मुख्य सामग्रीवर वगळा

कुस्तीत रवीकुमारने घडवला इतिहास

भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने गुरूवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक आहे. याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य, बॉक्सिंगमध्ये लव्हलिना बोरगोहेन हिने कांस्य पदक जिंकून दिले होते. तर याच दिवशी  सकाळी भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते.

कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने भारताच्या रवीकुमारचा पराभव केला. पहिल्या फेरीनंतर रवीकुमार ४-२ असा पिछाडीवर होता. झावूरने प्रत्येकी एक असे दोन गुण मिळवले. त्यानंतर रवीकुमारने दोन गुण मिळून बरोबरी केली. तर झावूरने पुन्हा दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर झावूरने आणखी ३ गुण मिळवत ७-२ अशी आघाडी केली. अखेर झावूरने रवी कुमारवर ७-४ असा विजय मिळवला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणाऱ्या रविकुमार दहियावर सध्या देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. रौप्य पदक विजेत्या या आपल्या खेळाडूसाठी हरियाणा सरकारने राज्याच्या तिजोरीचे दरवाजे उघडले आहेत. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या लाडक्या कुस्तीपटूला मोठं बक्षीस जाहीर केलं आहे. ऐतिहासिक रौप्यपदक जिंकलेल्या या कुस्तीपटूला हरियाणा सरकारने ४ कोटी रुपये आणि क्लासवन ऑफिसर पदाची नोकरी देण्यात येणार असल्याचे जाहीर केलं आहे. एवढंच करून थांबेल ते हरयाणा सरकार कसले? इतर राज्यांच्या पुढे जात हरियाणा सरकारने रवीकुमारला त्याचा पसंतीचा प्लॉट खरेदी करताना ५० टक्के सवलत देण्यात येईल, असेही स्पष्ट केलं आहे. रवीकुमारच्या गावात कुस्तीचे एक इनडोअर स्टेडियम उभारण्याविषयीही खट्टर यांनी त्यांचे मत मांडले. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे एक कुस्तीचे इनडोअर स्टेडियम रवीच्या गावी नहरी येथे उभारण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री खट्टर यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री खट्टर पुढे म्हणाले की, रवीने त्याचा अंतिम सामना अतिशय धैर्याने खेळला. त्याबद्दल मी त्याचे खूप कौतुक करतो, तसेच त्याला शुभेच्छाही देतो. देशाचा आघाडीचा पैलवान खेळाडू रवी दहिया ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकापासून वंचित राहिला असेल, पण कुस्तीमध्ये रौप्यपदक मिळवणारा तो भारताचा दुसरा कुस्तीपटू ठरला आहे. कठोर परिश्रम, अनेक वर्षांचा संघर्ष आणि त्यागामुळे त्याला क्रीडा क्षेत्रातील या महान कुंभात 'रौप्य' मिळाले. भारतातील कुस्तीचा नवा पोस्टर बॉय बनलेल्या रवीकुमारसाठी हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. विजय आणि पराभव या दोन्ही गोष्टींवेळी प्रत्येकजण एकसमान राहील असं नाही. पण ही रवीकुमारची खासियत आहे. उपांत्यफेरी जिंकल्यानंतर ना त्याने आनंदाने उडी मारली, ना पराभवानंतर त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसल्या, पण त्याची आई नक्कीच भावनिक झाली. एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना रवीची आई म्हणाली की, एक महिनाभरापासून रवीशी बोलणं झालं नाही. त्याचा आवाज ऐकला नाही. जेव्हा ती हे सांगत होती, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील वेदना आणि आईचं मुलाविषयी असणारं प्रेम दिसून येत होतं. शेवटी भावना अनावर झाल्याने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

रवीकुमार दहियाच्या वडिलांनी आपल्या अडचणी मुलाच्या प्रशिक्षणाच्या मार्गात कधीही येऊ दिल्या नाही. ते स्वत: दररोज छत्रसाल स्टेडियमवर दूध आणि लोणी घेऊन येत. यासाठी त्यांना रोज १२० किलोमीटरचा प्रवास करावा लागत असे. ते रोज पहाटे ३.३० वाजता उठायचे, पाच किलोमीटर चालत जाऊन जवळच्या रेल्वे स्थानकावर जायचे. तेथून रेल्वेने आझादपूर आणि नंतर दोन किलोमीटर चालत छत्रसाल स्टेडियमवर. पुन्हा घरी पोहोचल्यानंतर शेतात काम करत आणि हा प्रकार १२ वर्षे चालू राहिला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे यात अडथळा आला. पण मुलाच्या अविश्वसनीय कामगिरीमुळे ते आपले दुःख नक्कीच विसरतील.

फक्त २३ वर्षांचा रवी स्वभावाने शांत आणि लाजाळू आहे. त्याचे वडील राकेशकुमार यांनी त्याला वयाच्या १२ व्या वर्षी छत्रसाल स्टेडियममध्ये पाठवले, तेव्हापासून तो महाबली सतपाल आणि प्रशिक्षक वीरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. दिल्लीच्या याच छत्रसाल स्टेडियममधून आलेल्या सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी भारताला दोन ऑलिम्पिक पदके जिंकून दिली आहेत.

रवी मूळचा हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहारी गावचा आहे. १५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात ना पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था आहे, ना सांडपाण्याची. वीज येत-जात राहते. गावात फक्त एक जनावरांचा दवाखाना आहे. हे तेच गाव आहे, ज्या गावाने देशाला महावीर सिंग (१९८० मॉस्को ऑलिम्पिक आणि १९८४  लॉस एंजेलिस ऑलिम्पिक) आणि अमित दहिया (२०१२ लंडन ऑलिम्पिक) यांसारखे दोन ऑलिम्पियन दिले. देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल रवीकुमार दहियाचे अभिनंदन !

-सुरेश मंत्री


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...