भारतात कोरोना रुग्णांची संख्या ९ लाखाच्या पूढे गेली आहे. विशेषत: महाराष्ट्रात कोरोना बाधित रूग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी मोदी सरकार वर तर दूसरीकडे देवेंद्र फडणविस यांनी महाराष्ट्र सरकार वर कोरोना चाचण्या कमी असल्याने रूग्णांची संख्या कमी दिसत असल्याचा आरोप वारंवार केला आहे. दूसरीकडे केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारं हे युद्ध योग्यरित्या लढत असल्याच चित्र निर्माण करताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतच ब्राझीलच्या तुलनेत उत्तरप्रदेश मध्ये कोरोनाची आकडेवारी कमी असल्याने समाधान व्यक्त केल आहे. व्यवस्थापन आणि प्रचार या दोन्ही कला आहेत. पंतप्रधानांचे हे वक्तव्य सुद्धा याचेच उत्कृष्ट उदाहरण आहे. मोदींनी आपला मतदार संघ वाराणसीच्या एनजीओ प्रतिनिधिंशी व्हिडिओ कॉन्फरंस मार्फत संवाद साधत असताना म्हटले की, ब्राझील मध्ये कोरोना विषाणू मुळे ६८ हजार मृत्यू झाले आहेत. उत्तरप्रदेशचे क्षेत्रफळ सुद्धा ब्राझिल एवढेच आहे आणि लोकसंख्याही जवळपास समान आहे. मात्र ईथे केवळ ८०० मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. साहजिकच पंतप्रधानांच्या मतानुसार उत्तरप्रदेश मधिल कोरोनाची कमी आकडेवारी ही समाधानाची बाब आहे.
त्यांनी म्हटले की, ज्यावेळी कोरोना महामारी आली त्यावेळी सर्वजण भारताच्या बाबतीत घाबरलेले होते. उत्तरप्रदेशच्या बाबतीत तर अनेक जणांना जास्त सांशकता होती कारण येथील लोकसंख्या २३-२४ कोटी आहे. मात्र उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाला नियंत्रणात ठेवले. अशाप्रकारे केवळ आकडेवारीने केलेली तुलना अनेकांना प्रभावित करेल मात्र अधिक खोलात गेल्यास हिच आकडेवारी आपल्याला आरसा दाखवेल.
चला तर मग, मोदींच्या या विधानाच्या अधिक खोलात जावू या. हे सत्य आहे की, उत्तरप्रदेशचे क्षेत्रफळ सुद्धा ब्राझिल एवढे आणि लोकसंख्याही जवळपास समान आहे. ब्राझिल मध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे १७ लाखाहून अधिक रूग्ण आढळले आहेत आणि मृत्यू ६८ हजार. उत्तरप्रदेश मध्ये ३१ हजार रूग्ण आणि मृत्यू ८४५ झाले. या आकडेवारीतुन मात्र उत्तरप्रदेश सरकारने कोरोना संक्रमणावर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले आहे असं म्हणन घाईचे होईल. आपल्याला हे पहाव लागेल की, कुठे कोरोनाच्या किती चाचण्या झाल्या. १२ जुलै पर्यंत ब्राझिल मध्ये कोरोनाच्या ४५.७२ लाख चाचण्या झाल्या. म्हणजेच १० लाख लोकसंख्येच्या मागे २१,५०८ चाचण्या झाल्या. दूसरीकडे १२ जुलै पर्यंत उत्तरप्रदेश मध्ये कोरोनाच्या केवळ ११.०८ लाख चाचण्या झाल्या. म्हणजेच १० लाख लोकसंख्येच्या मागे केवळ ४,९२९ चाचण्या. हे स्पष्ट आहे की, जोपर्यंत चाचणी होणार नाही तोपर्यंत कोणी व्यक्ती कोरोनाने बाधित आहे की नाही हे कसे समजेल? उत्तरप्रदेश मधील कोरोनाच्या कमी चाचण्या हा विवादाचा विषय राहिला आहे. राज्याचे माजी आईएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी यूपी सरकारवर ’ नो टेस्ट, नो कोरोना’ पॉलिसी चालवल्याचा आरोप केला होता ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अशात पंतप्रधानांचे आकडे आपल्याला अनेक बाबींवर विचार करण्यास बाध्य करतात. उत्तरप्रदेश आणि ब्राझिलची तुलना जशी लोकसंख्येच्या आधारावर केली गेली तशीच तुलना भारत आणि चीनची करून बघितली तर चित्र उलटे दिसेल. चीनची लोकसंख्या भारताच्या तुलनेत अधिक आहे. २०२० मध्ये चीनची अनुमानित लोकसंख्या १४३ कोटी तर भारताची १३८ कोटी. यावरून भारतात कोरोना रुग्णांची संख्या चीनच्या तुलनेत कमी असायला हवी. आकडेवारीनुसार १२ जुलै पर्यंत चीनमध्ये कोरोनाचे ८३,६०२ रूग्ण आणि मृत्यू ४,६३४. दूसरीकडे भारतात या तारखेपर्यंत ८ लाख ८८८ रूग्ण आणि २३,२०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ भारतात चीनच्या तुलनेत १०.५२ पट अधिक प्रकरणे आहेत. सोबत चीनच्या तुलनेत भारतात ५ पट अधिक मृत्यू झाले आहेत.
भारत आणि चीनची तुलना करताना एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे. चीनने आत्तापर्यंत ९ कोटीहून अधिक कोरोना चाचण्या घेतल्या आहेत तर भारतातील चाचण्या १.१८ कोटीपर्यंत मर्यादित आहेत. याचाच अर्थ भारताच्या ९ पट अधिक चाचण्या चीनमध्ये झाल्या. जर भारतानेही एवढयाच चाचण्या घेतल्या असत्या तर आज कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या किती असती याचा अंदाज लावणे कठिण आहे. सर्वाधिक कोरोना पॉजिटिव्ह रुग्णात लक्षणेच दिसून येत नाहीत. यामुळे जर कोणी संक्रमित असेल तर त्याला याचा पत्ता लागत नाही. त्यांना जर ईतर गंभीर आजार नसेल तर ती सामान्यत: १५ दिवसात आपोआप ठिक होतात मात्र या कालावधित ते वाहकाचे काम करतात आणि दुस-यांना संक्रमित करतात.
याचच एक उदाहरण झारखंडच्या धनबाद मध्ये पहायला मिळाल. जुलैच्या पहिल्या आठवडयात ईथे दोन पत्रकार कोरोना संक्रमित आढळ्यानंतर प्रशासनाने ईतर पत्रकारांसाठी स्वईच्छेने कोरोना चाचणीची व्यवस्था केली. ज्या पत्रकारांमध्ये काहीच लक्षणे नव्हती त्यांचीही चाचणी घेण्यात आली. एकूण ५५ पैकी थोडे नव्हे २३ पत्रकार संक्रमित आढळले. या पत्रकारांची स्वईच्छा चाचणी झाली नसती तर अधिकांना ते कोरोना संक्रमित असल्याच माहित झाल नसत. मुंबईमध्ये सुद्धा पत्रकारांच्या बाबतीत मागे असच घडल होत. यामुळे केवळ आकडेवारीवरून कोरोना विरूद्ध लढाईचे मूल्यांकन करताना चाचण्या किती झाल्या ही आकडेवारी लक्षात घेतली पाहिजे. भारतात १० लाख लोकसंख्येच्या मागे ८,५५३ चाचण्या होत आहेत. यातुलनेत यूपीत केवळ ४,९२९ चाचण्या होण कमीच मानल जाईल. याच कालवधित दिल्लीत १० लाखामागे ३९,८६३ चाचण्या झाल्या. यामुळेच दिल्लीत कोरोनाची अधिक प्रकरणे दिसणे स्वाभाविक आहे. याउलट दिल्लीतील रिकव्हरी रेट वाढण आणि एक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होणं ही समाधानाची बाब आहे.
पंतप्रधानांनी मागिल शनिवारी आढावा घेताना दिल्ली सारखे प्रयत्न करण्यावर जोर देवून चांगले संकेत दिले आहेत. सर्वाधिक कोरोना प्रकरणे असलेल्या महाराष्ट्रात १० लाखामागे ११,०१२ चाचण्या, तामिळनाडुत २१,२६२ चाचण्या आणि दुसरा क्रमांक. तीस-या क्रमांकावर असणा-या दिल्लीत ४.६६ पट अधिक चाचण्या झाल्या. यातुलनेत १० लाखामागे बिहार मध्ये २५९४, उत्तरप्रदेश मध्ये ४९२९,मध्यप्रदेश ५९१२,गुजरात ६८३९, छत्तीसगड ७३०६ आणि उत्तराखंड ८४४८ चाचण्या खूप कमी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. भारतात सुद्धा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेतल्याशिवाय पर्याय नाही. यामुळेच ब्राझील सोबत तुलना करून उत्तर प्रदेशच्या यशावर खूश होणे आत्मघाती ठरेल. जर आपण कोरोनाच्या अधिकाधिक रूग्णांची ओळख पटवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या जबाबदारी पासून पळणार असू तर कोरोनाविरूद्ध लढाई यशस्वीरित्या लढता येणार नाही.
-सुरेश मंत्री.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा