मुख्य सामग्रीवर वगळा

आता तरी गांभीर्याने घ्या....


 देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे.मुंबईसारख्या एकट्या शहरातुन दररोज दहा हजारांच्या पूढे, महाराष्ट्रातुन ५७ हजार पेक्षा जास्त आणि भारतात  एक लाखाच्या पूढे दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. गेल्या चार दिवसांत सर्वाधिक केसेस भारतात आढळत आहेत. जो अमेरिका दररोज आढळणा-या कोरोना केसेसच्या प्रकरणात एकेकाळी सर्वाधिक पूढे होता त्याला आता आपण खूप मागे टाकले आहे. दररोज वाढत जाणा-या कोरोना बाधित रुग्ण संख्येबरोबरच मृत्यूदरही त्याच प्रमाणात वाढला आहे. अनेक ठिकाणी स्मशानात जागा शिल्लक नाही. अंबाजोगाई मध्ये एकाच चितेवर आठ कोरोना बाधितांना डाग दिल्याची बातमी ताजी असतानाच काल अहमदनगर मध्ये तब्बल ४२ कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातुन आपण  कोरोनाची भयानकता लक्षात घ्यायला हवी. महाराष्ट्रामुळे कोरोना विरुद्ध युद्धात भारत पिछाडीवर गेल्याचा आरोप केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकताच केला आहे. आरोप-प्रत्यारोप हा राजकारणाचा भागही असेल कदाचित, आपण सर्वसामान्य नागरिकांनी मात्र नियमांचे पालन केले नाही तर याची फार मोठी किंमत आपल्याला आणि पर्यायाने देशाला चुकवावी लागेल हे मात्र नक्की.

या महामारीने एवढे विक्राळ रुप धारण केले असताना आपण आपल्या घरांमध्ये बंद असायला हव होत. मात्र मुंबई असो, महाराष्ट्र असो वा देशात कुठेही बाहेर थोड डोकावून बघितले तर नक्कीच वाटेल की, खरंच देशावर एवढी मोठी आपत्ती आली आहे का? आजही लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर विना मास्क विनाकारण फिरताहेत. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना प्रकरणे आढळुन येत असल्याने, कडक निर्बंधांच्या नावाखाली एक प्रकारे लॉकडाऊनच लावण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वाहतुक सोडुन सर्व काही बंद आहे. एकीकडे महाराष्ट्रात सर्वत्र व्यापा-यांकडुन या निर्बंधांना विरोध होत असताना देशात येत्या काही दिवसात परत एकदा लॉकडाऊन लागण्याची भीती आहे. माञ केवळ लॉकडाऊन मुळे ही आपत्ती संपण्याची शक्यता आहे? नाही...जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख संशोधकांनी मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन परिणामकारक नसुन उलट त्याचे गंभीर परिणाम होतील, असे म्हटले आहे. तसेच कोरोनाची केवळ दुसरी - तीसरी लाट असणार नसुन पुढील काळातही अनेक लाटा येतच राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे देशाचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी न जाणो कित्येक वर्षे लागतील. देशात जेवढ काही ठिक दिसत आहे तेवढे नक्कीच नाही. गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे लाखो लोकांना आपल्या नौक-या गमवाव्या लागल्या, लोक बेघर झाली, चांगली - चांगली कुटुंब उद्धवस्त झाली. छोटे दुकानदार, कामगार आणि रोज पोटावर हात असणा-यांच्या नुकसानीची चर्चा तर होत नाहीच. देश कुठल्याही परिस्थितीत दुसरा लॉकडाऊन सोसण्याच्या मनस्थितीत नाही.

आणि लॉकडाऊन लावणार तरी कोणासाठी... त्यांच्यासाठी जे कोरोनाला केवळ लबाडी मानत आहेत ? वा त्यांच्यासाठी जे मोठया अभिमानाने सांगतात की, एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला पण भावाने आणखीन कधी आपल्या तोंडाला मास्कचा स्पर्श होवु दिला नाही...वा त्यांच्यासाठी जे म्हणताहेत की कोरोना - वरोना काही नाही, ही केवळ सरकार आणि लॅबवाल्यांची  मिलीभगत आहे.हे श्रीमंतांना पॉझिटिव्ह बनवतात आणि गरिबांना निगेटिव्ह. कोरोनाच्या बाबतीत अशाअशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत की विचारुच नका. या अफवा ऐकुन एकीकडे हसु येत तर दूसरीकडे यांच्या विचारधारेवर तेवढाच खेद. खेद यासाठी की, न जानो हे आपली हिरोगिरी दाखवताना एकदिवस कोरोनाचे शिकार होतील आणि जर एखाद्या जटीलतेमुळे यांचा जीव गेलाच तर त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबियांच काय होईल? मनात येत यांची त्या १.६५,१३८ जणांच्या कुटुंबियांची भेट वघालून द्यावी ज्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. गेल्या वर्षी अॉक्टोंबर महिन्यात माझ्या वडिलांच निधन कोरोनाने झाले तर नुकतच मार्च मध्ये माझ्या सासुबाईंचे. मी स्वतः कोरोना बाधित असल्याने माझ्या वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहु शकलो नव्हतो तर माझी सौ स्वतः कोरोना बाधित असल्याने तिच्या आईच्या अंत्यविधीला. लक्षात घ्या, कोरोनामुळे आपला जीव कदाचित जाणार नाही पण एकदा का कोरोना बाधित झालात तर आपल्याला मोठी आर्थिक आणि मानसिक झळ बसु शकते.

लॉकडाऊन लावुन देशाला परत एकदा मोठया आर्थिक संकटात झोकण्यात समजदारी निश्चित नाही. ज्यांना आपण आणि आपल्या कुटुंबियांचा जीव प्रिय आहे ते नियमांचं पालन करतील आणि ज्यांना वाटत कोरोना-फरोना काही नाही किंवा तो माझ काही बिघडवणार नाही त्यांना त्यांच्यावर सोडुन द्या. कोरोना बाधित रुग्ण सापडल्यावर त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, कंटेन्टमेंट झोन बनवणे, गर्दी कमी करण्यासाठी व्यापारावर निर्बंध लावणे, पोलिसांची मदत घेऊन मास्क व सामाजिक अंतराची अंमलबजावणी करुन घेणे तर दूसरीकडे जास्तीत जास्त लोकांचे लसिकरण हाच यावरिल उपाय आहे.

लोकांच्या मनात सरकार प्रती तिव्र नाराजी आहे. ती यासाठी की, देशात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. याठिकाणी सर्वच पक्षांची नेते मंडळी लाखो लोकांची गर्दी सभेला जमवुन शक्तीप्रदर्शन करीत आहेत. या ठिकाणी एखादा-दुसरा नेता आणि बंदोबस्ताला असलेले कर्मचारी सोडुन कोणीच मास्क लावलेला दिसत नाही तर दुसरीकडे निवडणूका नसलेल्या राज्यांमध्ये नियमांचे काटेकोरपणे एवढे पालन करुन घेतले जात आहे की, कोणी दोघे जण मोटरसायकलवर जात असतील आणि त्यापैकी एकाने जरी मास्क घातला नसेल तर त्याच्याकडून नुसता दंडच वसुल केला जात नाही तर सोबत लाठीचा प्रसादही मिळतोय. कोणी जर आपल्या चार चाकी वाहनाच्या सर्व काचा बंद करून विना मास्क गाडी चालवत असेल त्याच्या सोबतही असाच व्यवहार केला जात आहे जणु त्याने फार मोठा गुन्हा केला आहे. यात न जनतेचा दोष आहे न कायद्याच्या रक्षकांचा. दोष तर त्या नेत्यांच्या दुटप्पी वागण्याचा आहे, ज्यात एकीकडे सभांना लाखोंची गर्दी जमवुन त्यांना शक्तीप्रदर्शन करायच आहे तर दुसरीकडे विनामास्क सापडलेल्या व्यक्तीला दहा पोलिसांनी घेरुन दंडे बसवायचे आहेत.

            लक्षात घ्या, ही या महामारीच्या दुस-या लाटेची सुरुवात आहे आणि ती विक्राळ रूप धारण करणार आहे कारण लोकांना कोरोनाचे कसलेच गांभीर्य नाही. त्यांनी मास्क न लावण्याची वेगवेगळ्या प्रकारची कारणे शोधून काढली आहेत. नजीकच्या काळात ही महामारी गंभीर स्वरुप धारण करण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी बेड्स कमी पडताहेत, रेमडेविसिर इंजेक्शनचा तुटवडा अनेक ठिकाणी निर्माण झाला आहे. अॉक्सीजनची मागणी वाढली आहे आणि सोबत मृत्यू मोठया प्रमाणात होत आहेत. आपण मात्र हे वाचत असाल तर आपल्याला माझी विनंती आहे.... आपण खूप मोठ्या संकटातुन जात आहोत, गैरजबाबदार लोकांचे अनुकरण करु नका. थोड्याश्या निष्काळजीपणामुळे आपल्याला कोरोना झाला आणि काही अघटित घडल तर ही लोकं आपली साधी विचारपूस करायला येणार नाहीत न सरकार आपल्या घरात डोकावेल, सोबत मास्क न लावण्याच आपल पौरुषत्व आपल्या कुटुंबियांच्या कसलच कामी येणार नाही. म्हणून मास्क घाला, विनाकारण घराबाहेर पडुन गर्दी करु नका, कोविड-१९ विषयक नियमांचे पालन करा. माझे कुटुंब, माझी जबाबदारी.

-सुरेश मंत्री


टिप्पण्या

  1. खूपच गंभीर परिस्थिती दर्शवणारा लेख आहे सर ! बेजबाबदार लोकांमुळेच अशी परिस्थिती ओढवली आहे !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...