मुख्य सामग्रीवर वगळा

वेदना घुंगरांच्या...



 ध्या देश कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करीत असुन कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गर्दीच्या ठिकाणी जमू नये,गर्दी टाळा अशा शासनाच्या सुचना असल्याने अनेक ठिकाणच्या यात्रा रद्द होत आहेत. ज्या गावात तमाशाचे कार्यक्रम होते त्या गावातील यात्रा रद्द झाल्याने राज्य शासनाने रात्रीची संचारबंदी घोषित केल्याने तमाशाचे कार्यक्रम सुद्धा होऊ शकणार नाहीत. जर ग्रामदैवतांच्या यात्रा, जत्रा सुरू झाल्या नाहीत तर लोकनाट्य तमाशा फडमालक व कलाकार यांच्यावर अधिकच उपासमारीची वेळ येणार आहे.

समाजाचे प्रबोधन व मनोरंजन करणारी तमाशा ही कला महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखली जाते. वर्षातील आठ महिने गावोगावी फिरून ही कला सादर केली जाते. दस-यापासून तमाशाचा वर्षाचा हंगाम सुरू होत असतो. गुढीपाडव्यापर्यंत गावोगावी तंबूत तिकिटे लावून तमाशाचे खेळ होतात. मार्च, एप्रिल, मे या कालावधीत महाराष्ट्रभर गावोगावी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. पाडव्यानंतर गावोगावच्या जत्रांमध्ये तमाशा होतो. स्थानिक संयोजकांच्यावतीने गावातील यात्रेकरूंसाठी मनोरंजन व्हावे यादृष्टीने तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यासाठीच्या सुपारीही लाखोंच्या घरात देण्यात येतात. त्यामुळे या तीन-चार महिन्यांत तमाशाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. सर्वाधिक यात्रा याच काळात असल्यामुळे यात्रांमध्ये आपली कला सादर करून पोट भरणा-या तमाशा कलाकारांना आणि फड मालकांना हा कालावधी मोठी पर्वणी समजली जाते. एका तमाशासाठी ५० हजारांपासून ते अडीच लाखांपर्यंत सुपा-या ठरवण्यात येत असतात. राज्यात असलेले तमाशाचे फड सुपारीचे दर लक्षात घेता या क्षेत्रातही कोट्यवधीची उलाढाल होत असते.

पूर्वी दूरदर्शन वगळता एकही चॅनल नव्हता, मोबाईल तर नव्हतेच त्यामुळे गावातील वर्षातली तीन दिवस होणारी जत्रा हा अख्खा तालुक्याचा विषय असे. याञा आणि जञा तमाशाचे फड हे अतुट नाते होते. त्यामुळे यात्रा काळात कोणत्या गावात, कोणाचा तमाशा याची माहिती गावकरी घेत. गावातली लोकं, जुणे जाणकार मंडळी शेतातली कामं आवरुन संध्याकाळी धावत-पळत घर गाठायची आणि कशीबशी भाजी-भाकरी पोटात कोंबुन जीकड ढोलकीचा आवाज येतोय त्या गावाकडं सायकली किंवा पायपीट करुन तमाशाचा फड गाठायची. लावणी आणि वग हे तमाशाचे दोन मुख्य अंग. गण, गवळणणे तमाशाला सुरुवात होत, लावणी, सिनेमाची गाणी, बतावणी आणि अखेर वग. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील तमाशाचा काही भाग दाखवला जायचा आणि मग फड तिथून हलुन पुढच्या गावाला जायचा. तमाशाही मर्यादा सांभाळत होता, त्यात खालच्या दर्जाचे विनोद फारसे नसायचे. उलट सामाजिक संदेश देणारे वग म्हणजे नाटक होते. कालांतराने तमाशानेही काही बदल अंगीकृत केले आणि तमाशातील प्रेक्षकांची गोडी जणू हळू-हळू कमी होऊ लागली. त्यातच शासनाने रात्रभर चालणा-या तमाशावर बंदी आणली आणि तमाशाचा वेळ कमी केला. यानंतरच्या काळात विविध वृत्तवाहिन्या आल्या, इंटरनेट आला, मोबाईल आला आणि तमाशाचा प्रेक्षक अगदी दूर-दूर जात राहिला.  रात्रीच्या वेळमर्यादेमुळे तमाशाला आधीच घरघर लागली होती. त्यातून राज्यात ८२ छोटे-मोठे तमाशा फड आणि त्यावरील शेकडो कलाकार तग धरून होते. ही कला टिकवण्यासाठी फडमालक आणि कलाकार प्रयत्न करीत होते.

दोन वर्षींपूर्वी ऐन यात्रा-जत्रांच्या हंगामाच्या तोंडावर करोनाची पहिली लाट आली. फडमालकांनी सावकारांकडून कर्ज घेऊन कलाकारांना पहिला हप्ता दिला होता. मात्र, कमाई सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण टाळेबंदी जाहीर झाली आणि फडमालक हवालदिल झाले. पहिल्या लाटेतील परिस्थिती सुधारल्यानंतर नाटक, चित्रपटगृहेही सुरू झाली. त्यामुळे तमाशालाही परवानगी देण्याच्या मागणीसाठी तमाशा परिषदेने आंदोलन केले. तमाशाला परवानगी देण्याचा निर्णय झाला असतानाच करोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा कठोर निर्बंध लागू झाले. कमाईच नसल्याने फडमालकांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर व्याजाने वाढत गेला. सलग दुसरा हंगामही हातचा गेल्याने अक्षरश: अनेक तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती.

राज्यात तमाशाच्या निमित्ताने हजारो ग्रामीण कलाकार आपला उदरनिर्वाह करत असतात. किमान आठ ते दहा हजार कलाकार या कलाविश्वाशी जोडलेले आहेत. आता ऐन यात्रांच्या हंगामात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्यामुळे  याचा विपरीत परिणाम गावोगावच्या ग्रामीण कलाकारांवर होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये असणारे फडमालक तमाशे सुरू ठेवण्यासाठी कलाकारांना अगोदर पैसे देत असतात. त्यासाठी अनेक फडमालक सावकारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असतात, तर काही फडमालक बँकेकडून कर्ज घेत असतात. सदरचा पैसा घेऊन हे कलाकार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवतात आणि तमाशाच्या कालावधीत काम करून सदरची रक्कम फेडत असतात. ही बाब लक्षात घेऊन फड मालकांनाही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. फडमालक व कलाकार दोघांवर आज रडण्याची वेळ आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी या फड मालकांना आधार देण्याची गरज आहे. यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे, कलाकारांना सानुग्रह अनुदान देणे, फड मालकांना आर्थिक मदत करण्याची गरज असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

-  सुरेश मंत्री. 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...