मुख्य सामग्रीवर वगळा

मुस्लिम महिलांना दिलासा नाहीच.

३० जुलैला लोकसभेनंतर राज्यसभेतही तीन तलाक विरोधी कायदा संमत झाला.या कायदयाला मुस्लिम महिला विधेयक(विवाह अधिकार संरक्षण) २०१९ असे नाव देण्यात आले आहे.यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याने याला कायदयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.तीन तलाकच्या विरोधात मुस्लिम महिलांकडून सुरू असलेल्या संघर्षाने जनमानसाच्या मनात जागा केली.ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचल्यानंतर संसदेत यावर चर्चा होवून याचे कायदयात रूपांतर झाले आहे.या कायदयातील तरतुदींनूसार तीन तलाक म्हणणा-या पतीला तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा होईल तसेच हा गुन्हा अजामिनपात्र असेल.या कायद्यामुळे खरच मुस्लिम महिलांना संरक्षण लाभेल का?मुस्लिम महिलांचे केवळ या कायदयामुळे प्रश्न सुटतील का?
समाजातील अनेक वाईट चालीरिती आणि रूढींविरोधात यापूर्वीही अनेक कायदे होवूनही म्हणावा तसा फरक पडलेला नाही.बाल विवाह विरोधी कायदा होवूनही दरवर्षी हजारो बाल विवाह होतात.सती प्रथेच्या विरोधात बंगाल सती रेग्युलेशन १८२९ पासून सती निवारण अधिनियम १९८७ पर्यंत सुधारणा करूनही अलिकडच्या काळातही सती बनवल्या गेल्याच्या घटना कानावर येतात.कौटुंबीक हिंसाचार प्रतिबंधक कायदा होवूनही महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत.खरंतर कोणताही सामाजिक बदल तात्काळ होत नाही यासाठी व्यापक प्रक्रियेची आवश्यकता असते.तीन तलाक विरोधी कायदा तात्काळ होणे आवश्यक होते यात काही शंका नाही मात्र हा असा मुद्दा आहे ज्यावर गंभीर विचार-विनिमय आणि सामाजिक सहकार्याची आवश्यकता आहे.या कायदयात अनेक त्रुटी असल्याने या त्रुटी दूर करणे आवश्यक आहे अन्यथा संबंधित समाजाचे अहित यात होणार असेल तर हा कायदा केवळ राजकिय लाभासाठी केला असा याचा अर्थ होईल.
तीन तलाक बोलणे हे फौजदारी प्रकरण आहे तर दूसरीकडे विवाह ही एक दिवाणी बाब आहे.तीन तलाक बोलणा-या पतीला पत्नी अथवा तिच्या रक्तातील नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलीस तात्काळ जेल मध्ये टाकतील आणि गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला तीन वर्षांपर्यंत शिक्षा होईल.मात्र या कायदयात रक्तातील नातेवाईक म्हणजे नेमके कोण याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नसल्याने याचा गैरफायदा नात्यातील ईतर लोक घेवून कुटुंबाला अडचणीत टाकु शकतात.हा कायदा म्हणतो की,पत्नीला पतिकडून स्वत: आणि मुलांसाठी खर्च घेण्याचा अधिकार असेल यासाठी न्यायाधिशांना विशेष अधिकार दिले जातील मात्र जर पती जेल मध्ये जाईल तर पत्नी आणि मुलांचा खर्च कोण देईल?कशा प्रकारे दिला जाईल?हे यात स्पष्ट नाही की,पत्नी हा खर्च कशा प्रकारे घेईल?त्याची पद्धत काय असेल?हा खर्च सरकार देईल का?जर सरकार या दरम्यान पिडीत महिलेला संरक्षण देणार नसेल तर या कायदयाचे नाव संरक्षण कशासाठी?
या कायदयानुसार पतीला तात्काळ जामिन मिळणार नाही मात्र नंतर त्याला न्यायालयाकडे जामिन मागता येईल.जरी पत्नीला तडजोड करावयाची असेल किंवा मध्यस्थता करावयाची असेल तर ती न्यायालय स्तरावरच करावी लागेल.याचाच अर्थ एकदा का हा गुन्हा दाखल झाला पतीला जामिनासाठी वकिलांची दारे ठोठावी लागतील तर दूसरीकडे त्याच्या पत्नीला उपजीवीकेसाठी दारो-दार भटकावे लागेल.या कायदयानुसार तीन तलाक सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित महिलेचीच आहे.यात पुरुषांचाही समावेश केला असता तर या कायदयाला बळकटी आली असती.हिंदू धर्मातही नको त्या कारणांमुळे पुरूष आपल्या पत्नीला काडीमोड देतात मात्र त्यांना जेल मध्ये पाठवले जात नाही.अनेक हिंदू पुरूष ज्यांनी कायदयाच्या विरोधात जावून एका पेक्षा अधिक लग्न केली आहेत अथवा आपल्या पत्नीचा सांभाळ न करता बेजबाबदार वर्तन करतात त्यांना अशाच प्रकारे जेल मध्ये पाठवले जात नाहीय.अशा प्रकारचे गुन्हे आजही जामिनपात्र आहेत.
हे विधेयक खूप घाई-गडबडीत बनवले आहे असे वाटते.जो पती आपल्या पत्नीला तीन तलाक देतो तो आपल्या पत्नीला घराबाहेर तात्काळ काढतो असा अनुभव आहे.तीन तलाक दिल्यानंतर कोणत्याही महिलेला तिच्या पतीचे कुटुंबीय घराबाहेर काढु शकणार नाहीत अशी तरतुद करण्याची सुचना करण्यात आली होती,त्याचप्रमाणे जो पती आपल्या पत्नीला तलाक न देता तिची आणि मुलांची जबाबदारी उचलत नाही अशांना या विधेयकात आणण्याची सुचना करण्यात आली होती.जो पर्यंत या बाबींचा अंर्तभाव यात होत नाही तोपर्यंत मुस्लिम महिलांना या विधेयकाचा कसलाच लाभ होणार नाही उलट तिचा पती जेल मध्ये गेल्याने तिच्यावर कुटुंबाचे ओझे पडेल.
मागे हे विधेयक संमत झाल्यानंतर लोकसभेत जय श्रीरामचे नारे लागले होते.हे विधेयक केवळ राजकिय फायदयासाठी असु नये त्याच प्रमाणे मुस्लिम विरोधीही असु नये.काँग्रेसने शाहबानो प्रकरणाच्या वेळी अधिनियम १९८६ आणून चूक केली होती तर दूसरीकडे मुस्लिम महिलांचे पूर्ण ऐकुण न घेता हा कायदा आणून भाजप सरकार चूक करत आहे.शेवटी आपला उद्देश काय आहे?देशातुन तलाक-ए-बिद्दतचे समुळ उच्चाटन.यासाठी आपल्याला मुस्लिम महिलांचे हित लक्षात घेवून काही उपाय करावे लागतील.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व राज्यात विवाह नोंदणी अनिवार्य केली पाहिजे त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेसाठी तलाकची नोंदणी सुद्धा अनिवार्य करावी.या नोंदणीला सर्व सरकारी योजनांशी जोडल जाव.अस न करणा-याला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येवु नये.विदेशात जाण्याचीही परवानगी मिळु नये.तलाक-ए-बिद्दत ने तलाक घेता येणार नाही अशी सोय निकाहनाम्यात करावी.तलाक-ए-बिद्दतचा कौटुंबीक हिंसाचार अधिनियम २००५ मध्ये समावेश करावा.याचे अधिकार न्यायाधिशांना द्यावेत.जर पतीने न्यायाधिशांच्या आदेशाचे पालन केले नाही तर त्याच्या विरोधात कारवाईची तरतुद असावी.मुस्लिम विवाह अधिनियम १९३९ मध्ये तलाक-ए-बिद्दतचा समावेश करावा.भारतीय दंड संहिता कलम ४९८ मध्ये तलाक सारख्या क्रुरतेचा समावेश करावा.तलाक रोखण्यासाठी मध्यस्थी केंद्र उभा करावेत.
या कायदयामुळे जर तलाक-ए-बिद्दत देणा-या पतीला तीन वर्षांची शिक्षा होणार असेल पण मुस्लिम महिलेला दिलासा मिळणार नसेल तर हा कायदा मोठया सामाजिक बदलाचे संकेत देत नाही.सत्ताधारी पक्षाने समजदारीने काम घ्यायला हवे होते.आलेल्या सर्व सुचनांचा विचार करून सरकारने जर चांगला कायदा आणला असता तर मुस्लिम महिलांना न्याय मिळाला असता आणि या कायदयाला विरोध करणारे विरोधक आणि मौलविंचे तोंड बंद झाले असते.मात्र असे झाले नाही,या कायदयामुळे मुस्लिम महिलांना पुर्ण दिलासा मिळालेला नाही.
-सुरेश मंत्री    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...