नुकताच एका बाबाने देशात कहर माजविला.बलात्काराच्या आरोपाखाली या बाबाला
न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर त्याच्या तथाकथित अंध भक्तांनी दोन राज्यात
आणिबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली होती.या बाबाला न्यायालयाने दोषी ठरवताच या
अंध भक्तांनी जो हिंसाचार माजवला त्यात जवळपास ३५ निरपराध लोकांचा जीव गेला.जागोजाग
जाळपोळ केली गेली आणि प्रशासन अशी अवस्था निर्माण होणार आहे हे माहित असताना
आवश्यक खबरदारी न घेता हा चाललेला प्रकार पाहत राहिले.या बाबाच्या भक्तांची दहशत
एवढी की न्यायाधिशांना हेलीकॉप्टरने तुरुंगात शिक्षा सुनावण्यासाठी स्वत: जावे
लागले.हा बाबा २० वर्षासाठी आता गजाआड झाला आहे.प्रत्येक जण हा विचार करत होता की,या बाबात एवढ काय आहे की,त्याचे भक्त त्याच्यासाठी
आपला जीव देण्यासाठी पूढे आले.हा बाबा आधुनिक बाबा आहे,ईतर बाबांपेक्षा वेगळा.बाबा
गुरमित राम रहिमजी इंसा असे त्याचे नाव.याने प्रत्येक धर्माचा काही ना काही आधार
घेतला आहे आणि राम,रहिमच्या अगोदर इंसा म्हणजेच माणूस असल्याचा दावा याने केलेला आहे.हा बाबा
रॉकस्टार आहे आणि खूप अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा सुद्धा.
हे जाणने जरूरी आहे की,अनेक बाबांची भोंदूगिरी लोकांसमोर आल्यानंतरही एका मागून एक बाबा आणि त्यांचे
नव-नविन अवतार येतात कुठून?खरंतर बाबांची संकल्पना
येण्याअगोदर देव आणि संत महात्म्यांची संकल्पना अस्तीत्वात आली.देव नावाची
परिकल्पनाच यासाठी करण्यात आली होती की,लोकांचा ज्यावेळी स्वत:वरचा आत्मविश्वास उडू लागेल तेंव्हा कुण्या तीस-या
शक्तीवर विश्वास ठेवून आपले काम पूर्ण करण्याची हिम्मत त्यांच्यात निर्माण होवू
शकेल.अगोदर संकटात असताना या शक्तीचा धावा केला जायचा नंतर मात्र या शक्तीची
भीती लोकांच्या मनात निर्माण केली गेली.गोष्ट तर तेंव्हा जास्तच बिघडली जेंव्हा देवाचे
विविध अवतार पृथ्वीवर उतरववून त्यांच्या नावावर विविध दूकाने थाटली गेली.ईथे
संकटाच्या काळात आनंद मिळवण्याच्या आशेने तर संकटात नसताना भिती दाखवून लोकांना
बोलावले जावू लागले.
यापूढचे पाऊल देवाच्या दूकानात काम करणा-यांनी उचलले आणि देवाशी सरळ कनेक्शन असल्याचा
दावा हे लोक करू लागले.ज्या लोकांचे आकर्षण देव आणि देवाच्या नावावर थाटलेल्या
दूकानांपर्यंत मर्यादित होते,आता ते स्वत:ला देवाचे दूत म्हणणा-यांकडे आकर्षित होवू लागले.
हे दूत संत आणि बाबा बनून लोकांची मदत करू लागले.यापैकी काहीजण खरच दूस-यांची
मदत करू ईच्छित होते तर काही जण या नावावर स्वत:चीच.रोज शेकडो लोक यांच्यापूढे
नतमस्तक होवू लागले कारण या अंध लोकांना असे वाटू लागले की,हे बाबाच देव आहेत.या
बाबांच्या भक्तांनाही या गोष्टीवर विश्वास ठेवायला वेळ लागला नाही.
पूर्वी ऋषी,महात्मा आणि
संन्याशी असायचे जे सर्व काही त्याग करून सत्याच्या शोधात जंगल आणि पर्वतात निघून जायचे.ही
लोक नेहमी सत्य आणि ईश्वराच्या शोधात राहिली मात्र त्यांना एवढी सुख-शांती मिळाली
नाही जेवढी आधुनिक काळातील बाबांना विना कठिण तपस्येने मिळाली.आजच्या तथाकथित
बाबांनी कुठे जंगलात जावून घोर तपस्या केली आहे ज्याच्या आधारावर ते स्वत:ला
साक्षात्कार झाल्याचा दावा करतात?खरं तर जंगलात निघून गेल्याने या बाबांचा कसलाच आर्थिक फायदा होत नाही म्हणून
हे बाबा आता जंगल आणि पर्वतात राहण्याऐवजी लोकांमध्ये राहू लागले आहेत.लोकांची
मागणी आणि आवश्यकतेनूसार या बाबांनी आपलेनाव ठेवणे,मेकअप करणे आणि प्रसाद देणे
सूरू केले आहे.आता या आधुनिक जगातील बाबांचे अवतार आहेत राधे माँ,निर्मल बाबा,गोल्डन बाबा,व्यावसायिक बाबा,भक्तांना फसवणारे बाबा आणि
राम रहिम इंसा......
हे आधुनिक बाबा देवाची नाही तर आपली भक्ती आपल्या भक्तांकडून करवित आहेत.आताचे
हे बाबांचे अवतार अपडेटेड आणि लेटेस्ट वर्जन आहेत.यांना पाहून बदल्या काळानूसार
बाबाही बदलले की काय असा प्रश्न पडतो.यात यांची तरी काय चूक?मॉल मध्ये शॉपिंग
करणा-यांना आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणा-या भक्तांना झाडाखाली किंवा पर्ण
कुटीत राहणारे बाबा आवडत नाहीत.यामुळेच हे आधुनिक बाबा अवकाशातून किंवा रंगबिरंगी
स्टेजवरून भक्तांसमोर अवतरत आहेत.हे बाबा आपल्या भक्तांची देवाशी बोलण्याची ईच्छा
पूर्ण करित आहेत.यांच्या सत्संगाच्या आयोजनासाठी भक्तांना लाखोंचा खर्च करावा
लागतो.यांच्या प्रवचनानंतर साधा प्रसाद नाही तर चॉकलेट आणि पेस्ट्रीचा प्रसाद
वाटला जातो.हे बाबा भक्तांसमोर रॉक गीत ही गातात,त्यांच्या सोबत गीताच्या
तालावर नृत्यही करतात.भक्त या बाबांच्या हाताने दिलेला प्रसाद मिळवण्यासाठी
आतूरलेले असतात.थोडयाशा दक्षिणेपाई स्वत:ला देवीचा अवतार म्हणवणारी राधे माँ
भक्ताच्या कडेवर बसून त्याला गोंजारते,आय लव यू म्हणू शकते.कुठे मिळतील भक्तांना असे
बाबा कम देव!बाबा राम रहिम ला पापाजी म्हणणारे भक्त त्याच्यासोबत रॉक
संगीतावर ठेके धरत असत आणि स्वत:ला देवाचा अवतार म्हणणारा हा तथाकथित बाबा आपल्या
आवडीच्या परिवेषात आणि भूमिकेत भक्तांसोबत भक्तीचा आनंद घ्यायचा.
काळानूसार बाबा बदलत गेले आणि त्यांच्या वृत्तीही बदलत गेल्या.भक्तांना सांसारीक
मोहापासून दूर राहण्यासाठी सांगणारे हे बाबा स्वत: मात्र भौतीक आणि शरीर सुखाच्या
मोहात अडकत गेले.आसारामवर आणि त्याच्या पुत्रावर लैंगिक शोषणाचा आरोप असल्याने हे
पिता-पुत्र गजाआड आहेत.भक्तांना आपल्या समस्या दूर करण्यासाठी चित्र-विचित्र उपाय
सांगणा-या निर्मल बाबावर काही ठिकाणी फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले
आहेत.
राधे माँ वर एका महिलेने छळ केल्याचा आरोप केलेला आहे तर नुकताच राम-रहिम
बाबा २० वर्षांसाठी गजाआड गेला आहे.असे कित्येक बाबा वेगवेगळ्या आरोपांखाली आत
आहेत.बाबांप्रमाणे भक्त मात्र बदलले नाहीत.भक्त पूर्वीही आपल्या देवाच्या विरोधात
ऐकत नसत आणि आजही त्यांच्या देवाचा अवतार समजल्या जाणा-या तथाकथित बाबांवर कितीही
आरोप झाले तरी ते ऐकणार नाहीत.भक्त पूर्वीही देवासाठी प्राण देणे आणि घेण्याचीही
हिम्मत ठेवत आणि आजही ठेवतात.समस्या खूप मोठी आहे आणि ती म्हणजे नविन देव निर्माण
न होवू न देण्याची...जे बदलत्या काळात जवळपास अश्यक झाले आहे.पूर्वीचे देव दगड आणि
फोटोच्या स्वरूपात आहेत ज्यांना कधीच अपडेट करता येणार नाही यामुळेच लोकांना
पाहिजे तसे आधुनिक देव जागोजाग तयार होत आहेत.....ज्यांना प्रश्नही करता येत
नाही.या बाबांच्या नावावर बोंब मारणा-यांनीच विचार करावा की,चूक या बाबांची आहे की
भक्तांची ?
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा