शोध ‘ रेंचो ’ चा
नुकतेच इन्स्पायर अॅवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन
दि.६ ऑक्टोंबर ते ८ ऑक्टोंबर या कालावधीत जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक
विदयालय , गढी ता. गेवराई येथे संपन्न झाले.या विज्ञान प्रदर्शनात
जिल्ह्यातील एकूण ४९६ शाळांनी सहभाग घेतला होता.या पैकी एकूण ४७ उपकरणांची
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात आयोजीत
करण्यात आलेले हे सर्वात मोठे विज्ञान प्रदर्शन असेल कदाचित. मी ही विज्ञान प्रेमी
असल्यामुळे शक्य असेल तेंव्हा विज्ञान प्रदर्शनाला भेट देत असतो , साहजिकच या
ठिकाणीही मी भेट देवून विज्ञान प्रदर्शन पाहण्याचा आनंद घेतला.या प्रदर्शनामागचा
मूळ उद्देश आणि वास्तविकता मांडण्याचा मी इथे प्रयत्न केला आहे.
इन्स्पायर हा केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान
विभागाचा उपक्रम आहे.गुणवंत विदयार्थ्यांना कमी वयातच विज्ञानाकडे व वैज्ञानिक
संशोधनाकडे आकर्षित करणे हा या मागचा उद्देश आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या
प्रगतीसाठी मानवी संसाधने निर्माण करण्यावर या अंतर्गत भर दिला आहे.या
कार्यक्रमाची सुरुवात मा. पंतप्रधानांच्या हस्ते १३ डिसें.२००८ ला झाली व
प्रत्यक्ष अंमलबजावणी शै.वर्ष २००९-१० पासून करण्यात आली.
इन्स्पायर हा
उपक्रम वय वर्षे १० ते ३२ वयोगटातील विदयार्थ्यांसाठी आहे. हा उपक्रम पाच भागात
विभाजित केला आहे. १० ते १५ वर्षे वयोगटातील विदयार्थ्यांसाठी इन्स्पायर अॅवार्ड , १६ ते १७
वर्षे वयोगटातील विदयार्थ्यांसाठी इन्स्पायर इंटरशिप कार्यक्रमा अंतर्गत विदयार्थ्यांची
शिबिरे आयोजीत करुन त्यांना जागतीक दर्जाच्या विज्ञान तज्ञांचे मार्गदर्शन , इन्स्पायर शिष्यवृत्ती
अंतर्गत १७ ते २२ वर्षे वयोगटातील विदयार्थ्यांसाठी बी.एस्सी व एम.एस्सी पर्यंत रु.
८०,००० दरवर्षी,२२ ते २६ वर्षे
वयोगटातील विदयार्थ्यांसाठी वैज्ञानिक संशोधनासाठी इन्स्पायर फेलोशिप तर २७ ते ३२
वर्षे वयोगटातील विदयार्थ्यांसाठी इन्स्पायर फॅक्लटी हा उपक्रम. या योजनेचा लाभ
आतापर्यंत एकूण १३९०४४४ विदयार्थ्यांनी घेतला आहे.
इन्स्पायर अॅवार्ड अंतर्गत प्रत्येक पाच वर्षामध्ये ई.६ वी
ते १० वी मधील प्रत्येक शाळेतील दोन विदयार्थ्यांना प्रती विदयार्थी रु. ५,००० /- दिले
जातात. या रक्कमेपैकी अर्धी रुक्कम उपकरण / मॉडेल निर्मिती साठी व अर्धी रुक्कम
विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षकाच्या प्रवास खर्चासाठी खर्च करणे अपेक्षीत आहे. या
साठी शाळेने प्रत्येक वर्गातील एक अशा पद्धतीने कल्पक विदयार्थ्यांचे नामांकन
करावयाचे असते. यातील सहभागी विदयार्थ्यांना जिल्हास्तरीय , राज्यस्तरीय
, व
राष्ट्रीय इन्स्पायर अॅवार्ड प्रदर्शनात सहभागी होवून आपले उपकरण सादर करण्याची
संधी मिळते. जिल्हास्तरापासूनच तज्ञ परीक्षकांमार्फत त्यांचे परीक्षण करून निवडक
उपकरणे पुढच्या स्तरावर पाठवली जातात.
गढी
येथील प्रदर्शनात सौर उर्जा , आपत्ती
निवारण , जागतीक तापमान वाढ , प्रदुषण
नियंत्रण या सारख्या अनेक विषयावर उपकरणे मांडण्यात आली होती.सोमेश्वर विदयालय , घाटनांदुर
च्या ‘ प्रदुषणमुक्त फळा ’ या उपकरणाने
माझे लक्ष वेधून घेतले. या आणि इतर काही निवडक उपकरणांना सोडले तर उर्वरीत उपकरणात
मला कल्पकता किंवा नाविन्य न जाणवता तोच – तोच पणा दिसून आला.शिक्षक व
विदयार्थ्यात उदासिनता दिसून आली.
हे
प्रदर्शन निवासी असल्याने जवळपास सहाशे शिक्षक व विदयार्थी या ठिकाणी मुक्कामाला
थांबले होते. पहिल्यांदाच एवढया मोठया प्रमाणावर प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याने
संयोजकांची तारांबळ उडाली होती.एकतर हा ग्रामिण भाग असल्याने त्यांनी होईल तेवढी
व्यवस्था केली होती. आपली थोडीशी गैरसोय होणार हे बघून अनेक शिक्षकांनी आपल्या
विदयार्थ्यांसोबत दूर वरून येणे – जाणेच पसंद केले होते.
मुक्कामी शिक्षकांशी चर्चा करताना मी त्यांना निराशेचे कारण
विचारले.या पैकी काही जणांनी विदयार्थ्याच्या खात्यात अॅवार्ड ची रक्कमच अदयाप
जमा झालेली नसल्याचे सांगितले.तर काहीं विदयार्थ्यांनी खात्यावर पडलेली रक्कम
उपकरण बनविण्यासाठी खर्च न करता इतरत्र खर्च करून टाकले होते. दूसरीकडे रक्कम मिळो
वा न मिळो संबधीत विदयार्थ्याला कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शनात सहभागी करा असा
आदेश निघाल्याने अनेक शिक्षक नाईलाजाने स्वत: पदरमोड करुन तयार केलेल्या उपकरणासह
विदयार्थ्याला घेवून आले होते.हे रुपये खरे तर अगोदरच संबंधीत विदयार्थ्याच्या
खात्यात जमा करायला हवे होते. भविष्यात कधी जमा होतील हे ही निश्चीत नाही.काही
विदयार्थी ११ वी ला इतरत्र शिक्षण घेत असल्याने येण्यास तयार होईनात.बिचारे शिक्षक
‘ बाप दाखव
नाही तर श्राद्ध कर ’ या उक्ती प्रमाणे कशे – बसे विनवणी करुन विदयार्थ्याला घेवून
आले होते.मग उपकरणात नाविन्यता , कल्पकता , संशोधकता दिसून यईल तरी कशी ?
चर्चेतून मला आणखीन एक आतली गोष्ट
कळाली.प्रदर्शनात मांडावयाचे उपकरण विदयार्थ्याने स्वत:ची कल्पकता व परिश्रमातून
तयार करावयाचे असते , यात फक्त अडचण भासेल तेंव्हा विज्ञान शिक्षकाचे मार्गदर्शन घ्यायचे असते.
मात्र यातील अपवादात्मक उपकरणे सोडून बहुतांश उपकरणे शिक्षकांनीच तयार केलेली
असतात , त्याचे सादरीकरण फक्त विदयार्थ्याने करावयाचे हि
अलिखित पद्धत.बिचारे शिक्षक प्रत्येक वेळी उपकरणात नाविन्यता व कल्पकता कोठून
आणणार ? म्हणून तोच – तोच पणा.आपण ‘ थ्री इडीयट ’ हा चित्रपट
पाहिला असेलचं. यातील आमिर खानची संशोधक रेंचो ची भुमिका आपल्याला आठवत असेलचं. या
रेंचोचा शोध या योजनेच्या मार्फत केंद्र सरकारच्या विज्ञान आणि
तंत्रज्ञान विभागाला करावयाचा आहे. हा उद्देश मगं कसा काय साध्य होणार ?
असो गेल्या चार – पाच वर्षातील आलेल्या अनुभवावरुन या
विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे म्हणे , आता सरसकट प्रत्येक
शाळेतील विदयार्थ्याला हा अॅवार्ड भेटणार नाही मूळीच. ईच्छुक विदयार्थ्याने
नामांकन करताना अगोदर आपल्या प्रयोगाची संकल्पना व त्याची माहिती सविस्तरपणे दयावी
लागेल.जर त्याच्या उपकरणात कल्पकता व नाविन्यता वाटली तरचं त्याला ही रक्कम इन्स्पायर
करण्यासाठी दिली जाईल.आपल्याकडे कल्पकता खूप आहे मात्र ती शब्दांच्या कोटी करण्यात.
मी ही कल्पकता वॉटसअॅप वर रोज बघतो .शब्दांची तोड – मोड करुन नविन रचना करणे
वेगळे आणि यंत्रा चे भाग सुटे करुन त्यात सुधारणा व नवनिर्मिती करणे वेगळे.
वैज्ञानीक कल्पकता हजारामागे एखादयाकडेच असते.या कलपक्तेला वास्तवात आणण्यासाठी
कधी-कधी बराच कालावधी लागतो. बरे झाले शासनाच्या करोडो रुपयांचा होणारा चुराडा
थांबेल आणि ख-याखु-या रेंचो चा ( संशोधकाचा ) शोध ही घेता येईल.
- सुरेश मंत्री, धारूर
- सुरेश मंत्री, धारूर
- सुरेश मंत्री,धारुर

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा