समलैंगिक
संबंध हा खरं तर संवेदनशिल विषय. फ्रान्स, यूएसए, यूके आणि
न्यूझीलंड मध्ये समलिंगी विवाहाला परवानगी आहे. तर नेपाळ आणि चीन मध्ये समलैंगिक संबंध हा आता गुन्हा नाही
मात्र इराणच्या कायद्यात यासाठी मृत्यूदंड आहे. सहमतीचा समलैंगिक संबंध म्हणजे गुन्हा नाही हे
ठरवणारा भारत हा नेपाळनंतर दक्षिण आशियातील दुसरा देश. हा निर्णय येऊन जवळपास चार
वर्षेच झाली आहेत. समलैंगिक समुदाय भावना, सत्य, सामाजिक मर्यादा, परंपरा,
समानता आणि कायदा यांच्या या चक्रात आजही अडकलेला दिसून येतो. समाज आणि चित्रपट हे नाते परस्परपूरक आहे हे
सर्वश्रुत आहेच. समाजाचे प्रतिबिंब चित्रपटात आणि चित्रपटाचा प्रभाव समाजावर असे
ते समीकरण आहे. समलैंगिक संबंधांवर आधारीत चित्रपट
बनवणं हा हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अनेक वर्षांपासून नाजूक आणि क्लिष्ट मुद्दा
राहिलेला आहे. पूर्वी अशा विषयावर चित्रपट बनवण आणि प्रदर्शित करण हे एकप्रकारच
धाडसच होत. सुरूवातीच्या काळात अशा चित्रपटांना
बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावे लागले. अनेकदा त्यावरून वादही झाले. चित्रपटांवर
बंदीचे सावटही आले. त्या काळी समलैंगिक संबंध हा विषय तितक्या सहजतेने स्वीकारला
जाणारा नव्हताच. समलैंगिक संबंध हा शब्द उघडपणे उच्चारायची देखील सोय नव्हती. समाजात तेवढी प्रगल्भता नव्हतीच. तरीही
सिनेसृष्टीने धाडस करायचे सोडले नाही. कालांतराने समाजाच्या विचारधारेत हळूहळू बदल
होऊ लागला. हा प्रवास साधा, सोपा मुळीच नव्हता.
अनेक अडथळे पार करत पूर्वी आक्षेपार्ह वाटत असलेला मुद्दा आता मात्र स्वागतार्ह
झाला आहे. १९९६ च्या 'फायर' ते २०१९ च्या 'इक लडकी को देखा तो ऐसा लगा' पर्यंतच्या प्रवासाला
जवळपास २३ वर्षं लागली.
फायर (१९९६), दरमियां (१९९७), तमन्ना (१९९७),
माय ब्रदर निखिल (२००५), अलीगढ (२०१४), इक लडकी को देखा तो ऐसा लगा (२०१९), बधाई दो (२०२२)
हे समलैंगिकतेवर आधारित चित्रपट. १९७१
मध्ये प्रदर्शित झालेला 'बदनाम गली' हा समलैंगिकतेच्या विषयाला स्पर्श करणारा पहिला हिंदी चित्रपट म्हणता
येईल. यात समलैंगिकतेचं थेट चित्रण करण्यात आलेलं नव्हतं पण यातील कथा ही
समलैंगिकतेच्या विषयाला स्पर्श करणारी होती. त्यावेळी
असलेल्या सामाजिक वातावरणामुळे कदाचित चित्रपट निर्मात्याला एवढच स्वातंत्र्य
मिळाले असेल. अगदी ९० च्या दशकापर्यंत चित्रपटात समलैंगिक पात्र असेल तर अगदी
दबकतच दाखवल जायच, लेस्बियन पात्र दाखवण तर दुरच.
१९९५
मध्ये 'अधुरे' नावाच्या चित्रपटात मात्र समलैंगिकता हा विषय
उघडपणे मांडण्यात आला होता. इरफान खाननं या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती.
मात्र हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला आणि सेन्सॉर बोर्डाने या
चित्रपटास परवानगी नाकारल्याने हा चित्रपट प्रदर्शित होवू शकला नाही. पूर्वी अशी पात्र चित्रपटात असतील
तर ती केवळ चेष्टेचा विषय म्हणून किंवा नकारात्मक भूमिकेत असायची. १९९६ मध्ये आलेल्या 'फायर' या चित्रपटामुळे सामजिक गदारोळ निर्माण झाला
होता. हा
चित्रपट त्या काळाच्या बराच पुढचा होता. या चित्रपटात दोन समलैंगिक स्त्रियांची कथा दाखवण्यात आली
होती. समाजातील एका वर्गाने या चित्रपटाचे स्वागत केले होते तर दुस-या वर्गाने
विरोध. या
वादाला राजकीय रंग लागला आणि चित्रपटाचा वाद चिघळतच गेला. पण या चित्रपटामुळे समलैंगिकतेवर बोलण्यास
सगळ्यांना प्रवृत्त केलं. पुरुषसत्ताक मानसिकतेला आव्हान देणारं यापेक्षा मोठं काय
असू शकतं, जिथं स्त्रिया
म्हणतात की त्यांना पुरुषांची गरज नाही. स्वत:ला लेस्बियन समजणाऱ्या स्त्रिया आजही
समाजात खालच्या स्तरावर आहेत. दोन पुरुषांची प्रेमकथा सांगण्यापेक्षा दोन
स्त्रियांची प्रेमकथा सांगणे जास्त जोखमीचं आहे. अशाच वादाची झळ लागली ती 'गर्लफ्रेंड' या सिनेमाला. १९९७ मध्ये आलेला महेश भट्टचा 'तमन्ना' हा चित्रपट
सत्यकथेवर आधारित होता. यात परेश रावल यांनी समाजापासून दूर, भावना असलेल्या एका ट्रान्सजेंडर व्यक्तीरेखा
साकारली होती. त्याला एक मुलगी आहे असं दाखवण्यात आलं होत. पण ती मुलगी एका
ट्रान्सजेंडरला तिची आई किंवा वडील म्हणून स्वीकारू शकेल का ? असा या चित्रपटाचा आशय आहे. माय ब्रदर निखिल' या सिनेमाचेही तसेच झाले. एचआयव्हीग्रस्त व्यक्तीवर
हा सिनेमा बेतला होता. पण त्यात समलैंगिक संबंधावरही भाष्य केले होते. सिनेमा
२००५ मध्ये प्रदर्शित झाला असला तरी त्यातील कथानक १९८७ ते १९९४ या काळातले होते.
त्यामुळे त्या काळातील अशी गोष्ट दाखवणे धाडसाचेच होते.
'इक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटाची कथा लिहिणारी गझल धालीवाल स्वतः एक ट्रान्सवूमन आहे,
म्हणजेच शस्त्रक्रियेनंतर तिचं रूपांतर पुरुषातून स्त्रीमध्ये झालं
आहे. गझल ही मुलगा म्हणून जन्माला आली पण तिला मुलीसारखं व्हायचं होतं. ती
पुरूषाच्या शरीरात कैद झाली आहे असं तिला वाटायच. तिच्या पालकांनी तिच्या या
भावनेकडे दुर्लक्ष केल. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र तिला तिच्या
पालकांनी मुलगा म्हणून स्विकारल आणि लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्याची परवानगी
दिली.
गझल सारख्या माणसांच्या सत्य परंतु कधीही गांभिर्याने न
घेतलेल्या कथा आज पडद्यावर येत आहेत. ‘मार्गेरिटा विथ ए स्ट्रॉ' मध्ये एका अपंग मुलीच्या लैंगिक इच्छेचा शोध
घेण्यात आलाय. तर २०२२ च्या 'बधाई दो' मधील
सुमी लेस्बियन आहे. २०२१ मध्ये आलेला पहिला व्यावसायिक चित्रपट 'चंदीगढ करे आशिकी' ही गझल धालीवाल सारख्या
ट्रान्सवुमनची कथा आहे. शुभ मंगल ज्यादा सावधान' या
चित्रपटात कार्तिक सिंग (आयुष्मान खुराना) समलिंगी आहे. ‘अलीगढ' सारख्या चित्रपटांशी जोडलेले पटकथा लेखक अपूर्व असरानी यांनी ८० आणि ९० च्या
दशकातील मुंबईतील समलैंगिक तरुणाची, स्वत:ची कथा सादर केली
आहे. मराठीमध्ये 'बायोस्कोप' या चित्रपटात, रवि जाधव
दिग्दर्शित 'मित्रा' या लघुपटातही समलैंगिक संबंधांचा विषय मांडला आहे. या लघुपटाला राष्ट्रीय
पुरस्कारही मिळाला आहे. चित्रपटात ज्याप्रकारे तो विषय मांडला आहे त्याचे
प्रेक्षकांकडून कौतुक झाले. इंटरनेट
आणि ओटीटीच्या आगमनापासून मात्र आता समलैगिक समुदायाच्या समस्या आणि सामाजिक परंपरांसोबतचा
त्यांचा संघर्ष याविषयीचे चित्रपट, शॉर्ट फिल्म तयार केल्या जात आहेत. चित्रपटानंतर अनेक वेब सीरिजनेही हा विषय उचलून धरला. पूर्णत: याच विषयावर वेब सीरिज आधारित नसली तरी बऱ्याचशा उपकथानकांमध्ये हा मुद्दा
येतोच. 'मेड इन हेवन',
'फोर मोअर शॉर्ट्स प्लीज', 'ट्विस्टेड',
'सॅक्रेड गेम्स', 'सिटी ऑफ ड्रीम्स' असा वेब सीरिजमध्येही समलैंगिकता हा विषय काही प्रमाणात मांडला आहे.
आपल्याला
आयुष्यात दररोज लढाई लढायची असते. पण कुटुंबासोबत होणारी लढाई ही सगळ्यांत
धोकादायक असते. समलैंगिक व्यक्तींची लढाई कुटुंबापासून सुरू होते आणि समाजापर्यंत
येऊन पोहचते. चित्रपटांमध्ये चित्रित केलेल्या कुटुंबांप्रमाणेच वास्तवातील कुटुंब
आणि समाज या मुद्द्यावर तितकेच विभागलेले आहेत. शतकानुशतके चालत आलेले कौटुंबिक
कलह आणि नव्या युगातील कायदेशीर सत्य, आजही
काहीवेळा एकमेकांसमोर येताना दिसतात. समलैंगिकांना कोणीही
समजून घेत नाही. ते वेगळे आहेत त्यामुळे ते समाजाला विकृत वाटतात. पण हळूहळू समाजातील समलैंगिक संबंधांबद्दलची
समजूत काही अंशी का होईना बदलत गेली. याचा प्रत्यय गेल्या १०-१२ वर्षांत या विषयावरील आलेल्या चित्रपटांना मिळालेल्या प्रतिसादावरून
येतो. मुळात समलैंगिक संबंधांना स्वीकारण्याआधीही गरज होती ते समजून
घेण्याची, ते नेमके का आणि काय
आहे हे जाणून घेण्याची. हेच नेमके आता घडू लागले आहे. तसेच, चित्रपटातून
अशा विषयांची मांडणी अत्यंत संवेदनशीलतेने केली आहे. प्रेक्षकांनी ही संवेदनशीलता
समजून घ्यायला सुरूवात केली आहे आणि याचीच परिणती ते स्वीकारण्यात दिसून येतेय.
सुरेश मंत्री
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा