या जगात प्रत्येक जण
रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हातानेच परत जातो हे त्रिकाल बाधित सत्य माहित
असूनही आज प्रत्येक जण पैश्याच्या मागे धावताना दिसतोय. प्रत्येकाला संपत्तीचा संचय
करण्याचा हव्यास आहेच. संत कबीरदास यांनी म्हटले आहे-साई इतना दीजीये,जामे कुटुम समाय,मै भी भुखा ना रहुं, साधु न भुखा
जाय. पैशाच्या मागे धावत-धावत जीवनाचा खरा आनंदच हरवून बसलो आहोत आपण. संपत्ती
संचयासाठी आपण माणूसकी सुद्धा विसरत चाललो आहोत.
मला लहानपणापासून
ऐकलेली एक गोष्ट आठवते. एक माणूस सारखा देवाला तक्रार करत असतो की, देवा तू मला काहीच
दिले नाहीस. देवाने त्रस्त होवून त्याला वरदान दिले की, तू २४ तासात जेवढे
अंतर पायी कापशील तेवढी जमीन तुझी होईल. तो माणूस हव्यासापोटी पळत राहिला, पळत राहिला आणि
मेला. आज आपली सुद्धा स्थिती अशीच आहे. संपत्ती संचय करण्यासाठी सर्व जण पळताहेत आणि
शेवटी काय तर शून्य. संपतीमुळे सुख मिळत ही जर आपली कल्पना असेल तर ती भ्रामक आहे. अमाप
संपत्ती असणा-यांनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळल आहे याची अनेक ताजी उदाहरण
आहेत.
आपण संपती का कमावत
आहोत, कशासाठी कमावत आहोत हे कुणालाच माहित नाही. कमावलेल्या या संपत्तीतून
जी साधन घेतली ती का घेतली हे सुद्धा कुणालाच माहित नाही. वास्तवात आपण का आणि
कुणासाठी कमावत आहोत हेच आपल्याला माहित नाही. एखाद्या सामान्य व्यक्तीला आपण
विचारल की, तो का कमावतोय? तर तो म्हणेल की, आपल्या मुलांसाठी कमावतोय. हे सर्व खोट आहे. आपण आणि आपल्या मुलांसाठी सुद्धा
आवश्यक तेवढीच संपत्ती कमावली पाहिजे. त्यानंतर संपत्ती कमावण हा केवळ एक बहाणा
आहे. पालकांनी अमाप संपत्ती कमावून ठेवल्यास मुल स्वत: आळशी बनतात. कित्येकदा
मुलांना या संपत्तीची उधळण करताना पाहून स्वत:लाच
दु:ख होतं. आई-वडिलांना तर तेंव्हा जास्तच दु:ख होते जेंव्हा मुलं या संपत्ती आणि
वडिलोपार्जित व्यवसायाला लाथ मारून आपल्या मनाजोगा व्यवसाय अथवा नौकरी करू
ईच्छीतात त्यावेळी त्यांनी कमवून ठेवलेली संपत्ती मातीमोल होवून जाते.
आजकाल संपत्तीचा
दिखावा करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये वाढत चालली आहे. लोकांना वाटते की, त्यांच्याकडे जेवढी
संपत्ती असेल तेवढे त्यांचे जीवन सुखी असेल. यामुळेच लोक आवश्यकतेपेक्षा जास्त
कमावत आहेत मात्र संपत्ती संचयनाच्या मागे धावत असताना जीवनातील अमूल्य क्षणाचा
खरा आनंद ते घेवू शकत नाहीत. लोक संपत्ती कमावण्याच्या मागे आहेत मात्र त्याच काय करायच
हेच त्यांना माहीत नाही. मी निश्चितच त्या लोकांबद्दल बोलत नाहीय जे
उदरनिर्वाहासाठी दोन वेळेच्या भाकरीची सोय करण्यात व्यस्त आहेत वा केवळ एवढच कमावत
आहे ज्यामुळ म्हातारपणात तणाव निर्माण होणार नाही किंवा कुणापुढे हात फैलावा
लागणार नाही ज्यामुळे जीवन आरामात व्यतीत करता येईल. पण त्यांच काय ज्यांच्याकडे
पूरेशी आहे तरी ते पैशाच्या मागे धावत आहेत?
काही जणांच्या
लालसेला तर सीमाच नसते. हे समजतच नाही की, ज्या नेत्यांनी,नौकरशहांनी आणि अन्य लोकांनी तथाकथित भ्रष्टाचाराच्या साहयाने अमाप
संपत्ती जमविली आहे ते या संपत्तीचा उपभोग घेणार कधी? माझ्याकडे अशी बरीच उदाहरणे आहेत ज्यात लोकांनी
आपल्या दोन नंबरची कमाई दूस-याच्या नावे दाखविली मात्र ज्याच्या नावे दाखविली तोच
तिला घेवून बसला. मग अशा कमाईचा फायदा तो कसला? मेल्यानंतर कुणाचा रूपया कोणाकडे
होता हेच माहित नाही कारण मरणा-याने हे कुणाला सांगितलच नाही. कित्येकदा लोकांकडे
एवढा पैसा असतो की तो कुठे खर्च करावा हेच कळत नाही. यामुळे लग्नासारख्या गोष्टींवर
नाहक खर्च केला जातो. लोक सूरूवातीला मेहनत करून स्वत:साठी एक घर खरेदी करतात नंतर मात्र
जीवनात इतर गोष्टींचा आनंद न घेता जीवनभर स्थावर मालमत्ता जमा करून जातात आणि
मेल्यानंतर आपल्या मुलांच्या हवाली करून जातात.
राज
घराण्यातील महाल,किल्ले,जमीनी पूढील पिढीला सोपवल्यानंतर
त्याच्यासोबत भांडण-खटले सुद्धा सोबत सोपवून जातात. फक्त म्हणायला त्यांची मुलं या
संपत्तीची वारस आहेत मात्र त्यांचे जीवन खटले लढण्यातच जाते. आपण कधी याचा विचार
केला आहे का की, अधिकाधिक पैसा कमावण्याच्या नादात आपण आपल्या
किती ईच्छा-आकांक्षा मारल्या आहेत. अनेक लोकांनी केवळ समाजाला दाखवण्यासाठी
मोठ-मोठी फार्म हाऊस खरेदी केली त्यात रहायला ही गेले मात्र शेजारी कोण राहते हे
सुद्धा माहित नाही. नाईलाजाने त्यांच्या मुलांना कर्मचा-यांच्या मुलांसोबतच खेळावे
लागते.
प्रश्न हा आहे की,आपल्या
जीवनाचा नेमका काय उद्देश आहे? अधिक कमावण्याच्या नादात
आपल्याला खर्च करण्यासाठी सुद्धा वेळ नाही.खर्च करूही ईच्छीत असेल तर तो ठराविक
वयानंतर करू शकत नाही. दूसरीकडे जो जेवढा श्रीमंत तेवढे आजार अधिक. तरूणपण कमावण्यात गेल आणि म्हातारपण आजारात. नंतर यांची
मुलं त्यांना सोडून विदेशात जातात आणि साधी ख्याली-खुशाली सुद्धा विचारत नाहीत. अशी
ताजी उदाहरण आहेत की, त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा साध
अंत्यदर्शनाला सुद्धा ही मुलं वेळ नाही असे कारण दाखवून येत नाहीत. ज्या संपत्तीला
कमावण्यात आयुष्य खर्च केले ती संपती आपल्या संवेदनाहिन मुलांच्या नावे करून
जातात. दूसरीकडे जो नौकर मुलं जवळ नाहीत म्हणून आधार बनून राहिला, त्याचे मल-मूत्र साफ करत राहिला त्याला एक फुटकी कवडी सुद्धा देवून जात
नाहीत.
याचा सार हाच आहे की, स्वत:साठी
आणि मुलांच्या भविष्यासाठी किती संपती कमवायची याची सीमारेषा निश्चित करा आणि बाकी
जीवन सुखात व्यतीत करा. आपल्या मिळकतीत समाजाही काही वाटा आहे हे लक्षात ठेवून
अतिरीक्त संपती समाजासाठी खर्च करा.
-सुरेश मंत्री.

This is very nice article for the persons to become self-satisfied. After reading this article one should do something for our society! Very nice article sir!
उत्तर द्याहटवाThx
हटवा