आजकाल सोशल मिडियाचा उपयोग फक्त एक
मनोरंजन म्हणून नाही तर ही एक गरज झाली आहे.फेसबुक,ट्विटर,इंन्स्टाग्राम,व्हाट्स अप्प,गुगल
प्लस,ब्लॉग,पिंटरेस्ट अशा प्रकारची
अनेक प्रकारची संधीस्थळे आपल्याला आपली मतं व्यक्त करण्यासाठी आता उपलब्ध आहेत. सोशल
मिडियाचा ही आपल्याला इंटरनेट क्रांती झाल्या नंतर मिळालेली म्हत्वपूर्ण देण
आहे.या मार्फत संपूर्ण विश्व एका धाग्यात बांधले जावू शकते.इथे आपण आपली मतं,आपले विचार मांडू शकतो, भलेही साधारणत: आपले विचार
बाहेर कुणी गांभीर्याने ऐकत नसतील मात्र ईथे तुमचे विचार वाचून त्याला पसंदी
देणारे किंवा आपले प्रतीमत देणारे काहीजण तरी मिळतात.इतरांना आपण केलेल्या
सदकार्याची माहिती पोस्ट करून प्रेरणा देवू शकतो. सोशल मिडियाचा हे समाज-जागृती चे
सशक्त माध्यम ठरू शकते.
सोशल मिडियाने आपले महत्व वेळोवेळी
सिद्ध केले आहे.मग ती देशातील निवडणूक असो,विदेशी भूमीवर केलेले आंदोलन असो किंवा
व्यक्तीगत ब्रँडींग असो.पोस्ट,लाईक,फॉलो,काँमेंट,.शेअर हे शब्द जे काही काळापूर्वी लोकांना माहित नव्हते ते आता लोकांच्या
चांगले अंगवळणी पडले आहेत. एका अभ्यासानूसार २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत
जवळपास १५० जागांवर विजय मिळवून देण्यात सोशल मिडियाची म्हत्वपूर्ण भूमिका राहीली
होती.दिल्ली मधिल अरविंद केलरीवालच्या आम आदमी पार्टीने जवळपास ८० टक्के जागांचा
प्रचार सोशल
मिडियाच्या माध्यमातून केला होता.याचा काय परिणाम झाला हे सर्वांना माहित
आहे.मिश्र देशात झालेल्या जन आंदोलनात सोशल मिडियाने महत्वाची भुमिका बजावली
होती.व्यक्तीगत ब्रँडींग साठी अनेक खेळाडू,अभिनेते,राजकीय
नेते याचा पुरेपूर उपयोग करत आहेत.आपण आपले फेसबुक पेज जर उघडले तर सई ताम्हणकर,सोनाक्षी सिन्हा यासह अनेक अभिनेत्र्या व अभिनेते दर्शकांशी गप्पा मारताना
लाईव्ह दिसतील.मोठया नेत्यांसोबत आता काही छोटे नेते सुद्धा फेसबुक,ट्विटर ,मेल याचे व्यवस्थापन करतात आणि आपल्या
मित्रांना आपल्या दररोजच्या कामाची माहीती आपल्याला शेअर करताना दिसतात.
वेगवेगळ्या विभागात काम करणा-या सरकारी कर्मचा-यांनी
स्वत:चे व्हाट्स अॅप्पवर ग्रुप तयार केले आहेत.याद्वारे ते सतत एकमेकांच्या
संपर्कात असतात.विनाअनुदानीत शाळांमधील शिक्षकांनी शासनाकडे अनुदानासाठी लढा देत
असताना व्हाट्स अॅप्पवर ग्रुप मार्फत सतत एकमेकांशी संपर्क केला त्यामुळे त्यांना
आपल्या रणनितीची प्रत्येक वेळी सतत अपडेट माहिती सगळ्यांना देता
आली.कर्मचा-यांच्या व्हाट्स अॅप्प ग्रुपमुळे शासनाने वेळोवेळी घेतलेले निर्णय,अध्यादेश यांची
माहिती मिळते.आपले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवाशांच्या आलेल्या
तक्रारींचा निपटारा ट्विटरच्या माध्यमातून केल्याचे दिसून आले आहे.
मात्र या सकारात्मक बाबींसोबत नकारात्मक
गोष्टीही समोर येत आहेत. सोशल मिडियाचा चूकीचा वापरही वेगाने वाढत आहे.देशातील वेगवेगळ्या भागात
समाजात फुट पाडणारे संदेश सोशल मिडियाद्वारे प्रसारित केले जात आहेत.जम्मू काश्मीर
मध्ये दंगली पसरविण्यात याच गोष्टीचा मोठा वाटा होता म्हणून तेथील इंटरनेट सेवा
केंद्र सरकारला मागे काही काळासाठी बंद करावी लागली होती.ब-याच वेळा सोशल मिडियावर
खोटया बातम्या पसरविल्या जातात.नुकतीच व्हाट्स अॅपवर महाराष्ट्रात जिल्हा परिषद
शिक्षकांची मोठी महाभरती होणार असल्याची बातमी जिल्हानिहाय आकडेवारी देवून
प्रसारीत केली गेली.याची कसलीही खात्री करून न घेता अनेक वर्तमान-पत्रात याच्या
आधारे बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.शेवटी शिक्षण विभागाला यात काडीचीही
सत्यता नसल्याचे स्पष्टीकरण दयावे लागले.काही महिन्यांपूर्वी महडजवळ पुल कोसळून
झालेल्या बस दुर्घटनेतील दोन्ही बस सापडल्याचे खोटे फोटो या बसांचा सांगाडा
सापडण्यापूर्वीच पोस्ट केले गेले.अशा अनेक खोटया पोस्ट टाकण्याचे प्रमाण वाढत
चालले आहे.कित्येक वेळा खास हेतूने किंवा संघटीत रुपाने तर कधी कुणाच्या
प्रलोभानामुळे युवक-युवती असे पाऊल उचलतात ज्यामुळे त्यांना अटकेला सामोरे जावे
लागते.आता सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणात तात्काळ अटकेवर प्रतिबंध लावला
असल्याने या माध्यमांचा गैरवापर करणारे याचा फायदा उठवण्याची शक्यता वाढली आहे. जेंव्हा
एखादया गोष्टीचा चूकीचा वापर वाढू लागतो तेंव्हा तिचे महत्व कमी होवू लागते हे आपण
लक्षात ठेवले पाहिजे.
काही सेलीब्रेटी सुद्धा ट्विटर चा
गैरवापर करत असल्याचे दिसते.काही दिवसांपूर्वी अभिनेते आलोक नाथ व गायिका कविता
कृष्णन यांनी एकमेकांना ट्विटरवर शिव्यांची लाखोळी वाहिली.याला सोशल मिडिया
वापरकर्त्यांनी जोरदार मात्र नकारात्मक प्रतिसाद दिला.अभिनेत्री आमिशा पटेल आणि
कुशाल टंडन तसेच उरी दहशतवादी हल्ल्यावरून ट्विटरवर झालेली नेत्यांमधील शाब्दीक
युद्धे खूप गाजली.आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ही यातून सुटले नाहीत.त्यांना
सुद्धा त्यांच्या टिकाकारांमार्फत सोशल मिडियावर अशा अभद्र शब्दांचा सामना करावा
लागला आहे की,स्वत: मोदींनी म्हटले होते की याची जर एकदा प्रिंट काढली तर संपूर्ण
ताजमहाल झाकून जाईल.तरी सुद्धा त्यांनी या टिकांना शालीनतेने ऐकून आपल्या कार्यकर्त्यांना
या टिकांचे संयमाने,योग्य पद्धतीने उत्तर देण्याचा सल्ला
दिला होता.त्यांनी आपल्या समर्थकांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यासाठी सांगितले
कारण अभद्र शब्दांचा वापर हा सोशल मिडिया सारख्या उपयोगी माध्यमासाठी घातक ठरू
शकतो.यात बरेच तथ्य आहे की, अशा माध्यमांवर अभद्र शब्दांचा
वापर होत गेला तर सामान्य जनतेतील या माध्यमांप्रती आवड हळू-हळू कमी होत जाईल व
शेवटी ती संपेल.मोदींनी केलेया या आव्हानाचा परिणाम फक्त त्यांच्या
कार्यकर्त्यांवरच नाही तर अशा विरोधी नेत्यांवर आणि सेलीब्रेटींवर पडेल अशी
अपेक्षा आहे जे ट्विटरला विवादित स्थळ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सेलीब्रेटींनी
सुद्धा सोशल मिडियावर एखादे विधान करताना सामाजिक भान ठेवायला हवे. कुणीही उठावे
आणि ट्विटरवर विवादित विधान करावे अशी स्थिती भारतात आहे.मागे गायक अभिजीत
भट्टाचार्य याने सलमान खानचे हिट अँड रन खटल्यात समर्थन करण्यासाठी गरीब लोकांना
कुत्रा म्हटल्याचे आठवत असेल.भूतपूर्व क्रिकेट प्रशासक ललीत मोदी जे भारतातून फरार
आहेत त्यांनी सुद्धा अशीच मुक्ताफळे ट्विटरवर उधळून देशाच्या राजकारणात भूकंप आणला
होता.याचा अर्थ असा होतो की आपण सोशल मिडियाचा उपयोग फक्त आपले संकुचीत विचार आणि
विवाद पसरविण्यासाठी करत आहोत.आपल्याला अशा लोकांकडून प्रेरणा घ्यायला हवी जे या
माध्यमाचा अतिशय योग्य पद्धतीने उपयोग करताहेत.आपल्याला या संदर्भात भारताच्या
बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशाच्या बाबतीत ब्लॉगर डेनियला बर्नस्टेन
हिचे उदाहरण घेता येईल जिला तिच्या एका इंन्स्टाग्राम पोस्टसाठी जवळपास दहा लाख
रुपये मिळतात.तिला हा पैसा काही कंपन्यांकडून दिला जातो.त्यांची केवळ अशी अपेक्षा
असते की, तिच्या ९,९२,००० फॉलोअर्सनी
त्यांच्या उत्पादनांला फॉलो करावे.एका विदेशी मुलीने सोशल मिडियाचा योग्य वापर कसा
होवू शकतो हे दाखवून दिले आहे.सोशल मिडियावर ब्लॉग,पोस्ट,ट्विट हे शब्द किती परिणामकारक होवू शकतात हे या उदाहरणाने कळून चूकते.या
माध्यमांवर आपली मुक्ताफळे उधळणा-या बुद्धीजीवी लोकांना असा प्रश्न विचारावा लागेल
की,ते यावर फक्त विवादात्मक विधान करण्याऐवजी देशातील
युवकांपूढे काही चांगले आदर्श निर्माण करू शकतील का ? फेसबुक,ट्विटर, व्हाट्स अप्प वर खोटया माहिती,अफवा पसरविणारे युवक डेनियला बर्नस्टेन सारखे यशस्वी ब्लॉगर बनून जगात
आपले स्थान बनवतील का?
आपल्यापुढे समस्या आपली विचारधारा
बदलण्याची आहे जेणेकरून आपणाला सोशल मिडियाचा खूप उपयोगी ठरू शकेल.गरज आहे ती
आपल्याला सोशल मिडियाचे महत्व समजून याचा योग्य वापर करण्याची.यासाठी आपल्याला
आपली नकारात्मक विचारधारा बदलावी लागेल कारण याशिवाय आपल्याकडे दूसरा कोणता पर्याय
ही नाही.
-सुरेश मंत्री,धारुर

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा