कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सध्या जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेला ओमायक्रॉन व्हेरिएंट सध्या १९ हून अधिक देशांत पसरला आहे. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा हा व्हेरिएंट घातक आणि अधिक वेगाने पसरत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना सतर्क केले आहे. त्यामुळेच बहुतांश देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेवर निर्बंध आणले आहेत. भारत सरकारनेही येत्या १५ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेचा निर्णय स्थगित केला आहे. २६ नोव्हेंबरला नागरी उड्डाण मंत्रालयाने १५ डिसेंबरपासून भारतात येणाऱ्या आणि जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेवरील बंदी हटवली होती. परंतु कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे सरकारने हा निर्णय तुर्तास स्थगित केला आहे. नवीन तारखेची घोषणा पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन केली जाईल असं सांगण्यात आले आहे. काही देशांनी आफ्रिकेवरुन येणारी उड्डाणं रोखली तरीही यूरोप आणि अमेरिकेत हा व्हेरिएंट आढळला आहे. त्यामुळे भारतातही ओमायक्रॉनचा व्हेरिएंट आढळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लसीकरण हा सर्वात्तम पर्याय आहे. भारतातील ७० टक्के जनतेला लसीचे दोन डोस अद्यापही मिळाले नाहीत. सरकार लसीचा बुस्टर डोस आणि वर्षाला एक डोस आणण्याचा विचार करत आहे. कदाचित एका व्यक्तीला वेगवेगळे लसीचे डोस देणं प्रभावशाली ठरण्याची शक्यता आहे. भविष्यात कोरोना व्हायरसचे किती घातक व्हेरिएंट येतील त्याचा अंदाज बांधता येणार नाही. कुठलीही लस व्हायरसविरोधात १०० टक्के सुरक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे जर व्हेरिएंट येत राहिले तर वारंवार लॉकडाऊन लावलं जाईल का ? त्यामुळे आता जगातील अनेक देशांनी कोविडसोबत जगायला हवं.
ओमायक्रॉनच्या दहशतीमुळे काही देशांनी लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतातही पुन्हा लॉकडाऊन लागेल का? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. भारतात कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये आली होती. तेव्हा कडक लॉकडाऊन लागू केला होता. आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन रोखण्यासाठी पुन्हा भारतात लॉकडाऊनची घोषणा केली जाईल का ? भारतात पुन्हा लॉकडाऊन लागल्यास तो निर्णय चुकीचा ठरेल. जर देशात पुन्हा लॉकडाऊन लागल्यास देशात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते असं म्हटलं जात आहे. कोरोना व्हायरस खूप घातक आहे. जगातील लाखो लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. परंतु अनेक ठिकाणी आजारामुळे नव्हे तर आरोग्य सुविधेतील कमरतेमुळे लोकांचे जीव गेले. सर्वात जास्त मृत्यू ७० वर्षापेक्षा अधिक वयातील लोकांचा झाला. कोरोना व्हायरस वृद्ध आणि रोगाने पीडित लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
१६ वर्षापेक्षा कमी कोविड रुग्णांचा अल्प मृत्यू दर आहे. तरीही शाळा बंद ठेवण्यात आल्या. ५०० दिवसांहून अधिक काळ हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. विविध अभ्यासानुसार भारतात २० कोटी लोक लॉकडाऊनमुळे गरिबीच्या जाळ्यात अडकले. आंतरराष्ट्रीय उड्डाणावर बंदी आणल्याने पर्यटन व्यवसायाचं नुकसान झालं. कोरोनामुळे मृत्यू सोबतच बेरोजगारी, छोटे छोटे व्यवसाय बंद पडले. सन २०२० मधील कोरोना संकट काळात कृषी क्षेत्रापेक्षाही उद्योग क्षेत्राला जास्त फटका बसल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. कोरोना संकट आणि लॉकडाउन यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. सन २०२० मध्ये एकूण ११ हजार ७१६ उद्योजकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारडून संसदेत देण्यात आली. २०१९ च्या तुलनेत म्हणजेच कोरोना संकट येण्यापूर्वीच्या कालावधीची तुलना केल्यास ही आकडेवारी २९ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे. शिक्षण क्षेत्राचं नुकसान झालं. जीडीपीत ऐतिहासिक घसरण झाल्याचं पाहायला मिळाली. ओमायक्रॉनचा धोका वाढला तर गरज भासल्यास संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्याऐवजी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर लॉकडाऊन केला जाऊ शकतो. लॉकडाऊन काळात शाळा उघडल्या जातील आणि जास्तीत जास्त आर्थिक चक्र सुरु राहणारे व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न असेल.
दक्षिण आफ्रिकेतील या विषाणूच्या म्युटेशनमुळे लोक प्रभावित होत आहेत, परंतु ते डेल्टाने जितके गंभीर झाले तितके होत नाहीत. आधीच्या व्हेरियंटमध्ये कमी म्युटेशन होते. ज्या डेल्टा व्हेरिएंटने जगाला धडकी भरवली, त्यात २ म्युटेशन झाले होते, तर आताच्या ओमिक्रॉनमध्ये तब्बल ५० म्युटेशन झाले आहेत, ज्यातील ३० हुन अधिक म्युटेशन हे फक्त स्पाईक प्रोटीनमध्ये आहे. स्पाईक प्रोटीन विषाणूचा तोच भाग असतो, जो शरीरात प्रवेश केल्यानंतर मानवी कोषिकांना चिटकण्याचं काम करतो. विशेष म्हणजे, या स्पाईक प्रोटीनच्या मानवी कोषिकांना संपर्क करण्याच्या भागातही तब्बल १० म्युटेशन झाले आहेत, म्हणजे आधीच्या कोरोना विषाणूहून हा शरीराला पूर्णपणे वेगळा वाटू शकतो. याची परसण्याची क्षमता जास्त आहे. रोगप्रतिकारशक्ती आणि मोनोक्लोनल अँटीबॅाडीजला चकवा देण्याची क्षमता यामध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालये आणि दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय संस्थांचे अहवाल आणि रुग्णांच्या संसर्गाची स्थिती पाहता असे म्हणता येईल की यामुळे लोकांना संसर्ग होत आहे परंतु मृत्यू दर कमी असून रुग्णालयात दाखल होण्याचेही प्रमाण कमी आहे. सद्यस्थितीत भारतात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. लोकांनी विनाकारण घाबरण्याची गरज नाही. कारण आतापर्यंतच्या अहवालात हा विषाणू फार धोकादायक असल्याचे अजिबात सांगण्यात आलेले नाही. वैद्यकशास्त्र अशा कोणत्याही विषाणूचा संपूर्ण अभ्यास करते आणि त्यानंतर त्याच्या तीव्रतेचे प्रमाण ठरवून देश आणि जगाला सावध करते. सुरुवातीच्या टप्प्यात असे दिसून आले की नवीन प्रकारातील बदल खूप वेगाने होत आहेत, त्यामुळे खूप सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. विषाणूपासून बचाव करण्यासाठी लोकांनी कोविड अनुरुप वागले पाहिजे. जेंव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा मास्क लावा. याशिवाय, वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुत राहा. लोक कोविडपासून प्रतिबंधात्मक वागणूक घेत नसल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती अजिबात चांगली नाही. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. सामाजिक आणि शारीरिक अंतर काटेकोरपणे पाळावे.
- सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा