लोक आता प्रस्थापित माध्यमांकडून ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. टीव्ही किंवा इतर कुठलाही प्लॅटफॉर्म पूर्णपणे संपणार नाही. पण टीव्ही चॅनेल्स असो की वृत्तवाहिन्या यांच्यासमोरचं आज सर्वांत मोठं आव्हान म्हणजे लोकांच्या सवयींमध्ये होत असलेला बदल. २५ वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती, की लोक आदल्या दिवशी घडलेल्या गोष्टी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचायचे. त्यानंतर एक काळ असा होता, की दिवसभरात घडलेल्या गोष्टी संध्याकाळी टीव्हीवर बघितल्या जायच्या. नंतर घटना घडली, की लगेच दिसायला लागली. आता टीव्ही किंवा वर्तमानपत्राची बातमी ब्रेक करण्याची क्षमता कमी होत चाललीये. आज बातम्या सोशल मीडियावर ब्रेक होत आहेत. टीव्हीवर ते अधिक वेगानं लोकांसमोर पोहोचताना दिसतं एवढंच. आता पत्रकारितेतलं भविष्य हे डिजिटल आणि व्हीडिओ आहे. मोबाईल, टीव्ही हे आता माहितीचं प्रमुख माध्यम असेल आणि व्हीडिओ हा त्याचा महत्वाचा भाग असणार आहे. लोकांना आता वाचण्यापेक्षा पाहणं हे जास्त सोपं आणि इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळेच व्हीडिओ हे येत्या काळात महत्वपूर्ण ठरतील. त्याचप्रमाणे प्रादेशिक भाषांमधील कन्टेन्ट हा अधिक वाचला जाईल. वेबपोर्टल्सची संख्या वाढते आहे परंतु वर्तमानपत्र किंवा चॅनेलप्रमाणे त्यांचं रेव्हेन्यू मॉडेल तयार होऊ शकलेलं नाही.
सध्या वर्तमानपत्रांसमोर अनेक अडचणी आहेत. न्यूज प्रिंट महाग झाली आहे. जीएसटी आहे. इतरही नवनवीन नियम आहेत. या सगळ्याचा वर्तमानपत्रावर आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे वर्तमानपत्रं चालवायची कशी, हे सध्या सगळ्यांत मोठं आव्हान आहे. वर्तमानपत्रांसमोर दुसरी अडचण निर्माण झालीये, ती म्हणजे अनेकदा आल्याला सरकारी निर्बंधांचा फटका बसू नये म्हणून मालकही सरकारला न दुखावण्याची सावध भूमिका घेतात. खरं तर प्रस्थापितां विरोधात जाणं हेच पत्रकारांचं काम आहे. पण आता त्यापद्धतीचं स्वातंत्र्य पत्रकारितेत राहिलेलं नाही. आर्थिक कारणांमुळे जास्तीत जास्त महसूल मिळवणं हे आता वर्तमानपत्रांचं उद्दिष्ट झालं आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रबोधनाचं साधन ते मार्केटिंगचं माध्यम असं वर्तमानपत्रांचं स्वरुप झालं आहे. सुरुवातीला प्रिंट माध्यमांसमोर इलेक्ट्रॉनिक मीडियाचं आव्हान होतं. पण इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आगमनानंतर वर्तमानपत्रांनी स्वतःला बदललं. पण आता डिजिटल मीडिया, सोशल मीडिया वेगानं वाढत आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे छापून वर्तमानपत्रं विकणं कठीण झालं आहे. त्यामुळे सध्याच्या काळात प्रिंट मीडियाचं भविष्य हे फारसं आशादायक नाही.
गेल्या काही वर्षात जागतिक तसंच राष्ट्रीय पत्रकारितेमध्ये जे आर्थिक-धोरणात्मक बदल होत आहेत, त्याचा परिणाम म्हणजे पत्रकारिता ही काही ठराविक लोकांच्या हितसंबंधांपुरतीच मर्यादित झाली आहे. मराठी पत्रकारिताही याला अपवाद नाहीये. आजचं मराठी पत्रकारितेचं स्वरूप हे केवळ माहितीचं संकलन एवढ्या पुरतंच मर्यादित राहिलं आहे. घडलेल्या घटनांचा अन्वयार्थ लावण्यात मराठी पत्रकारिता कमी पडत आहे. पत्रकारांवर विविध प्रकारचा दबाव आहे. अब्रूनुकसानीचा दावा ठोकून पत्रकारांना त्रास देण्याचा प्रकार केला जातो. राजकीय पक्षांच्या विरोधात केलेल्या बातम्यांची नोंद घेतली जाते. तुम्ही आमच्या पक्षाविरोधात बातमी दिलीत तर तुमच्या पेपरला दिल्या जाणाऱ्या जाहिराती कमी करून टाकू अशा पद्धतीने आर्थिक नाड्या आवळल्या जातात. पत्रकारांना मिळणारा पगार, सुटट्या, कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या सोयीसुविधा हे नीट असेल तर ७० टक्के पत्रकार चांगलं काम करतील. परंतु दुर्देवाने तसं होत नाही. पत्रकारांना घर चालवायचं असतं. तेही अवघड होऊन जातं. यातूनच पत्रकार आणि राजकीय नेत्यांचं साटंलोटं होतं. त्यांच्यांविरुद्ध बातम्या दिल्याच जात नाहीत. सध्या पत्रकारांमध्ये वैचारिक आणि राजकीय पातळीवर विविध गट पहायला मिळतात. पत्रकारिता हा तसा वैचारिक प्रांत असल्याने ते स्वाभाविकच आहे. पण आता त्याला पक्षीय अभिनिवेशही जडला आहे. देशाची लोकशाही आणि सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता याबाबतीतली पत्रकारांची भक्तिमय मतं हा सर्वांत मोठा धोका मला येत्या काळात दिसतोय. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मतप्रदर्शन. बातमीतली वस्तुनिष्ठता हरवली आहे. डेटा जर्नालिझम आणि शोधपत्रकारिता ही मराठी पत्रकारितेत अभावानेच दिसतेय. येत्या काळात पत्रकारांमध्ये हे स्कील तयार करण्याची गरज आहे.
आपला चेहरा रोज टीव्हीवर दिसत असला तरी आपण दीपिका पदुकोण नाही. आपण वारीत नाचत वगैरे असलो तरी माधुरी दीक्षित नाही हे पत्रकारांनी लक्षात घ्यायला हवं. पत्रकारिता एंटरटेनमेंटला रिप्लेस करू पाहत आहे. रिपोर्टिंग म्हणजे ज्युनियर्सनी करायची गोष्ट असाही दृष्टिकोन आहे. लोकांमध्ये जाऊन, त्यांच्याशी बोलूनच बातम्या व्हायला हव्यात. ते कमी होत चाललं आहे. आर्मचेअर जर्नलिझम रूढ होतं आहे. पत्रकारितेत फिल्डवर जाऊन काम करणं अपेक्षित आहे. परंतु पत्रकारांना फिल्डवर पाठवण्यासाठी माध्यम संस्था उत्सुक नाहीत. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या, तिथलं जग पोहोचतच नाही. सध्याच्या काळात प्रिंट-टीव्ही-डिजिटल हे भेद तितके काटेकोर राहिले नाहीत. आता वेगवेगळे माध्यमसमूह हे या तिन्ही माध्यमांचा समतोल साधताना दिसत आहेत. त्यामुळे मी प्रिंटसाठी काम करतो, मी टीव्ही किंवा डिजिटलसाठी काम करतो, असं म्हणण्यापेक्षा आता पत्रकारांनी या सगळ्या माध्यमांसाठी विशेषतः डिजिटलसाठी कन्टेन्ट बनवायला शिकणं हे अधिक महत्वाचं आहे. आता अभिव्यक्तीसाठी दर दीड-दोन वर्षांनी फेसबुक, ट्वीटर, टिकटॉक सारखी वेगळी माध्यमं येत आहेत. पूर्वी वर्तमानपत्रामध्ये मजकूर तयार करणारा संपादकीय विभाग आणि तो वाचकांपर्यंत पोहोचवणारा वितरण विभाग असे ठळक स्वतंत्र विभाग असायचे. डिजिटल माध्यमांच्या काळात कन्टेन्ट तयार करणं आणि तो वाचकांपर्यंत पोहोचवणं ही आता एकाच व्यक्तीची जबाबदारी आहे. कोणता कन्टेन्ट कधी तयार करायचा, तो कोणत्या वाचकापर्यंत पोहोचवायचा ही एकाच व्यक्तीची जबाबदारी असते. हेच आता मराठी पत्रकारितेसमोरचं आव्हानही आहे आणि भविष्यही आहे.
बातमी देण्याची स्पर्धा आता गाव-खेड्यापर्यंत पोहोचली आहे. अनेक स्थानिक चॅनेल्स सुरू झाले आहेत. गाव-खेड्यात युट्यूब चॅनेल्सही सुरू झाले आहेत. त्यामुळे या २४ बाय ७ च्या स्पर्धेत टिकण्याची गरज स्थानिक पातळीवरही निर्माण झाली आहे. या सगळ्यामध्ये पत्रकारांना अभ्यासासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे बदलत्या माध्यमांच्या स्पर्धेत स्वतःला तयार कसं करणार हे आजच्या पत्रकारांसमोरचं प्रमुख आव्हान आहे. स्थानिक पातळीवर काम करताना पत्रकारांना राजकीय किंवा अन्य दबावांना सामोरं जावं लागतं त्यामुळे अनेकदा पत्रकार स्वतःच स्वतःवर कोणाच्या विरुद्ध लिहायचं किंवा कोणाच्या विरुद्ध लिहायचं नाही, अशी बंधन लादून घेतात. पण मला वाटतं, की बातमीदारी वेगळी आणि व्यवसाय वेगळा हे पत्रकारांनी समजून घ्यायला हवं. एखाद्या नेत्याची जाहिरात घेतली म्हणजे त्याच्याविरोधात लिहिताच येत नाही असं नाही. व्यवस्थापनही तसा आग्रह धरत नाही. प्रिंट, रेडिओ, टीव्ही, डिजिटल, पॉडकास्ट अशी अनेक माध्यमं आली, येत राहतील. पण बदलणार नाही तो कन्टेन्ट. कन्टेन्टचा फॉर्म बदलत राहणार आहे. मराठी पत्रकारितेनं नवीन प्रवाह आत्मसात करायला हवेत. नवनवीन माहिती, तिचा वेग आणि दृष्टिकोन आत्मसात करायला हवा. भूमिका घ्यायला हव्यात. सध्या मराठी पत्रकार भूमिका घेण्यात मागे आहेत. जर भूमिका घेतल्या आणि त्या भूमिकांसाठी जी किंमत मोजावी लागते ती मोजायची तयारी ठेवली तरच भविष्यात पत्रकारिता टिकू शकेल. नाहीतर पत्रकारितेचं स्वरूप माहिती-मनोरंजन या पलीकडे जाणार नाही.
- सुरेश मंत्री.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा