मुख्य सामग्रीवर वगळा

'सर्जा-राजा'च्या सणावर दुष्काळाचे सावट

 श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते.अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात.पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते.संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं.अशा या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी,नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन,गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा'.यावर्षी मात्र महाराष्ट्रात सरासरीच्या ४० टक्केच पाऊस झाल्याने मराठवाडा,खानदेश आणि विदर्भात भयानक दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे या भागात आज हा सण केवळ औपचारिकता म्हणून साजरा होण्याची चिन्हे आहेत तर कोल्हापूर, सांगली जिल्हयात आलेल्या महापुरात अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत.या शेतक-यांच्या डोळ्यात आज आपल्या जिवापाड जपलेल्या बैलजोडीची आठवण येवून अश्रु आल्याशिवाय राहणार नाहीत.
            पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते.पोळ्याला त्यांना नदी,ओढय़ात नेऊन धुण्यात येते.नंतर चारून घरी आणण्यात येते.या दिवशी बैलाच्या खोंडाला हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकले जाते.यास खांदेमळणी असे म्हणतात.या सणासाठी शेतक-यांमध्ये उत्साह असतो.आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात.बैलांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल,सर्वांगावर गेरूचे ठिपके,शिंगांना बेगड,डोक्याला बाशिंग,मटाट्या,गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा,नवी वेसण, नवा कासरा,पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे असा सजवितात.खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य बनवला जातो.
 शेतकरी आपल्या बैलांसह बैलपोळ्यात भाग घेतात.गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात.त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या,वाजंत्री,सनया,ढोल,ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे.त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील,श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'.नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात.मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते.बैल नेणा-यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.शेतक-याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात.तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते.दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत जातात व त्याला 'अतिथी देवो भव:'प्रमाणे घरी आणतात.घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात.
पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे.शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो.शेतक-याचा सखा,मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो.या दिवशी बैलांचा थाट असतो.या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो.तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही.पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते.असा हा पोळ्याचा सण आहे.पोळ्यास 'बैलपोळा' असे देखील म्हणतात.बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात.शेतीप्रधान या देशात शेतक-यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पीकधान्य झुलत असते.सगळीकडे हिरवळ असते.श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
 त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात.या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतक-याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते.महाराष्ट्रातील काही गावांमध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो.ज्या शेतक-याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतक-याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते.अशा पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतक-याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.
 याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात.दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात.चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात.घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात.पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत 'अतित कोण?'  असा प्रश्न विचारतात.आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात.स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.
'पोळा आणि पाऊस झाला भोळा' असे म्हटले जाते.यावर्षी तर मराठवाडय़ात सुरवातीपासूनच पावसाने दडी मारली आहे.सारी नक्षत्रे कोरडी गेली.श्रावण महिन्यातही पाऊस झाला नाही.पाऊस नसल्याने उगवलेल्या पिकांनी माना टाकल्या आहेत.चार महिन्यांचा पावसाळी हंगाम गृहीत धरल्यानंतर अडीच महिन्यात किमान ६० टक्के पाऊस होणे अपेक्षित होते पण अस्मानी संकटाने कायम फेर धरला.याचा परिणाम दैनंदिन आर्थिक व्यवहारावर झाला.बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल मंदावली.सर्जा-राजाच्या साज विक्रीची दुकाने थाटली गेली पण दुष्काळाच्या सावटामुळे शेतकरी या दुकानांकडे फिरकलाच नाही.मुर्की,मटाटे,गोपकंडे,गजरा, महाराजा,बाहुबली,चंगाळे,जाडे वेसन,कवडीमाळ,रंगीबेरंगी उलन,बाशिंग,झुली,कंबरपट्टे,बेगड,वार्निश यांनी वाट पाहिली.पोळ्याच्या आदल्या दिवशी बळीराजा सर्जा-राजाची खांदेमळणी काढत पवनी घालतो परंतु यंदा पवनी घालायला शेतात पाणीच नव्हते.यंदा घागरीने पाणी नेवून पाणी घालायची वेळ आली.पशुधनाला पोळयानिमित्त काहीच करता येवू नये ही बळीराजाच्या मनातील खदखद शब्दाने व्यक्त करता येणार नाही.जीएसटीने अगोदरच व्यापा-यांचे कंबरडे मोडले आहे.बैल सजावटीच्या साहित्यात सुमारे १५ टक्के भाववाढ झाली. लाखो रूपयांची गुंतवणूक करून व्यवसाय थाटणा-या व्यापा-यांवर आता उठायची वेळ आली आहे.एकूणच आज साजरा होणा-या बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे.बहिणाबाई आपल्या कवितेत म्हणतात,
आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा, हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा, आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार ...
-सुरेश मंत्री.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...