जन्म आणि
मृत्यू या दरम्यानच्या काळाला आपण आयुष्य असे म्हणतो. आजकाल माणसाचे जीवन किती धकाधकीचे झाले आहे. रहदारीच्या त्रासापासून कौटुंबीक अडचणींपर्यंत मानवी जीवन हे ताणतणावाने भरले आहे. प्रत्येक जण सुखाच्या शोधात धावतो आहे मात्र सुख हे शोधून
मिळत नसत. शिक्षणातील वाढत्या स्पर्धेमुळे बालपण हरवून
गेल आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात अभ्यासाचा ताण सहन
करावा लागत आहे. वर पालकाच्या अपेक्षांचे ओझे आहे. थोडे मोठे झालो नाहीत की करिअर बनवण्याचा ताण आणि नंतर
कौटुंबीक जबाबदारी. आयुष्य कधी सरत
जावून म्हातारपण आल हेच कळत नाही. आयुष्यात
काहीतरी जगायच राहून गेल असं नंतर प्रत्येकाला वाटायला लागत पण गेलेला काळ कधी परत
येत नाही.
आयुष्याची
सुरुवात होते ती बालपणापासून. आपल मुल ३
वर्षाच झाल की त्याच्या पालकांना त्याच्या भवितव्याची चिंता वाटायला लागते. आपल मुल जगाच्या वाढत्या जिवघेण्या स्पर्धेत टिकायला हवं ही
प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. यात काही गैर
ही नाही. मात्र इथे त्याच्या बालपणाचा बिलकुल विचार केला
जात नाही. फक्त त्याने आपल्या अपेक्षा पूर्ण करायला
हव्यात. त्याला नेमक काय हवयं याचा विचार ही होत नाही. या दबावाखाली मुल दबू लागत. खर म्हणजे हा आयुष्यातील सर्वात संदर काळ पण त्याला बालपण
जगता येत नाही. अभ्यासाच्या ओझ्याखाली, इतरांशी स्पर्धा करता-करता हे वय कधी सरुन गेल ते कळत नाही.
परिस्थितीशी
तोंड देत-देत शिक्षण पूर्ण झाल की प्रश्न उभा टाकतो तो करिअरचा किंवा नौकरी
मिळवण्याचा. कौटुंबीक आर्थिक परिस्थिती ठिक असेल तर पूढे
मार्ग थोडासा सोपा जातो नाहीतर बरेच धक्के खावे लागतात, संघर्ष करावा लागतो. हे सगळ करताना
तिशी कधी ओलांडली हे कळत नाही. माणसाच सरासरी
आयुष्यच आता ६० ते ७० वर्षे झाल आहे. अर्धे आयुष्य
मागे निघून गेलेले असते. तारुण्याचा
आस्वादच घेता येत नाही. स्वत:वर तो पर्यंत
कौटुंबीक जबाबदारी पडलेली असते.
कौटुंबीक
जबाबदारी पडली की आयुष्याची स्थिती आणखीनच वाईट होते. स्वत:साठी स्वत:कडेच वेळ राहत नाही. जे काही करायच ते कुटुंबासाठी. मुला-बाळांच्या भविष्याचा प्रश्न भेडसावू लागतो. शरिर ही
उत्तर देवू लागत, आरोग्याचा प्रश्न
वाढत जातो. बघता-बघता साठी कधी ओलाडली हे ही कळत नाही. मग येते ते म्हातरपण. हात-पाय चालत नाहीत. शरीरातील उर्जा
संपल्यासारखी असते.पुर्वी सारखे कार्य होत नाही. या अगोदर
कुटुंबातील सदस्यांच्या, मित्रांच्या, समाजाच्या कामी येत होतो म्हणून प्रत्येक जण आपली दखल घेत
होता. आता मात्र कोणी विचारत नाही. शरीर आणखीनच खचायला लागत. अंथरूणावर खिळून बसण्याची येते वेळ. जर्जर झालेल्या शरीरामुळ वाटतं यावा मृत्यू पण तो काही लवकर
येता-येत नाही. आलाच एकदाचा मृत्यू तर नातेवाईक अंत्यविधी
करतात, चार दिवस शोक
करतात. आठवण असावी म्हणून भिंतीवर फोटो लावतात.पूढे एक
वर्षाने येतो तो वर्षश्राध्द. फोटोवर चढलेली
धुळ झटकून हार चढवला जातो, आठवणी परत
जागवल्या जातात. नंतर हाच फोटो दूर्लक्षीत होवू लागतो. फोटोवर धूळ चढतच जाते. हळू-हळू सर्वांना विसर पडायला लागतो. हाच आहे आयुष्याचा खेळ. आयुष्य हा दोन घडीचा डाव आहे असे म्हणतात पण लागत नाही
कुठेच ताळमेळ.
आयुष्य तर
सगळेच जगतात. माणूस किती आयुष्य जगला याला महत्व नाही तो ते कशा पध्दतीने जगला
याला महत्व आहे. आयुष्यात बरच काही सुंदर आहे. निसर्गान भरभरून दिल आहे. निसर्गातील पक्षी, झाड-वेलींच्या
निरिक्षणाचा आनंदच घेता आला नाही तर काय उपयोग ? रस्त्या वरून
चालताना शेजारी एखाद पथनाट्य सुरू असते, आपल्यालाही ते
बघायचे असते पण वेळ मात्र नसतो. स्वत:साठी जगता-जगता इतरांसाठी, समाजासाठी काही
करता आल नाही तर काय उपयोग ? भूतकाळातील आठवणींना सोबत घेवून भविष्याची चिंता करत
वर्तमानात जगताच आल नाही तर काय उपयोग ? सगळ आयुष्य निघून गेल तरी आपण कशासाठी जगत होतो, आपल ध्येयच काय होत हेच जर कळत नाही तर याला आयुष्य म्हणाव
का ? भौतीक
सुख-सुविधांच्या मागे लागून खर जिवनच जगता आल नाही तर कसल हे आयुष्य ? म्हणुन मित्रांनो आत्ताच जगण शिका, आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरुन जगा. आव्हानं स्विकारा, आवडत्या
गोष्टींसाठी खर्च करा. आवडत्या
व्यक्तींना वेळ द्या, आवडतं ते शिका. पोट दुखेपर्यंत हसा मग कुणी बालिश म्हटलं तरी चालेल. मनसोक्त नाचा, लग्नात, वरातीत जिथे संधी मिळेल तिथे. अगदी लहान बाळा सारख जगा कारण मृत्यू हा जिवनातील सगळ्यात
मोठी हानी नाहीयं, सर्वात मोठी
हानी ती जेंव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमचा जिवंतपणा मेलेला असतो.
कुण्या एका कविने छान म्हटले आहे,
किती क्षणांच हे आयुष्य असतं, आज असत उद्या नसतं,
म्हणूनच ते हसत-हसत जगायचं असत, कारण इथे कोणीच कुणाच नसतं,
जाणारे दिवस जात असतात, येणारे दिवस येत असतात,
जाणा-यांना जपायच असत आणि जिवनाच गणित सोडवायच असत,
म्हणूनच कधी कुणासाठी तरी जगायच असतं,
काही म्हणत बरच काही बोलून झाल पुन्हा कधीतरी बोलु
आयुष्यावर थोड काही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा