मुख्य सामग्रीवर वगळा

लोक काय म्हणतील ?

पल्याला माहित आहे का, सर्वात मोठा रोग कोणता आहे ? हा रोग म्हणजे लोक काय म्हणतील ? प्रत्येक माणसाची दोन रुपे असतात, एक त्याचे खरे रुप ज्याला तो फक्त स्वत: जाणतो आणि दुसरे रुप जे तो लोकांसाठी जगतो. पहिले रुप हे बालवयातच उत्पन्न होते. ज्यात ना कशाची चिंता असते,ना भिती. या वयात काहीही करण्याची तयारी असते. काही तरी नविन शिकण्याची ईच्छा आणि उमेद असते. पण व्यक्ती जस-जशी मोठी होत जाते तस-तशे स्वत:च्या विचारांचे दमन व्हायला सुरुवात होते आणि हळू-हळू लोक आपले विचार थोपवायला सुरुवात करतात. काळाच्या ओघात व्यक्तीचे बालपणीचे पहिले रुप कुठेतरी लुप्त होते आणि दुसरे रुप उदयाला येते जे लोकांच्या विचारानूसार असायला हवे. मग ती प्रत्येक वेळी वागताना, बोलताना एकच विचार करायाला लागते, लोक काय म्हणतील ? कधी-कधी तर लोकांच्या काही म्हणायच्या अगोदर व्यक्ती स्वत:च लोक काय म्हणतील ? हे ठरवते. मी कोण आहे, मला काय हव, मी काय बनू ईच्छीतो हे सगळ विसरून लोकांच्या मतानूसार जगायला सुरुवात करते. आपल्यातील ९० टक्के लोकांना यामुळे कधी जीवन जगण्यातील ख‌-या आनंदाला तर कधी मोठया यशाला मुकावे लागते.
मी अशा अनेक लोकांना भेटलो आहे जे आयुष्यात काही तरी वेगळे करु ईच्छीतात पण त्यांच्या मार्गात एकमेव अडथळा असतो ते एकच वाक्य– लोक काय म्हणतील
? अरे लोक तेंव्हा ही म्हणतील जेंव्हा आपण काहीच करणार नाहीत.  जग हे दोन्ही बाजूने म्हणत असते.
पावसाळ्यातील पहिल्या पावसाच्या सरी पडायला सुरुवात झालेली असते,
आपल्याला या पावसात मनसोक्त भिजावे वाटते, रस्त्याने एखादी वरात जात असते, लोक गाण्याच्या ठेक्यावर थिरकत असतात, आपल्यालाही वाटत की त्यात सामिल होवून थोडा आनंद घ्यावा पण लोक काय म्हणतील ? हा विचार मनात आला की, सगळं तिथच थांबून जात. लोक काय म्हणतील ? याचा संबध हा लोकलज्जेशी आहे. आपल्याला उगाच वाटत असत की, लोकांच आपल्याकडे खूप लक्ष आहे, ते सतत आपल्या बाबतीत विचार करतात. खरं तर आपणच लोकांच्या बाबतीत जरा जास्तच विचार करत असतो.
जर आपण लोकांच्या मतानूसार वागत असताल तर सर्व काही ठिक असत, पण जर आपण काही जगा वेगळ करण्याचा प्रयत्न केला किंवा आपली जेवढी क्षमता आहे किंवा स्वप्न आहे त्यानूसार पाऊलं उचलली तर लोक आपल्याला वेडा म्हणायला सुरुवात करतात आणि आपण करत आहोत ते योग्य आहे की अयोग्य याचा विचार न करता भिवून थांबतो.
खरं तर आपण निवडलेला मार्ग हा आपल्याला यशाकडे घेवून जाणारा असतो. आपल आयुष्य हे लोक काय म्हणतील ? या विचाराने तसच निघून जात. मग आपल्याला जस हव तस आपण आयुष्य खरच जगतो का ?
मला एक गीत आठवते, ‘‘कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है कहना’’. लोकांच काय दोन्ही बाजूने नावे ठेवतात. जरा विचार करा की, आपण आपल्या मुलांचा खूप लाड करित असताल तर लोक म्हणतात की, एवढा नका लाड करू मुले डोक्यावर चढतील आणि जर आपण लोकांचे म्हणणे मानून जर मुलांना रागावण्यास सुरुवात केली तर हेच लोक म्हणतात की, बघा कसा बाप आहे मुलांना सारखा रागावतो,
त्यांच्यावर जराही प्रेम करत नाही.आपण जर आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत असताल तर लोक म्हणतात की, हा बायकोच्या खूप अधिन गेला आहे आणि जर तिच्याकडे लक्ष दिले नाही तर हेच लोक म्हणतात की, बघा ही मुलगी आपले घर सोडून याच्या मागे आली आहे आणि हा तिची जराही काळजी घेत नाही. आपण एखादे काम करित असताना काही लोक आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देवून प्रोत्साहन देतात तर बरेच लोक हे नकारात्मक विचार व्यक्त करणारे असतात. आपण मात्र नकारत्मक बोलणा-यांचा गंभीरतेने विचार करतो आणि आपला उत्साह न जाणो कुठे निघून जातो. ज्या व्यक्तींनी लोक काय म्हणतील ? याचा कधीच विचार केला नाही, आपल्यातील बालपण जिवंत ठेवले किंवा आपल्या मतावर ठाम राहिले त्यांनी इतिहास घडविण्याचे काम केले आहे. यासाठी आपल्याला बरीच उदाहरणे घेता येतील. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या वेळी मुलींच्या शिक्षणाचे व्रत हाती घेतले होते त्यावेळी तत्कालिन समाजाने त्यांना खूप विरोध केला होता, मात्र लोक काय म्हणतात याचा त्यांनी विचार न करता आपले कार्य तसेच पूढे चालू ठेवले. आज मात्र त्यांनी केलेल्या कार्याचे महत्व आपल्याला पटले आहे. संत गाडगे बाबांनी ज्यावेळी हाती झाडू घेवून स्वच्छतेचे काम हाती घेतले त्यावेळी लोकांनी त्यांना वेडा ठरवले असेल कदाचित. आज मात्र आपण त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान राबवतो. काही विचार हे समाजात रुजलेले नसतात त्यामुले जर कुणी वेगळी वाट धरली तर साहजिकच लोकांचा विरोध हा होतोच, लोक नावं ठेवायला लागतात. मात्र हेच लोक नंतर म्हणायला लागतात की,आम्हाला माहित होते की, हा जरूर पूढे चालून खूप नाव कमावणार.
आता महावीर सिंग फोगाट यांचेच उदाहरण घ्या.
हरियाणात ज्या वेळी मुलींची कुस्ती म्हणजे चेष्टा समजली जायची अशा काळात लोक काय म्हणतील ? याचा कसलाही विचार न करता त्यांनी आपल्या दोन्ही मुली बबिता आणि गिता यांना कुस्तीचे प्रशिक्षण देवून मैदानात उतरविले. या मुलींनी नंतर मात्र इतिहास घडवला. बबिता फोगाट हिने २०१० च्या कॉमन वेल्थ गेम मध्ये भारतासाठी कुस्तीत गोल्ड मेडल पटकावले आणि पूढेही भारताला अनेक पदके मिळवून दिली. त्यांची दुसरी मुलगी गीता फोगाट हिने ही अशीच कामगिरी भारतासाठी कुस्तीत केली आहे. याच राज्याच्या सुखबिर मलिक यांनी आपली मुलगी साक्षी मलिक हिला कुस्ती या खेळात प्रोत्साहन दिले ज्यामुळे तिने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये ५८ किलो गँम गटात भारताला कास्य पदक मिळवून देवून भारताची लाज राखली. मी अशी बरीच माणसे बघीतली आहेत जी लोक काय म्हणतील ? याचा विचार न करता आपले मत मांडतात किंवा आपले कार्य करित राहतात. दिवंगत अभिनेते ओम पुरी हे आपल्या सडेतोड मतांसाठी ओळखले जात. त्या पाठोपाठ अभिनेत्री कंगना राणावत हिचे नाव येते. इथे अंबाजोगाईत धीमंत राष्ट्रपाल नावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी घातलेल्या पांढ-या पेहराव्यावर व टोपीवर बेटी बचाव अभियानाशी संबंधित वाक्ये लिहिलेली असतात. गेली अनेक वर्षे त्यांच्या अंगावर हाच पेहराव आहे. भल्या सकाळी हा माणूस मुलगी वाचवा म्हणून मोटार सायकलीवर घोषणा देताना मी ब-याच वेळा पाहिले आहे. नवखी लोक त्यांच्या या पेहराव्याकडे विचित्र नजरेने पाहतात. ते म्हणतात की, सुरवातीला अनेक लोकांनी त्यांना ही नावे ठेवली, लोक हसायची, वेडा म्हणायची. मात्र लोक काय म्हणतील ? याची तमा न बाळगता त्यांचे हे कार्य 'लोक जागर' या संस्थेमार्फत सतत सुरू आहे. आता ते अनाथ, वंचित, उपेक्षित मुलींसाठी काम करीत आहेत. आज त्यांना नावे ठेवणारी हिच लोक त्यांचा सत्कार अनेक ठिकाणी करतात. त्यांचा अनेक पुरस्कार देवून समाजाने गौरव ही केला आहे.
लक्षात घ्या काळ बदलला की,
लोकांची मते ही बदलत असतात. लोक ही प्रत्येक परिस्थितीत बोलत असतात. आपल्याला लोक काय म्हणतील ? याचा विचार न करता आपण आपले काम करित राहिले पाहिजे, त्या मदमस्त हात्ती सारख जो भुंकणा-या कुत्र्यांकडे कधीच बघत नाही. लोक काय म्हणतील ? याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं....? मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय.. 

फिदीफिदी हसतील ते हसू देत की..बोटं मोडत बसतील ते बसू देत की ... आपण का शरमून जायचं ..? कशासाठी वरमून जायच ? कशासाठी भयाने ग्रासून जायचं..? फुलायच्या प्रत्येक क्षणाला कशाला नासून जायचं ..? आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं.. कण्हत-कण्हत की गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं.

 

                          -सुरेश मंत्री.
                     
     



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...