अनेक आव्हानाचा सामना करत असताना भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. खरं तर भारत ही जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था आहे. लष्करी सामर्थ्यात हा चौथ्या क्रमांकाचा शक्तिशाली देश आहे. भारतीय लष्करी क्षेत्रात झपाट्याने आधुनिकीकरण होत आहे, ज्यामुळे केवळ संरक्षण उपकरणांच्या निर्मितीतच वाढ होत नाही, तर परकीय गुंतवणूकही वाढते. आज भारताचे सैन्य कोणत्याही शक्तीला आव्हान देण्यास सक्षम आहे. भारत हा जगातील सर्वात मोठी युवा शक्ती असलेला देश आहे, जो विकासाला वेगाने पुढे नेण्यास सक्षम आहे. अचूक आणि प्रभावी मुत्सद्देगिरीचा परिणाम म्हणून जागतिक स्तरावर भारताचे स्थान सातत्याने मजबूत होत आहे. जगात चौथ्या क्रमांकावर उभा असलेला भारत अवकाश क्षेत्रात आपली ताकद दाखवत आहे. येत्या काळात तोच देश वेगाने महासत्ता बनणार आहे, ज्याकडे आधुनिक तंत्रज्ञान असेल. तंत्रज्ञानात गुंतवणूक केल्याशिवाय कोणताही देश महासत्ता होण्याचा विचारही करू शकत नाही. इस्रोने रॉकेटद्वारे १०४ उपग्रह अवकाशात पाठवून जगाचे लक्ष वेधून घेतले होते, हा भारताच्या तंत्रज्ञानाचा चमत्कार होता. आज इस्रो जगातील सर्वात स्वस्त उपग्रह बनवण्यासाठी ओळखली जाते. केवळ विकसनशीलच नाही तर विकसित देशही आपले उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी इस्रोसोबत करार करण्यास उत्सुक आहेत. २०२४ मध्ये भारत गगन यान या स्वदेशी बनावटीच्या अवकाश यानाद्वारे भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठविणार आहे. पायाभूत सुविधांचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि प्रशिक्षित कामगारांची वाढती संख्या यामुळे भारताला उत्पादन केंद्र बनता आले आहे. भारताचा वाढता आर्थिक विकास दरही जगाचे लक्ष वेधून घेत आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीत विदेशी गुंतवणुकीचा वेग वाढत आहे. वर्ष २०२१-२०२२ मध्ये ८४ सहस्र ८३५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक (एफ्.डी.आय.) भारतात झाली आहे. व्यवसायाच्या दृष्टीने भारतात योग्य प्रदेश आणि व्यवसायाला साहाय्यभूत ठरणारे सरकारचे धोरण यांमुळे देशात व्यवसाय करणे सोपे झाले आहे. वसुलीला उत्तेजन देणा-या योजना आणि विदेशी गुंतवणुकीला चालना देणारे उपक्रम यांमुळे गुंतवणूकदारांचा भारताविषयीचा विश्वास वाढला आहे. उत्पादनापासून ते माहिती तंत्रज्ञानापर्यंत, रासायनिक उद्योगापासून इलेक्ट्रॉनिक्स उद्योगापर्यंत, कृषी क्षेत्रापासून ते सेवा क्षेत्रापर्यंत भारत जगाच्या नकाशावर आपले अस्तित्व निर्माण करीत आहे.
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसचे प्रोफेसर नुरिएल रुबीनी या सुप्रसिद्ध अर्थतज्ञांनी भारताबाबत ही भविष्यवाणी केली आहे. नुरिएल रुबिनी यांनी यापूर्वी २००८ मध्ये जागतिक आर्थिक मंदीचा अचूक अंदाज वर्तवला होता. या मंदीनंतर जगभरातील शेअर बाजार कोसळले होते. यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांचे नुकसान झाले. तेव्हापासून नुरिएल रुबिनीला "डॉ. डूम" म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली. त्यांचा अर्थशास्त्रातील अभ्यास व्यापक असून, ते भविष्यातील अर्थव्यवस्थेचा अचूक अंदाज मांडतात. युरोपीय देश आणि भारताची तुलना करायची झाल्यास भारताची लोकसंख्या आणि चांगला जीडीपी याबाबतीत युरोपीय देश भारताची प्रगती नाकारू शकत नाहीत. भारतातील लोकसंख्येचा विचार करता ३५ वर्षाखालील सर्वाधिक लोकांचा समावेश अतिकार्यक्षम गटात होतो. या तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण व त्यांच्या हाताला मिळणारे काम हीच बाब भारताला महासत्ता होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीमधील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, देशात उद्योग वाढीसाठी अनुकुल वातावरण ठेवले पाहिजे. सरकारी यंत्रणांमध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत. यात जीडीपीत आणखीन स्थैर्य आणण्यासाठी भारताला आणखीन काही वर्षे काम करावे लागेल. यासाठी आर्थिक नियंत्रण आणि योग्य नीती राबवण्याची गरज आहे
- सुरेश मंत्री.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा