कोरोना रुग्णांवरील अॅलोपॅथी उपचारांबाबत योगगुरु रामदेव बाबा यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक पत्र लिहून आपण ते वक्तव्य मागे घेत असल्याचं म्हटलंय. बाबा रामदेव यांच्याकडे हे विधान मागे घेण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्या उपचार पद्धतीच्या आधारे संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच उपचार पद्धतीची निंदा अशा नाजुक परिस्थितीत करण्यामागील कारण काही लक्षात येत नाही.
नेमकं प्रकरण काय?
कोरोना संकटाच्या काळात योगगुरु रामदेव बाबा यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील अॅलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. कोविड उपचार पद्धतीमध्ये फॅबीफ्लू आणि स्टेरॉईड्ससह अन्य अँन्टिबायोटिकही फोल ठरल्याचं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं आहे . त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन आयएमएने आक्रमक भूमिका घेतली होती. रामदेव बाबा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आयएमएने केली होती.
साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाईची मागणी:-
रामदेव बाबा यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या आयएमएने थेट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेच दाद मागितली होती. “केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी एक तर हा आरोप स्वीकार करावा आणि आधुनिक उपचार पद्धती बंद करावी. नाहीतर मग रामदेव बाबा यांच्याविरोधात कारवाई करुन साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आयएमएने केली होती. देश कोरोना महामारीचा सामना करतोय. आधुनिक उपचार पद्धती आणि भारत सरकार मिळून लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या १ हजार २०० अॅलोपॅथी डॉक्टरांनी बलिदान दिलंय, असंही आयएमएने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं होतं.
कोरोनावरील उपचाराचे असेही दावे :-
भारतात अनेक आजारांवर गोमूत्र किंवा शेणाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. अलीकडेच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या खासदार सुमन हरीप्रिया यांनी कोरोना व्हायरसचा इलाज करण्यासाठी गोमूत्राचा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, "गाईच्या शेणाचे अनेक फायदे आहेत. कोरोना व्हायरसवरही यामुळं मात करता येईल, असं मला वाटतं. त्यासाठी गोमूत्राचाही वापर होऊ शकतो." त्याचबरोबर, कोरोना व्हायरसवर उपाय म्हणून गोमूत्राला प्रोत्साहन देण्यासाठी एका समूहाने दिल्लीत गोमूत्र पिण्याचा कार्यक्रमही आयोजित केला होता. दरम्यान, गोमूत्राच्या अँटी-बॅक्टेरियल गुणांविषयी याआधीही संशोधन करण्यात आलं आहे. पण, दिल्लीतल्या इंडियन व्हॉयरॉलॉजीकल सोसायटी (आयव्हीएस ) चे डॉ. शैलेंद्र सक्सेना यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं, "आतापर्यंत असा एकही मेडिकल पुरावा सापडलेला नाही ज्यामध्ये गोमूत्रात अँटी-व्हायरलचे गुण आहेत. तसंच गाईच्या शेणाचंही आहे. त्याचा वापर केला तर ते अंगलटही येऊ शकतं. कारण, कुणास ठाऊक त्यामध्ये कोरोनाव्हायरस असूही शकतो"
अमुक सामान कोरोनापासून तुम्हाला वाचवेल असा दावा करत काहीजण व्यवसाय करत असल्याचंही दिसून आलं आहे. उदाहरणार्थ, १५ हजार रुपयात 'अँटी-कोरोना व्हायरस गाद्या' घ्या आणि कोरोनाला दूर ठेवा अशी जाहिरातही मुंबईतल्या स्थानिक वर्तमानपत्रात देण्यात आली होती. त्यावर भिवंडीच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. अलीकडे उत्तर प्रदेशात आणखी एक टूम निघाली, की शरिराला गोमुत्र व शेण लावल्याने कोरोना होत नाही. त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. या दाव्याला शास्त्रामध्ये काही आधार आहे काय, याची शहानिशा ज्यांनी ते लावले होते, त्यांनीही केली नाही. यावरून समाजात हर्ड मेन्टॅलिटी आहे, असे दिसते. कुण्या बाबा, गुरू, साध्वी वा माताजी यांनी कोणतीही गोष्ट सांगितली, की डोळे झाकून त्याचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती आपल्याकडे आहे.आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहे, हे स्पष्ट आहे. याच अंधश्रद्धेविरूद्ध महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांनी सारं जीवन लढण्यात व्यतीत केलं. अखेर, त्यांची विज्ञानाधिष्ठित विचारसरणी खपून न घेणाऱ्यांनी त्यांचा खून केला. त्यांचे खुनी अद्याप हाती लागलेले नाही. पोलीस खात्यासाठी अधिक नामुष्कीची बाब ती कोणती.केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्रात आलेल्या शिवसेनेच्या पहिल्या मंत्रिमंडळात खुद्द माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी, गणपतीची मूर्ती दुग्धप्राशन करते, असे सांगितले होते. त्यावरून महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते. त्या दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नव्हता. तरीही त्यावर विश्वास ठेवणाऱ्याना ते खरेच वाटले व मूर्ती दूग्धप्राशन करते, असेही ते म्हणू लागले. आधीच आपल्याकडे अशिक्षितांची संख्या अफाट. त्यात शिकलेल्या राजकीय नेत्यांनी मनाला येईल, त्या भोळसट कल्पना पसरावयाच्या, यापेक्षा देशाला मागे खेचण्याचे काम ते कोणते.देशाची प्रगती करायची असेल आधुनिकतेची कास धरायची असेल, प्रत्येकाने सायंटिफिक टेम्पर अंगी बाणवला पाहिजे, असे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी सांगत. विज्ञान व तंत्रज्ञान याला त्यांनी मोठे प्रोत्साहन दिले. या खात्याचे मंत्रीपद सध्या आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे आहे. त्यांनीच या विचाराला सुरुंग लावला. रामदेव यांच्या पतंजली उद्योगाने कोरोनावर रामबाण उपाय म्हणून कोरोनील या औषधाची निर्मिती केली. त्याच्या विक्रीचा प्रारंभ करायला खुद्द हर्षवर्धन गेले होते. वस्तुतः या औषधाच्या कोणत्याही स्वतंत्र व अधिकृत शास्त्रीय चाचण्या झालेल्या नव्हत्या. ते औषध सुरक्षित आहे काय, याची शहानिशा झाली नव्हती. उलट, भाजप सरकराने बाबा रामदेव यांना डोक्यावर घेतल्याने व सवलती उपलब्ध करून दिल्याने आपण काहीही केले, तरी खपेल व मंत्री तर धावत येतील, या विचाराने त्यांनी कोरोनीलच उत्पादन केले. परंतु, गेल्या मार्चपासून देशाला ग्रासलेल्या कोरोनाला हे औषध लागू पडल्याचे एकही उदाहरण समोर आले नाही. त्या निमित्ताने बाबा रामदेव यांनी मात्र लाखो रूपये कमावले असतील व गरीबांच्या घशात ते ओतले असेल. प्रत्येक वस्तूची विक्री व जाहिरात करण्यासाठी आज सोशल मिडियाचा उपयोग केला जातो, तसाच याबाबतही झाला. दुर्देवाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंधश्रद्धेला थारा देऊ नका, असे कधी त्यांच्या मंत्र्यांना जाहीररित्या सांगितले नाही.
तीन वर्षांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी विश्वाच्या उत्क्रांतिच्या सिद्धांताला आक्षेप घेऊन तो विषय शाळेतून शिकवायला नको, असे मत व्यक्त केले होते. विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या केंद्रीय मंत्र्याने दावा केला होता, की वेदविद्येमधील सिद्धांत आइऩस्टाईनच्या सिद्धांताना मागे टाकणारे आहेत. गेल्या वर्षी या मंत्रालयाने गोमूत्र व शेणाचे काय लाभ आहेत, यावर संशोधन करण्यासाठी अर्थसाह्य देऊ केले होते. त्यापुढेही जाऊऩ एका माजी मुख्यमंत्र्याने दावा केला, की गाय हा असा एकमेव प्राणी आहे, की जो श्वसन करताना प्राणवायू बाहेर टाकतो. भोळसट कल्पना रुजवायच्या या मंत्र्यांच्या स्पर्धेकडे पाहिले, की हे असेच चालू राहिले आणि शालेय पुस्तकातही त्यांचा समावेश केला, तर भारताची पुढील पिढी पुराणकाळाच्या पुढे जाणार नाही. विज्ञानाची कास धरली नाही, तर देश कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकणार नाही.
अशा प्रकारच्या तथ्यहिन वक्तव्यांमुळे भारताची जागतिक छबी खराब होवु शकते. जर आपल्याकडे कोरोना मुक्तीसाठी शेण आणि गोमुत्र मोठया प्रमाणात आहे तर आपण इतर देशांना औषधं, इंजेक्शन्स, ऑक्सिजन, कच्चा माल यांची भीक का मागत आहोत? जर अॅलोपॅथी उपचार पद्धती बेकार आहे, कोणत्याच कामाची नाही तर सरकार प्रत्येक राज्यात अॉल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्स कशासाठी खोलत आहे? भारतात अॅलोपॅथी उपचार पद्धतीचे डॉक्टर तयार करण्यासाठी कोट्यावधी रुपये का खर्च केले जात आहेत? महात्मा गांधी सुद्धा स्वतः घरेलु व निसर्ग उपचारावर विश्वास ठेवत असत म्हणून मात्र त्यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीला कधी दुय्यम स्थान दिल नाही. प्रश्न मीडियाचा सुद्धा आहे, तो अशा निर्थक विधानांना प्रसिद्धी तरी का देतो?
- सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा