही एक मित्र तुमच्या बाजूने ठामपणे उभा राहतो. "मैत्री ही नात्यांची संख्या नसते; ती विश्वासाची खोली असते.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा