तुर्कीच्या खेळाडू बुसेनाझने लवलीनावर पहिल्यापासूनच वर्चस्व राखले होते. लवलीनापेक्षा अनुभवी आणि चपळ असलेल्या बुसेनाझने प्रत्येक संधीचा फायदा घेत बाजी मारली. बुसेनाझने तिन्ही राउंड जिंकत एकहाती सामना जिंकला. लवलीना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. लवलीनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लवलीना तिसरी भारतीय बॉक्सर बनली आहे. याआधी २००८ मध्ये बीजिंग ओलिम्पिकमध्ये विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकलं होतं. तर २०१२ लंडन ओलिम्पिकमध्ये मेरी कोमने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. विशेष म्हणजे लवलीनाने पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळताना पदक खिशात घातलं आहे. लवलीनाच्या कांस्यपदकासह भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आता तीन पदके झाली आहेत.
भारताच्या दुर्गम भागातून आलेल्या अन्य खेळाडूंसारखाच लवलीनाचा संघर्ष आहे. लवलीना बोरगोहेनचा जन्म २ ऑक्टोंबर १९९७ रोजी झाला. तिचे वडील टिकेन आणि आई मामोनी बोरगोहेन. वडील टिकेन एक छोटे व्यापारी तर आई गृहिणी. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बाडा मुखिया गावात राहणाऱ्या लवलीनानं मोठ्या संघर्षातून हे यश मिळवलं आहे. लवलीना या भागात खूप लोकप्रिय आहे. आपल्या मुलीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवलीनाच्या आईवडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लवलीनाला तीन बहिणी आहेत. तिच्या दोन मोठ्या बहिणी लिचा आणि लीमा यांनी आधी किक बॉक्सिंग सुरु केली. त्यानंतर लवलीनाही किक बॉक्सिंगमध्ये आली.
लवलीनाला माइक टायसनची स्टाईल आवडते तर मोहम्मद अली देखील तेवढेच आवडतात. मात्र आता तिनं या दोघांप्रमाणेच आपली वेगळी ओळख बनवली आहे. २०१८ मध्ये लवलीनानं दिल्लीत आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर रशियात आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये लवलीनानं पुन्हा कांस्यपदक जिंकलं होतं. लवलीनाला तिच्या कामगिरीच्या बळावर मानाचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे.
ऑलिम्पिकच्या आधीचे काही दिवस लवलीनासाठी खूप कठिण होते. ऑलिम्पिकआधी सर्व खेळाडू ट्रेनिंगमध्ये असताना लवनीना मात्र बॉक्सिंगपासून दूर होती. लवलीनाच्या आईची कीडनी ट्रान्सप्लांट सर्जरी या काळात झाली. ही सर्जरी झाल्यानंतर लवलीना ट्रेनिंगसाठी परतली. तुर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुरमेनेली हिच्याविरुद्ध लवलीन जिंकली नसली तरी तिने देशवासियांची मने जिंकली आहेत. टोक्यो आलिंपिकमध्ये देशाला तिसरं पदक जिंकून देत तिने देशाचा गौरव, देशवासियांचा आनंद बहुगुणीत केला आहे. लवलीनानं जिंकलेल्या कांस्यपदकाचं मोल सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. मुष्ठीयुद्धाचा गौरवशाली इतिहास असलेल्या भारतात लवलीनाच्या यशापासून प्रेरणा घेऊन अनेक मुली पुढे येतील, देशाचा गौरव वाढवतील. बॉक्सर लवलीना बोरगोहेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. लवलीना खूप लढली आहे. बॉक्सिंग रिंगमध्ये तिने मिळवलेले यश अनेक भारतीयांना प्रेरणा देते. तिची चिकाटी आणि जिद्द कौतुकास्पद आहे. कांस्यपदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा ! असे ट्विट करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. लवलीना बोरगोहेन हिच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल लवलीना बोरगोहेन हिच अभिनंदन !
- सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा