देवेंद्रभाऊ, शेतक-यांकडे लक्ष द्या
देवेंद्रभाऊ, महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून सगळीकडे तुरीच्या प्रश्नाची चर्चा होताना दिसत आहे.राज्य शासनाने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना तुर लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड करण्यात आली व विक्रमी उत्पादन झाले मात्र वेळेवर शासनाच्या खरेदी केंद्रावर तुर खरेदी होत नसल्याने व्यापाऱ्यांकडून शासनाच्या हमी भावापेक्षा कमी दराने तुर खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलनं करत आहेत.त्याचप्रमाणे शेतक-यांच्या आत्महत्या काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीयेत.दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीचा प्रश्न आता ऐरणीवर आला असताना राज्यातील आपले सरकार याकडे डोळेझाक करीत आहे.देवेंद्रभाऊ, आपण शेतक-यांच्या हातावर तुरी दिली असं म्हणण्याची वेळ आली आहे.राज्यातील भाजपा सरकार शेतक-यांच्या मुळावर तर उठले नाही ना?उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच त्यांनी दिलेल्या आश्वासनानूसार तातडीने शेतक-यांच्या ३६,३५९ कोटी रूपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली.याचा फायदा जवळपास २१.५ दशलक्ष शेतकऱ्यांना होणार आहे.राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन आपण आपल्या जाहीरनाम्यात दिले होते याचा देवेंद्रभाऊ,आपल्याला विसर पडलेला दिसतो. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात सरकारवरही कर्जमाफीसाठी दबाव येत असताना सरकार आपली जबाबदारी झटकत आहे.आज शेतीत राबायला तरूण वर्ग तयार नाही कारण शेतीत राबणे म्हणजे वेठबिगारी असा तरूणांचा समज होत आहे.सरकार आपल्या मतदारांना आणि देणगीदारांना खूश करण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करून शेतीमालाचा भाव पाडत आले आहे.व्यापा-यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट होत आहे.शेतक-यांच्या आत्महत्या, कर्जबाजारीपणा आणि लूटीला केवळ सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे देवेंद्रभाऊ, आपल्या सरकारने आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. शेतकरी सुखी राहण्यासाठी दीर्घकालीन व्यापक योजना राबविल्या पाहिजेत.आपण आपल्या विकासाचा दृष्टीकोन अधिक व्यापक केला पाहिजे.ग्रामीण भूमीहिनांना रोजगार मिळावा म्हणून ग्रामीण रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे. देवेंद्रभाऊ, आपण म्हणता तसे केवळ कर्जमाफी हा शेतक-यांच्या आत्महत्यांवरील उपाय होवू शकत नाही मात्र आजपर्यंत झालेल्या लूटमारीचाअंशत: परतावा म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी दया.
देवेंद्रभाऊ,महसूल, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अधिकृत नोंदीनुसार मागील पंधरा वर्षांत राज्यातील २० हजार ८७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.यापैकी १० हजार ३९० म्हणजेच ४९.७ टक्के शेतक-यांच्या आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. केवळ जमीन नावावर नसल्याने या मदती नाकारण्यात आल्या आहेत. सततची नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि शेती तोट्यात असण्याचा शेतीवर अवलंबून असणा-या पण शेतजमीन नसणा-या भूमीहिन शेतमजुरांवर कसलाच परिणाम होत नाही असा आपल्या शासनाचा चूकीचा गैरसमज आहे.
देवेंद्रभाऊ,शेती कसणारा शेतकरीच आता शेतमजूर म्हणून राबू लागलाय हो. याला कारणही तसेच आहे.महाराष्ट्रात प्रतिकुटुंब जमीन धारणा क्षेत्र घटत चालले आहे.१९७०-७१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात शेतकरी कुटुंबाकडे प्रतिकुटुंब सरासरी ४.२८ हेक्टर जमीन होती.२०१०-११ पर्यंत ही सरासरी घसरून प्रतिकुटुंब १.४५ हेक्टर झाली. गेल्या सहा वर्षांत यात निश्चितच आणखीन घट झाली आहे. शेतजमिनीचे लहान-लहान तुकडे पडत आहेत. अशा तोकड्या जमीनीवर आपली उपजीविका भागवणे दुरापास्त झाले आहे. राज्यातील ७५ टक्के शेतक-यांची ही अवस्था आहे. शेतीत वर्षभर काबाडकष्ट करून, अवर्षण आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करून शेतकऱ्यांच्या हाती काय उरत हे कधी आपण त्यांना विचारल का? कधी शेतीत, बांधावर जावून देवेंद्रभाऊ, आपण बघितलय का? अहो आज शेतीतून शेतक-याला जे उत्पादन मिळतेय त्यातून त्याचा उत्पादन खर्चही निघत नाहीयेय. त्याचप्रमाणे शेतीउत्पादनासाठी घेतलेले सावकारी कर्जही फिटत नाही हे देवेंद्रभाऊं ए. सी. त बसून कसे समजेल तुम्हाला? शेतकरी अधिक कर्जबाजारी झाल्याने त्याच्याकडे आत्महत्तेशिवाय पर्यायच राहत नाही हो?जरी शेतीतून निव्वळ उत्पन्न मिळाले असते तर त्याच्या घरातून वेगळे निघणा-या भावाला या निव्वळ उत्पन्नातून आपल्या उपजीविकेचे दूसरे साधन उभा करता आले असते. शेतक-याला आपल्या मुलीच्या लग्नासाठी आहे तीही तोकडी जमीन विकून शेतमजूर बनण्याची वेळ आली नसती. देवेंद्रभाऊ,आपण गाडीतून उतरून कधी शेतावर, बांधावर येवून शेतक-च्या डोळ्यातील आसवं बघा ना? शेतकरी जसा संकटात सापडला आहे तसाच शेतमजूर आणि इतर शेतीपूरक व्यवसाय करणारेही संकटात आहे. त्यामुळे आता देवेंद्रभाऊ,आपण मदत नाकारण्यापूर्वी नेमक शेतकरी कुणाला म्हणून म्हणायच हे ठरवायला हवं. केवळ जमीन नावावर नाही म्हणून ग्रामीण श्रमिकांच्या आणि शेतमजुरांच्या प्रश्नांना दुय्यम स्थान देवून चालणार नाही. देवेंद्रभाऊ,शेतीवर उपजीविकेसाठी अवलंबून असणाऱ्या प्रत्येकाचा प्रश्न आपल्याला समजून घ्यावा लागेल. शेती तोट्यात गेल्याने जे बाधित झाले त्या सर्वांना मदतीचा हात द्यायला हवा. शेतीवर अवलंबून असणारे सर्वच स्त्री - पुरुष, भूमीहिन शेतमजूर, बटईने शेती करणारे, मासेमारी, पशुपालन व कुक्कुटपालन करणारे, जनावरे चारणारे, मधुमक्षिका पालन करणारे, रेशीम व किटक उद्योग करणारे, लाकूड सोडून इतर वन उत्पादने गोळा करणारे, वन शेतीद्वारे उपजिवीका करणारे, दळयांची स्थलांतरीत वन शेती करणारे, गृह शास्त्राचे पदवीधर या सगळ्यांना शेतकरी समजायला हवं.केवळ शेत जमीन नावावर नाही म्हणून मदत नाकारून चालणार नाही. देवेंद्रभाऊ,आपल्याला सत्तेवर येवून अडीच वर्षे होऊन गेली आहेत. आपण शेतक-यांसाठी काय केल? याच उत्तर आपल्याला द्याव लागेल. यासाठी आपल्याला अधिक व्यापक दृष्टीकोन ठेवून शेतक-यांच्या विकासाबरोबरच या सर्वांचा विकास कसा होईल याचा विचार आपण केला तर फार बरं होईल. आपल्या सरकारला शाश्वत, व्यापक व मूलभूत दृष्टीकोन स्वीकारावा लागेल. केवळ हातावर तुरी देण्याचे काम आपण करू नका.शेवटी देवेंद्रभाऊ,भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी सुखी तरच सर्व सुखी नाही का?
-सुरेश मंत्री, धारूर
संपर्क - ९४०३६५०७२२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा