मुख्य सामग्रीवर वगळा

भारताने दुध उत्पादनातील अव्वलस्थान टिकवणे गरजेचे

सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय साकारणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे असे म्हणता येईल. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेसमधील (एफएओएसटीएटी) उत्पादनविषयक माहितीनुसार २०२१-२२ मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात २४ टक्क्यांचे योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  त्यानंतर अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. २०१४-१५ ते २०२१-२२ अशा मागील ८ वर्षांच्या कालावधीत भारतातील दूध उत्पादनात ५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दुग्धव्यवसाय देशात या क्षेत्रातील ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट रोजगार देखील प्रदान करतो. २०२१-२२ मध्ये देशातील दुधाचे उत्पादन सुमारे ६.२ टक्के च्या चक्रवाढ वार्षिक वाढीने २०९.९६ दशलक्ष टन झाले आहे. २०१४-१५ मध्ये ते केवळ १४६.३१ दशलक्ष टन होते. न्यूझीलंड, नेदरलंड, बल्गेरिया, चीन, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, लिथुआनिया, मलेशिया, इंग्लंड, अमेरिका, थायलंड असे मोठे स्पर्धक दूध उत्पादनात असताना त्यांना मागे टाकून अव्वल स्थान अबाधित राखणे तशी सोपी गोष्ट नाही. महासत्ताक होण्याच्या दिशेने भारताचे हे एक पाऊल असल्याचे यानिमित्ताने मानले जात आहे. 
भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून त्यात अनेक क्षेत्रांचा मोठा वाटा आहे. कृषी क्षेत्र देखील त्यापैकी एक आहे. या अर्थव्यवस्थेत दुग्धजन्य पदार्थांचे मोठे योगदान आहे. दुग्धव्यवसाय हा देशाच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत ५ टक्के योगदान देणारा सर्वात मोठा कृषी माल मानला जातो. देशात राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही सर्वाधिक दूध उत्पादन करणारी राज्ये आहेत. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दूध उत्पादनात उत्तर प्रदेश प्रथम, तर राजस्थान दुस-या क्रमांकावर आहे. तिस-या क्रमांकावर मध्य प्रदेश, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे. लहान शेतकरी दुग्ध व्यवसायातील सर्वात मोठे लाभार्थी आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून बहुसंख्य शेतकरी पशुपालन करतात. देशातील शेतकऱ्यांकडे सरासरी एक व दोन जनावरे असे प्रमाण आहे. कौटुंबिक पातळीवर ग्रामीण भागाचा अभ्युदय करण्याचे प्रभावी साधन म्हणून दूध व्यवसायाचा उल्लेख करावा लागेल. दुग्ध उत्पादन क्षेत्राचे नेतृत्व ख-या अर्थाने महिलाच करतात. कारण दुग्ध उत्पादनात महिलांचे ७० टक्के योगदान आहे. ७.५ कोटी महिला दुग्ध उत्पादन व पशुपालन या मध्ये महत्वाची भूमिका बजावतात.

पूर्वीच्या काळी दुधाचे उत्पादन अधिक होते. भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी लाखो गायींची सेवा केली जात असे. गोपालन हा गावच्या परंपरेचा एक भाग होता. सणाला देशी तुपापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जात. खूप दिवसांनी दोन माणसं भेटत असतील, तर घरात दूध, दही आहे की नाही, असा प्रश्न विचारला जाई. श्रद्धेनुसार ज्या घरात गाय पाळली जात नाही ते घर अपवित्र असते, असे मानले जाई. हळूहळू ही प्रथा संपुष्टात आली. आता डेअरी फार्म आणि परदेशी जातीच्या गायींच्या आधारे भरपूर दूध तयार केले जात आहे. देशातील दूध उत्पादनात अनेक चढ-उतार झाले आहेत. सद्यपरिस्थितीवर नजर टाकली तर १९७० च्या दशकात भारतात झालेल्या श्वेतक्रांतीचे यश आजही दिसून येते. श्वेतक्रांतीमुळे  दूध उत्पादनाला पुन्हा एकदा चालना मिळत आहे. भारत दुध उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश झाला असला तरी निर्यातीत प्रथम क्रमांकावर येण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील, कारण आपला देश त्यात खूप मागे आहे. जगात न्युझीलंड, अमेरिका व ऑस्ट्रेलिया हे तीन देश दूध स्वत: च्या देशातील जनतेला पुरवतातच पण आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे, ह्या नाजूक प्रकृतीच्या पेयाला जगभर निर्यातही करतात. पुढील काळात मोठ्या सहकारी दूध संस्थांनी आंतरराष्ट्रीय बाजारात उतरणे आवश्यक आहे. कारण आपल्या दुधाचा उत्पादन खर्च तुलनेने कमी आहे. त्यामुळे जगाच्या तुलनेत आपण ते किफायतशीर दरात विकू शकतो. तसेच बटर, खवा, चीज यांच्या विक्रीला चालना देऊ शकतो. यासाठी नेस्लेसारख्या कंपनीप्रमाणे दूध संस्थांनी प्रचंड मोठे प्लँट उभे केले तर जगाच्या बाजारपेठेत आपले डेअरी प्रॉडक्ट्स सहजगत्या विकता येतील. त्यातून रोजगारही वाढेल. 

डेअरी अॅनालॉग्स, वनस्पती-आधारित उत्पादने आणि भेसळ करणारे हे डेअरी उद्योगासाठी एक मोठे आव्हान आणि धोके आहेत. त्याचबरोबर हिरवा चारा संसाधनांचा अभाव आणि जनावरांच्या रोगांवर कुचकामी नियंत्रण याकडे आज लक्ष देण्याची गरज आहे. आजही पशुधनाची काळजी घेण्यासाठी देशात पुरेशा प्रमाणात पशुवैद्यकच उपलब्ध नाहीत. देशात सध्या ५९ हजार नोंदणीकृत पशुवैद्यक असून या क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता देशात १ लाख २५ हजार पशुवैद्यकांची गरज आहे. देशात देशी जातींसाठी क्षेत्राभिमुख संवर्धन धोरणाचा अभाव आहे आणि अधिक दुधाच्या पार्श्वभूमीवर देशी जाती वाचवणे हे सरकारसमोर मोठे आव्हान असेल. दुध व्यवसाय आणि उत्पादनाशी निगडित शेतकऱ्यांना नवीन तांत्रिक कौशल्ये आणि दर्जेदार बाजार व्यवस्था उपलब्ध करून देण्यावरही सरकारने भर देण्याची गरज आहे, जेणेकरून लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन अधिकाधिक लोक एकमेकांकडे बघून या क्षेत्रात जोडले जावेत याचा फायदा होईल. जगाला रोज ९५१.२३ दशलक्ष टन दुधाची गरज असताना जगभर उष्णता वाढत असल्याने सध्या केवळ ८६४.८६ दशलक्ष टन दूध उपलब्ध होत आहे. ही परिस्थिती भारताचीच नसून विकसित देशातही दुधाची टंचाई भासत आहे. डेअरी उद्योगाने देशात ८ कोटी लोकांना रोजगार मिळवून दिला आहे, पण वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी दुधाचे उत्पादन तीन दशलक्ष टनाने कमी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना ते महागड्या दराने विकत घ्यावे लागेल. यामुळे या विषयावर गंभीरपणे चर्चा होणे आवश्यक आहे. हवामानातील उष्णतेमुळे पशुपालनावर व त्यांच्या खाद्यावर परिणाम होत असून त्यावर उपाय करता येतील, पण गरम वातावरणात दूध लवकर खराब होते आणि त्यामुळे त्याचा उत्पादनावरही परिणाम होत आहे. दूध उत्पादनात भारत अग्रेसर असल्याने यापुढे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांत भारताला योगदान द्यावे लागेल. त्यासाठी संशोधकांची फौज कामाला लावावी लागेल. कोट्यवधी शेतक-यांची उपजीविका दुधावर अवलंबून असताना भारत वर्षाला ८.५ लाख कोटी रुपयांचे दूध उत्पादन करतो. पण याकडे बड्या अर्थतज्ज्ञांसह देशातील अनेक लोकांचे दुर्लक्ष होत आहे. खेड्यांमधील विकेंद्रीत अर्थव्यवस्था याचे उदाहरण आहे. गहू आणि तांदळामधून होणारी उलाढाल देखील दुधाच्या उत्पादनइतकी नाही. हा व्यवसाय गरीब देशांसाठी उद्योगाचे एक आदर्श उदाहरण ठरू शकेल.

-सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...