आजचा दिवस खूप महत्वाचा आहे.आज संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.सोबत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानही बोलणार आहेत.जेंव्हापासून भारताने काश्मीरमधुन कलम ३७० हटवले आहे तेंव्हापासून पाकिस्तानची झोप उडाली आहे.जगाचे लक्ष काश्मीर मुद्दयाकडे वळवण्यासाठी आणि या प्रश्नावर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघाने मध्यस्थी करावी म्हणून पाकिस्तानने सर्व आघाडयांवर प्रयत्न करून पाहिले मात्र त्याला तोंडघशी पडावे लागले आहे.भारताने हा आपला अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून हा मुद्दा ईथे मांडण्यास विरोध दर्शवला आहे तर दूसरीकडे पाकिस्तानने हा मुद्दा मांडण्याचे साफ संकेत दिले आहेत.पाकिस्तान काश्मीर मुद्दयाबाबतीत संयुक्त राष्ट्र महासभेच्या सदस्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करेल तर भारताचा भर नेहमीप्रमाणे दहशतदावाचा मुद्दा सर्वोपरी करण्यावर असेल.पाकिस्तान दहशतवादाचा आधार घेवून काश्मीरमधील वातावरण खराब करण्याचा नेहमी प्रयत्न करत आला आहे.कलम ३७० हटवल्यानंतर तर पाकव्याप्त काश्मीर मधुन मोठया प्रमाणावर दहशवादी भारतात घुसवुन काश्मीरची शांतता परत भंग करण्याचा डाव पाकिस्तानने आखला आहे.भारताने स्पष्ट म्हटले आहे की,जर आज काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र महासभेत उपस्थित करण्याचा प्रयत्न त्याने केला तर त्याला तोडीस तोड उत्तर देण्यात येईल.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता संपूर्ण जगाला माहित झाला आहे.एफएटीएफच्या काळ्या यादीत समाविष्ट होण्यापासून पाकिस्तान आता केवळ एक पाऊल दुर आहे.दहशतवादयांना अर्थ पुरवठा करणे आणि मनी लॉन्ड्रिंग सारख्या बाबींमुळे एफएटीएफच्या एशिया पॅसिफिक ग्रुपचा अहवाल पाकिस्तानच्या बाबतीत नकारात्मक आला आहे. एशिया पॅसिफिक ग्रुप पाकिस्तानसोबत भारतावरही नजर ठेवण्याचे काम करते.या ग्रुपची जेंव्हा ऑक्टोंबर मध्ये बैठक होईल तेंव्हा पाकिस्तानचा काळ्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता अधिक आहे.अगोदरच आर्थिक संकटातुन जाणा-या पाकिस्तानसाठी हा मोठा झटका असेल.भारतासाठी दहशतवाद हा खुप मोठा मुद्दा आहे.पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाला गेल्या कित्येक दशकांपासुन भारत झेलत आला आहे.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत बोलताना पाकिस्तानच्या कुरापतींचा नक्कीच उल्लेख करतील.दहशतवादाच्या विरोधात अमेरिका आणि अनेक देश भारतासोबत आहेत.
भारताने हे स्पष्ट केले आहे की,काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याने पाकिस्तानसोबत आता जर चर्चा झाली तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीत होईल.दुसरीकडे पाकिस्तान काश्मीरमध्ये मानव अधिकारांच हनन होत असल्याचा कांगावा करून काश्मीरच्या बाबतीत संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत प्रस्ताव घेवून येईल.मात्र अधिकाधिक देश या बाबतीत पाकिस्तानसोबत उभा राहु ईच्छित नाहीत.ईथे असा प्रस्ताव आणण्यासाठी पाकिस्तानला अदयापपर्यंत आवश्यक पाठिंबा मिळालेला नाही.या ठिकाणी असा प्रस्ताव आणण्यासाठी त्याला कमीत-कमी १६ सदस्य देशांचा पाठिंबा मिळायला हवा.संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ४७ सदस्य देशांपैकी केवळ १६ सदस्यांना पाकिस्तान आपल्याकडे वळवु शकला नाही.या परिषदेत १५ मुस्लिम देश आहेत.पाकिस्तानला मुस्लिम राष्ट्रांवर विश्वास होता की इस्लामच्या नावावर यापैकी काही देश तरी त्याची साथ देतील,मात्र अस होवु शकल नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी अगोदरच याबाबतीत स्वत:च स्वत:ची खिल्ली उडवुन घेतली आहे जेंव्हा त्यांनी म्हटले होते की,या परिषदेच्या ५८ सदस्य देशांचा पाठिंबा पाकितानला आहे.जेंव्हाकी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत केवळ ४७ देशच आहेत.एकीकडे पाकिस्तानचा हा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे सीमेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.भारतीय सैन्य दलाच्या सुत्रांनुसार दररोज अनेक दहशतवादी सीमेपलीकडुन भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत.आपली नाचक्की होवुनही संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या बैठकीपुर्वी पाकिस्तानकडुन अनेक खोटया बातम्या आणि व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत.भारताच्या गुप्तचर संस्था याचे लागलीच उत्तर देत आहेत.पाकिस्तानकडुन भारतीय सैन्य अधिका-यांची अनेक बनावट ट्विटर खाती उघडयात आली असुन त्यातुन भारतविरोधी विधाने करण्याचा प्रयत्न केला जात आहे.अशा खात्यांवर नजर ठेवुन आपल्या सुरक्षा यंत्रणा त्यांना ब्लॉक करत आहेत.सोशल मीडियावरूनही याची पोल खोल केली जात आहे.सोबत पाकितानातच होत असलेल्या मानव अधिकारांच्या उल्लंघनावरुन त्यालाच आरसा दाखवला जात आहे.पाकव्याप्त काश्मीरमधिल मानव अधिकारांच उल्लंघन,तेथील हिंदूंवर होत असलेले अत्याचार,पश्तून तहफ्फुज मूवमेंटमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगा समोर आला आहे.आजही पाकिस्तान तोंडघशी पडणार हे मात्र नक्की.
-सुरेश मंत्री.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा