कोरोना महामारीच्या दुस-या लाटेतच देशातील आरोग्य व्यवस्था ढासळली असताना आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती आणि नैराश्याच्या दरम्यान अशा काही बातम्या येत आहेत ज्या आशेचा किरण निर्माण करण्याच काम करित आहेत. या कठिण प्रसंगातही देशातील एक मोठा गट समर्पण आणि संकल्पाच्या भावनेने काम करण्यासाठी तत्पर आहे. खरंतर कोणतीही आपत्ती केवळ सरकारसाठीच नाही तर समाजासमोरही आव्हान ऊभा करत असते. समाजातील मोठा समुह त्या आव्हानांना समजतोही आणि आपापल्या सामर्थ्यानुसार ऊभा राहतो आणि या आव्हानांना दुर करण्याचा किंवा कमी करण्याचा शक्य तितका प्रयत्नही करतो. एका संवेदनशिल, सक्रिय आणि सतर्क समाजाचे हेच लक्षण आहे. कोरोना महामारीच्या या हाहाकारादरम्यान आपल्यासमोर अशा बातम्या येत आहेत ज्यात धार्मिक, राजकिय आणि सामाजिक संघटनाच नाही तर वैयक्तीक स्तरावर सुद्धा लोक आपापल्या पद्धतीने पिडित लोकांना आणि गरजवंतांना मदत करित आहेत.
सध्या गाजियाबादच्या एका गुरुद्वाराने देशाचे लक्ष वेधले आहे. या गुरूद्वाराने आव्हान केले आहे की, जर कोणी ऑक्सीजनशिवाय तडफडत असेल तर त्याला आमच्याकडे घेवून या. आम्ही त्याला तोपर्यंत ऑक्सीजन देत राहु जोपर्यंत त्याची एखाद्या रूग्णालयात व्यवस्था होत नाही किंवा तो गृह विलगीकरणासाठी सक्षम होत नाही. कोरोना रूग्ण याठिकाणी येत आहेत, त्यांना इथे ऑक्सीजनही भेटत आहे. असच काही बातम्यांवर नजर टाकली तर याचा प्रभाव आणि विस्तार याची आपल्याला कल्पना येवू शकते. अशीच बातमी जोधपुरहुन आहे. येथील काही व्यापा-यांनी मिळुन ऑक्सीजन बँक सुरू केली आहे. ब्लड बँकेच्या तत्वावर चालणारी ही ऑक्सीजन बँक केवळ कोरोना काळापुरतीच मर्यादीत नाही तर प्रत्येक कठिण प्रसंगात स्थायी स्वरूपात रूग्णालये आणि गरजु व्यक्तींना ऑक्सीजन उपलब्ध करित राहील. केवळ दोन-तीन दिवसातच यासाठी कोटयावधी रूपये जमा झाले सुद्धा आणि आता ही ऑक्सीजन बँक चालु होण्याच्या स्थितीत आहे. आपण याठिकाणी त्या उद्योगपती घराण्यांची चर्चा करणार नाहीत जे मोठया प्रमाणात ऑक्सीजन किंवा अन्य मदत घेवून आलेत. नक्कीच येत्या काही दिवसात ऑक्सीजनचा पुरवठा मागणीनुसार होईलच परंतू कठिण प्रसंगात जेंव्हा सगळीकडे हाहाकार माजलेला असतो तेंव्हा अशाप्रकारचे प्रयत्न निश्चितच आशेचा किरण दाखवितात.
आपल्या देशातील बुद्धीजीवी वर्गाला देशातील धार्मिक संस्थांवर टिका करण्याची भारी हौस आहे, मात्र आज हयाच धार्मिक संस्थांमार्फत जागोजागी कोविड केअर सेंटर ऊभारले जात आहेत. राधास्वामी सत्संग, निरंकारी मिशन, सावन कृपाल रूहानी मिशन, स्वामीनारायण मंदिर, चिन्मय मिशन, रामकृष्ण मिशन ही तिच नावे आहेत ज्यांच्या कोविड केअर सेंटर्सच्या बातम्या आणि फोटो मीडियामध्ये जागा मिळवत आहेत. मंदिरे, मस्जिद, गुरूद्वारे आणि मठांनी कोविड केअर सेंटरसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. नुकतीच मुंबईमधील एका जैन मंदिराचे सर्व सुविधांनीयुक्त कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर झाल्याची बातमी आली आहे. यानंतर देशातून अशाच प्रकारच्या बातम्या येवू लागल्या. अशाचप्रकारे वडोद-याच्या जहांगीरपुरा मस्जिदकडून आपल्या परिसरात कोरोना रूग्णांची सोय करण्यात आल्याची बातमी आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले सेवा अभियान व्यवस्थित पद्धतीने चालावे म्हणून सर्व राज्यांमध्ये प्रभारींची नियुक्ती केली. याच्याशी जुडलेल्या संघटना आपापल्या क्षमतेनुसार कित्येक प्रकारची कामे करत आहेत. कोणी लसीकरणात तर कोणी लहान-मोठे कोविड केअर किंवा आयसोलेशन सेंटर चालवण्यात मदत करत आहे. काही संघटना रूग्णवाहिकेची व्यवस्था करताहेत तर काही औषधी आणि ऑक्सीजनची. नुकतच ६ मे रोजी जनकल्याण समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पूर्व बीड यांनी बीड जिल्हयातील पाच तालुक्यांसाठी पाच ऑक्सीजन कॉन्सनट्रेशन मशीन्स दिल्या आहेत आणि आणखीन पाच मशिन्स उपलब्ध करून देणार आहेत अशी बातमी माझ्या वाचनात आली.
सर्व राजकिय पक्षही आपापल्या भागात मदत कार्याला लागले आहेत. दिल्ली मध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिळून भोजनालय सुरू केले आहे ज्यातून कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांना भोजन दिले जात आहे. कोरोना काळात विशेषकरून लॉकडाउनच्या काळात केवळ कोरोना रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयातच नाही तर अनेक सामान्य कुटुंबांमध्ये दोन वेळच्या भाकरीची सोय करणे अवघड झाले आहे. जर फोनवर आपण याची माहिती आपण दिली तर तेवढया संख्येत अन्नाची पाकिटे आपल्या पर्यंत पोहचताहेत. बीड मधील कलंत्री परिवाराने कोरोनाग्रस्त कुटुंबापर्यंत नि:शुल्क शाकाहारी भोजन देण्याची सामाजिक जबाबदारी स्विकारली आहे. मंदिरं, गुरूद्वारा आणि अनेक धार्मिक संस्था, स्वयंसेवी संस्था या कामात दिवसरात्र लागल्या आहेत. बीड जिल्हयात मानवलोक या समाजसेवी संस्थेने काही शैक्षणिक संस्थांच्या मदतीने कोविड सेंटर सुरू केली आहेत. काही ठिकाणी सोसायटयांनी आपल्याकडिल मोकळ्या जागेचे रूपांतर कोविड सेंटर मध्ये केले आहे. काही वाट्सअॅप ग्रुप खास उद्देशाने बनवले गेले आहेत. म्हणजे काही वाट्सअॅप ग्रुप औषधे उपलब्ध करून देतात तर काही ऑक्सीजन. अंबाजोगाईत अंबाजोगाई चॅरिटी ग्रुप आणि रोटरीच्या मदतीने कोरोना सेंटरर्सना विविध साहित्य देवून मदत करण्यात येत आहे. सोबत लसीकरण मोहिमेतही सहकार्य करण्यात येत आहे.
जगात असे कोटयावधी लोक आहेत, जे कोरोना काळातही एक-दुस-याला मदत करण्यात खरा आनंद मानतात. मुंबईच्या शाहनवाज शेख या तरूणाने २२ लाख रूपयांची आपली कार विकुन चार हजार गरजु लोकांपर्यंत ऑक्सीजन सिलेंडर पोहचविले आहेत. आपली किडनी निकामी झाल्यानंतर स्वत: ऑक्सीजन सपोर्टवर जीवंत असणा-या रोजी सलढाना या महिलेने आपले सर्व दागीने विकुन आठ सीलेंडर खरेदी केले आहेत, ज्यातील ऑक्सीजन गंभीर कोरोना रूग्णांसाठी प्राणवायू आहे. नाशिक महानगरपालिकेच्या हिंदू स्मशानभूमीची धुरा मागील दहा वर्षांपासुन एक मुस्लीम शेख सांभाळत आहे. महामारीच्या भीतीने जेंव्हा मृताचे स्वकियच मृतदेहाच्या जवळ येण्यास नकार देत आहेत, अशा बिकट प्रसंगात लखनऊची वर्षा आपल्या शववाहिनी मार्फत रूग्णालयातील शवांना स्मशानभूमीत पोहचवित आहे. मनोज वाल्मीकी, सुनील शर्मा आणि पोलीस नायक डी.पी.वारे पीपीई कीट वा अन्य सुरक्षा साधनांचा वापर न करता बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. एकतर प्रत्येकाच्या घरात दु:खद घटना घडताहेत. आप्त, हितचिंतक संकटात आहेत. तरीही न खचता लोक सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहेत. एकीकडे राजकिय व्यवस्थेच अपयश अधोरेखित होत असतानाच दुसरीकडे सामान्य माणूस सेवाकार्यासाठी पूढे येतोय हेच निकोप संस्कृतीचे लक्षण आहे.
खरंतर अशा उपक्रमांच्या बाबतीत लिहायच तर जागा कमी पडेल सोबत ही यादी संपणार सुद्धा नाही. यातुन हे मात्र स्पष्ट होते की, संकट किती का गंभीर असेना आपण सर्व मिळून त्याचा सामना करू शकतो आणि त्यावर विजय मिळवू शकतो. आपला देश आणि समाजाचे जे निराशाजनक चित्र उभा केले जात आहे तेही वास्तविक नाही हेही यातून स्पष्ट होतय. लोकांच्या मनात आजही सरकारी मदतीविना नि:स्वार्थ भावनेने दु:खी, पिडितांची मदत करण्याची भावना कायम आहे. हिच भावना या संकट काळात मोठा आधार बनुन राहिली आहे. कोरोना महामारीमुळे सोशल मीडिया सोबत प्रत्येक जागी भीती पसरली आहे. या भीतीमुळे मन आणि शरिर कमकुवत होवून नैराश्य निर्माण होत आहे. कोरोना विषाणू पासून सावधानी तर ठिक आहे, पण खूप भीती बाळगण्याचे कारण नाही. कोणत्याही परिस्थितीत या भीतीला आपल्यावर वरचढ होवु देवू नका. जेंव्हाही अशी भीती वाटेल तेंव्हा अशा लोकांचा विचार करा ज्यांनी आपल्या ईच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात केली आहे. त्या कोविड योद्ध्यांना आठवा जे आपला जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवत आहेत. आज सगळीकडे भयावह परिस्थिती आहे. पुढे काय होईल याची चिंता आहे. पण रात्रीनंतर सकाळ अटळ आहे. या आधीही खूप संकटे मानवजातीवर आली आहेत, पण आपण त्यावर मात केली आहे. हा काही अंत नाही, हयातून बाहेर पडणारच आहोत आपण. आपण हया परिस्थितीकडे कसे पाहतो यावर याचा आपल्याला त्रास होणार की आपण आनंदी राहणार हे ठरलेल आहे. या महामारीच्या काळात आपण चिंतीत होवून इतरांच्या चिंतेचे कारण बनण्याऐवजी अशा उपक्रमांमध्ये सहभागी का नाही होत? लक्षात घ्या, कोरोनाच सर्वात मोठ औषध आहे आपली रोगप्रतिकारक क्षमता आणि त्याचा ऑक्सीजन आहे आपला आनंद. हया काळात मी न घाबरता जगलो, आनंदी होतो, लोकांसाठी जितक शक्य तितक केल... हया आठवणी बनवायच्या आहेत, का मी सतत घाबरत, रडत सहानुभूती घेत दिवस काढले, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. हसा, आई-वडिलांशी बोला, त्यांच ऐकून घ्या, बायकोला लव्ह यू म्हणा.. मुलांसोबत खेळा.. आपल्या परिचितांना फोन करा.. ज्यांना मदत करता येते करा..सर्वात मोठी गोष्ट आनंदी रहा, नियमांचे पालन करा आणि मस्त जीवन जगा.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा