बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच निसर्ग नियमानुसार २०२१ ला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे. भारत शकांचा, मन्वन्तरांचा, तसेच इसवींचाही सन मोठय़ा उत्साहाने साजरा करतो. प्रारंभ म्हणजे सुरुवात! मागील चांगल्या-वाईट गोष्टींना मागे सारून नवीन होणा-या सूर्योदयासोबत नवसंकल्पांचे अवलंब करणे, आपल्यासाठी नक्की काय चांगले हे पडताळणे, सत्याची कास धरणे, हे माझ्याकडून सुटणारच नाही ह्यापेक्षा खरंच याने माझी किती हानी होते ह्याचा विचार करायला हवा. आपण नवीन वर्षात नव्या उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत. नवे वर्ष आले म्हटल्यावर त्याचे स्वागत आणि त्यानिमित्ताने संकल्प करणे देखील ओघाने आलेच. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वांनी काहीना काही तरी प्लॅन्स केले असतील, आणि त्याच्या बरोबरीने नवीन वर्षामध्ये काय करायचे याचा संकल्पही केला असेल.. तसे पाहता प्रत्येकाचा नववर्षाचे स्वागत करण्याचा दृष्टीकोन वेग-वेगळा असतो..पद्धती वेगळ्या असतात..हा ज्याच्या त्याच्या संतोषाचा आणि समाधानाचा भाग आहे. नववर्षाचे स्वागत देवापुढे निरंजनी लावून परिवारासमवेत करायचे कि..मद्यालयात बेधुंद होवून करायचे. याविषयी उपदेशाचे डोस पाजण्याइतपत समाज अज्ञानी नाही. परंतु नववर्षाचे स्वागत सामाजिक जान-भान जपून उत्साहपूर्ण वातावरणात केले गेले पाहिजे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याच्या नादात आपण आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य विसरून आपल्या जीवनरचनेत न शोभणारे कृत्य तर करत नाही ना? याचा जरा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
२०२१ ला निरोप देताना सर्वांच्याच मनात संमिश्र भाव-भावना असतील! सरत्या वर्षात घडलेल्या चांगल्या-वाईट गोष्टींच्या आठवणीने मन कातर होत असेल. तर नवीन आशा घेवून येणाऱ्या नववर्षाबद्दल कमालीचे कुतूहल आणि तितकीच अनामिक भीती सुद्धा वाटते. पण 'जुने जावू द्या मरणालागुनी जाळून किंवा पुरून टाका' या कवितेच्या ओळीप्रमाणे सर्व भावना दूर करून नव्या उत्साहाने नववर्षाचे स्वागत करायला हवे. सामाजिक बांधीलकीचे ऋण सेवेतून व्यक्त करण्याचा तसेच अपप्रवृत्तींना आळा घालण्याची व विधायक कामाला बळ देण्याची जबाबदारी तुमची-आमची आणि सर्वांचीच आहे. याची जान व भान ठेवण्याचा संकल्प आपण सर्वांनी या नववर्षाच्या निमिताने करायला हवा. आताच्या या प्रगतीशील, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणूस खूप प्रगत झाला... पण तो या प्रगतीच्या नादात एखाद्या मशीनप्रमाणे वागु लागला आहे. आजुबाजुच्या परिस्थितीचा कसलाही विचार न करता क्षणिक सुखाच्या मागे धावत आहे. संवेदना, माणुसकी हे शब्द त्याच्या शब्दकोशातून हरवू पाहत आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षी माणूस म्हणून जगण्याचा आणि माणुसकीच्या नात्याने आपापल्या कुवतीनुसार गरजवंतांना मदत करण्याचा संकल्पही आपल्याला करता येईल. छोटे - छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठे फायदा करुन देणारे ठरत असतात. संकल्प करायचा तर काय करायचा याचा विचार करताना मनात आले, की आपण आपले आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन किमानपक्षी नीट केले पाहिजे. स्वतःसाठी म्हणून काही वेळ, उसंत काढण्यासाठी दिवसाच्या चोवीस तासांचे काही गणित मांडले पाहिजे आणि ते अमलातही आणले पाहिजे. एवढे करू शकलो, तर वर्षारंभाच्या पहिल्या दिवसासारखाच आनंद देऊ शकणारे अनेक दिवस वर्षभरात आपल्याला भेटत राहतील ! प्रत्येक युगाचा, शतकाचा, वर्षाचा दिवस आपल्याला हेच तर सांगत असतो, की अरे बाबा, मागचं वाईट सगळं विसर, उपवास, दानधर्म, प्रार्थना याहून अधिक चांगले कृत्य म्हणजे तू सतत क्षमाशील राहा आणि एकमेकांशी सख्य करून आपसातील कलह संपवून टाक आणि नवीन वर्षात सत्याची, श्रमाची, तेजाची कास धर. तू जसा नववर्षाच्या स्वागत प्रसंगी प्रसन्न राहशील तसा वर्षभर निरभ्र अंत:करणाने झळाळत राहा..!
नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्सवावर यंदाही कोरोना महामारीचे सावट आहेच. देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसात झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र तिस-या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचे तज्ञांचे मत आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच याहीवर्षी आपल्याला नवीन वर्ष घरीच साजरे करावे लागणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर निर्बंध लागु करण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये, मिरवणुका काढु नयेत असे शासनाचे आदेश आहेत. आपण सर्वजण या महामारीचा यशस्वी सामना करीत असलो तरीही नवीन वर्षाचे स्वागत करताना सर्वांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उत्सव साजरा करताना प्रशासनाने घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून साध्या पद्धतीने साजरा करावा. या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आपल्या जवळच्या माणसांसोबत अनेकांनी खास प्लॅनही आखले आहेत. मात्र, कोरोना संकटाच्या काळात सर्वांनाच भेटून नववर्षाच्या शुभेच्छा देणं शक्य होत नाहीये. सोशल मीडिया आणि टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शहराबाहेर असलेल्या नातेवाईकांना नववर्षाच्या शुभेच्छा पाठवू शकता. काळ बदलून काही होत नाही तर विचार बदलले तेंव्हाच समाज बदलत असतो त्यामुळे या वर्षात आपल्या आचारात आणि विचारात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प करून या नवीन वर्षाला सामोरे जावू या! आपण सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा!
-सुरेश मंत्री.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा