पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. साधारण तेराव्या शतकात वारीचा उल्लेख आढळतो. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. संत तुकाराम यांची संत ज्ञानेश्वरांवर श्रद्धा होती. दर वद्य एकादशीला संत तुकाराम महाराज आळंदी येथे जाऊन माऊलींच्या समाधी समोर कीर्तन करीत असत. आजही वद्य एकादशीला कीर्तनाचा मान हा देहूकरांचा असतो. एवढेच नाही तर ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे गाभारा मंदिर हे संत तुकाराम महारांजांनी उभारले होते. त्यामुळे तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज हे सप्तमीला वडिलांच्या पादुका घेऊन आळंदीला जायचे आणि अष्टमीला माऊलींच्या पादुका देखील त्याच पालखीत ठेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ व्हायचे. तुकाराम महाराजांपर्यंत वारीचे स्वरूप पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या, असेच राहिले. पालखीची परंपरा जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी १६८५ मध्ये सुरु केली. तेंव्हापासून या पालखी सोहळ्याची परंपरा सुरु झाली. जवळपास गेली दिडशे वर्षे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचा पालखी सोहळा देहू आणि आळंदीमधून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो. सुरुवातील या पालखी सोहळ्यामध्ये लाकडांच्या पादुका होत्या. तसेच यात ज्ञानोबा-तुकाराम म्हणायची सुरुवात देखील नारायण महाराजांनीच केली. एखाद्याला वाटेल, काय हा उद्दामपणा? पंढरीला जाताना पंढरीनाथाऐवजी ‘ज्ञानोबा तुकाराम’ चा जयघोष? त्यांना काय ठाऊक, की एखाद्या आईकडे जर काही काम असेल तर तिची स्तुती न करता तिच्या मुलाची करावी, म्हणजे काम नक्की होते. हेच तर महाराष्ट्रातील चाणाक्ष वारकऱ्यांनी अचूक हेरले, म्हणून तर पांडुरंगाच्या दोन अतिलाडक्या लेकरांच्या नावाने साद घालीत ते पंढरी दुमदुमून सोडतात. जगात असे कोणतेही क्षेत्र नसेल, की जेथे भगवंतापेक्षा त्याच्या भक्तांचाच जयजयकार होतो. नारायण महाराजांनी जेव्हा ही परंपरा सुरु केली तेव्हा त्यांच्यासोबत बाराशे वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याच्या नोंदी आजही सापडतात. म्हणून आजही संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा सप्तमीला पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा अष्टमीला पंढपूरकडे मार्गस्थ होतो. त्या काळात एखाद्याला पालखीपदस्थ करणे, हा सर्वांत मोठा सन्मान होता. तो या संतश्रेष्ठांना दिला गेलाच; परंतु आता आपण ज्ञानोबा-तुकोबांच्या समवेत वारी करीत आहोत, असे प्रोत्साहक वातावरणही निर्माण झाले आहे.
वारीमध्ये समावेश होणा-या पालख्या म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली-आळंदी, संत निवृत्तिनाथ - त्र्यंबकेश्वर, संत सोपानदेव-सासवड, संत मुक्ताबाई - एदलाबाद (मुक्ताईनगर), संत विसोबा खेचर-औंढा नागनाथ, संत गोरा कुंभार-तेर, संत चांगदेव- पुणतांबे, संत भानुदास आणि एकनाथ-पैठण, संत तुकाराम महाराज- देहू , जगन्मित्र नागा - परळी वैजनाथ, राघव चैतन्य - आळंद गुजौरीज, केशव चैतन्य - ओतूर, बोधलेबुवा - धामगाव, मुकुंदराज - आंबेजोगाई, जोगा परमानंद - बार्शी, कान्होराज महाराज - केंदूर, संताजी जगनाडे - सुंदुंबरे या पालख्यांचा प्रामुख्याने समावेश असतो. या सर्व पालख्या वाखरीजवळ एकत्रित येतात. विठुरायाच्या नामाचा भक्तिमय जागर होत अवघे आसमंत दुमदुमून जाते. वारीच्या वाटेवर कीर्तने होतात. जागरात रात्रभर अभंगांचे गायन होते. कोणी केव्हा काय करायचे, याचे वेळापत्रक ठरलेले असते. वाद, संघर्ष उद्भवलाच, तर त्याची सोडवणूक कशी करायची, याची यंत्रणाही कार्यरत असते; पण असे प्रसंग क्वचित येतात. वारीत स्त्री-पुरुषांचे पारंपरिक खेळ सुरू असतात. उच्च-नीच, लहान-मोठा, स्त्री-पुरुष अशा भेदाभेदांचे विसर्जन येथे पाहायला मिळते. लौकिक आणि अलौकिक यांची एवढी घट्ट वीण अन्यत्र क्वचितच पाहायला मिळेल. ना आमंत्रण, ना गाड्या घोडे ना बाकी काही, तरीही आषाढी सोहळ्यासाठी वैष्णवांचा मेळा अनेक मैल पायी प्रवास करत विठुरायाच्या पंढरीत पोहचतो. गेली अनेक वर्ष ही वारीच्या परंपरेचा महाराष्ट्र साक्ष देत आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता, फक्त त्याच्या कळसाचे दर्शन घेण्यासाठी श्रीहरीच्या गजरात विठुरायाची पंढरी गजबजून जाते.
वारी हे महाराष्ट्राला जोडणारे व्यापक 'नेटवर्क' आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. वारीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, तिची सामूहिकता. ती समूहाने करायची गोष्ट आहे. ती काही तरी प्राप्त होण्यासाठी वैयक्तिक पातळीवर करण्यात येणारी साधना नाही. महाराष्ट्रात असे एखादे गाव क्वचितच असेल, की जेथून एकही व्यक्ती वारीला येत नाही. या माध्यमातून महाराष्ट्राची प्रमाण मराठी घडत गेली. सामाजिक ऐक्य आपोआपच सिद्ध झाले. वारकरी पंढरीला 'दिंडी' नावाच्या समूहात गात, नाचत, बागडत, खेळत जातात. दररोज पंचवीस ते तीस किलोमीटरचा प्रवास करत या दिंड्या आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात पोहचतात. आपल्या प्रापंचिक सुख-दु:खांची ओझी उतरवून, विठ्ठलाकडून प्रेम नावाची ऊर्जा घेऊन आपापल्या स्थळी परत जातात. आता या पंरपरेची जागतिक नोंद देखील घेतली जाणार आहे. वारीची ही परंपरा शेकडो वर्षे अखंडपणे चालवत आलेल्या वारकरी संप्रदायांच्या अनेक पिढ्यांसाठी हा मोठा सन्मान ठरणार आहे.
-सुरेश मंत्री.
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा