मुख्य सामग्रीवर वगळा

जगात उपासमारीची गंभीर समस्या

आज रोजी भूक ही जगातील प्रमुख समस्या असून, संपूर्ण जगाला भुकेच्या भीतीने ग्रासले आहे. जागतिक ते स्थानिक अन्न प्रणालीतील अतिव्यापी संकटातून जगभरातील लोकसंख्येची भुकेची पातळी गंभीर असल्याचे जगात दिसुन येते. अन्नाविना उपासमार होणा-यांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. जगात सुमारे ७४ कोटी लोक उपासमारीचे बळी असल्याचे यूएनच्या नवीन अहवालात समोर आले आहे. म्हणजेच त्यांना अन्न अजिबात मिळाले नाही. यूएनच्या 'द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड २०२२ रिपोर्ट’ नुसार, २०१९ नंतर लोकांचा भुकेशी संघर्ष झपाट्याने वाढला आहे. २०१९ मध्ये, जगातील ६१८ दशलक्ष (६१.८ कोटी) लोकांना उपासमारीचा सामना करावा लागला. म्हणजेच केवळ ३ वर्षात एक वेळचे अन्न मिळत नाही, असे १२.२ कोटी लोक वाढले आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की, गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये जगातील ११.३% लोकसंख्येला (सुमारे ९० कोटी लोकांना) पुरेसे अन्न मिळाले नाही. अहवालानुसार, उपासमारीची स्थिती अशीच राहिली तर २०३० पर्यंत ६०० दशलक्ष (६० कोटी) लोक कुपोषणाचे बळी होतील. 

                   जगात दर तीनपैकी एका व्यक्तीला रिकाम्या पोटी झोपण्याची वेळ आली आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, २४० कोटी लोकांना किंवा जगाच्या लोकसंख्येच्या २९.६% लोकांना अन्नाचा पुरवठा होऊ शकत नाही. याशिवाय २०२१ मध्ये जगातील ३१० कोटी लोकांना म्हणजेच ४२ % लोकसंख्येला पोषक आहार मिळालेला नाही. भूक ही खाण्यासाठी पुरेसे अन्न उपलब्ध असण्यापेक्षा ते पौष्टिक असण्याबद्दल आहे. पाच वर्षाखालील मुलांचे मृत्यू दर ४५ टक्के हे अपुऱ्या अन्नामुळे नाहीतर अयोग्य पोषणामुळे होते. २०२२ मध्ये ५ वर्षाखालील ४.५ कोटी मुले कुपोषणाचे बळी ठरले. त्याचवेळी १४.८ कोटी मुलांची वाढ आणि विकास कमी प्रमाणात झाला. ही मुले अतिशय बारीक आणि अशक्त झाली आहेत. या मुलांचे वजन त्यांच्या वयानुसार कमी आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय चलनवाढ वाढली आहे. त्यामुळे लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करता येत नाही. खरे तर, रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गहू, सूर्यफूल तेल आणि खतांपासून कृषी उत्पादनांचे प्रमुख निर्यातदार आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. युक्रेनमधील युद्धाने व्यापार, उत्पादन आणि उपभोगाचे जागतिक नमुने बदलले आहेत. ज्यामुळे २०२४ पर्यंत चलनवाढीने किमती उच्च राहिल्याने अन्न असुरक्षितता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ज्याची सर्वाधिक झळ कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील लोकांना भूक बळी आणि कुपोषणाच्या माध्यमातून सोसावी लागणार आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार २०३० पर्यंत जगातील उपासमार शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टाजवळ पोहोचणे जवळपास अशक्य असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अन्नपुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. ज्या मुलांना आणि प्रौढांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी कुपोषणाचा इतिहास होता त्यांना संसर्ग झाल्यास मृत्यूचा धोका जास्त असतो. कुपोषणामुळे रोगांशी लढण्याच्या प्रतिकारशक्तीच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

अन्नाचा अधिकार हा मानवी मूलभूत अधिकांपैकी एक आहे. पृथ्वीवर ७ अब्जाहून अधिक लोकांना पुरेल इतके अन्न उत्पन्न होत असले तरीही त्याचे असमानता आणि आर्थिक विषमतेमुळे असंतुलित वितरण होते. जगभरात उत्पादक केलेल्या अन्नांपैकी एक तृतीयांश अन्न वाया जाते. त्यामुळे इतर आजारांपेक्षा उपासमारीने लोकांचा मृत्यू दर जास्त आहे.सध्याची जगाची ७.९ अब्ज लोकसंख्या २०५० पर्यंत १० अब्जापर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. सातत्याने वाढणारी लोकसंख्या, उत्पन्नातील सुधारणा आणि आहारातील वैविध्य यामुळे अन्नाची मागणी सातत्याने वाढते आहे. जगभरातून विविध प्रदेशांमध्ये आणि देशांतर्गत पातळीवर अनेक उपाययोजना केल्यानंतरही भुकेच्या समस्येचा पूर्णपणे निपटारा होऊ शकलेला नाही. याउलट उपासमार आणि कुपोषणाचे दुष्टचक्र अधिकच उग्र स्वरूप धारण करू पाहतेय. आज जागतिक ते स्थानिक अन्न प्रणालीला वाढती गरिबी, असमानता, अकार्यक्षम प्रशासन व्यवस्था, भ्रष्टाचार सुमार पायाभूत सुविधा, आणि अल्प कृषी उत्पादकता या संकटातून हानी पोहोचतेय. सोबतच वाढत्या अन्न असुरक्षिततेतून उपासमार आणि कुपोषणाचे अरिष्ट दिवसेंदिवस गंभीर होताना दिसते. 

जगभरातील भुकेचे पोषण करायचे असेल तर जागतिक अन्न उत्पादन पद्धतीमध्ये सुधार करणे आवश्यक आहे. शाश्वत कृषी पद्धती आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणे अपरिहार्य आहे. शेतीची पर्यायाने अन्नसुरक्षेची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक सहयोग व विकास संघटनेने सुचित्त केल्याप्रमाणे शेतीसाठी पाणी, हवा आणि जैवविविधता संवर्धनासाठी किफायतशीर कृषी-पर्यावरण धोरणांचा फेरविचार महत्त्वाचा ठरेल. आपण अन्न कसे वापरतो, सामायिक करतो आणि वाढ करतो ह्यावर पुनर्विचार करणे गरजेचे आहे. नीट व्यवस्थापन केल्यास शेतीतून, मत्स्य उत्पादनातून पुरेसे पौष्टिक अन्न पुरवू शकतो. सध्याच्या अन्न व्यवस्थेत अजूनही दरवर्षी सुमारे एक तृतीयांश जागतिक अन्नधान्याची नासाडी होतेय, जे जवळपास १.२ अब्ज टन अन्नाच्या समतुल्य आहे. संशोधन असे सूचित करते, की जर उच्च उत्पन्न असलेल्या देशांनी काढणीपश्चात होणारे नुकसान पन्नास टक्क्यांनी कमी केले तर गरीब देशांमधील कुपोषित लोकांची संख्या ६३ दशलक्षांपर्यंत कमी होऊ शकते. तसेच उरलेलं अन्न कंपोस्ट करणे यासारखी छोट्या प्रक्रियेसाठी पावले उचलू शकतो. सर्वसमावेशक शासन आणि अन्न प्रणालीमध्ये परिवर्तन करण्याच्या प्रयत्नांना केंद्रस्थानी ठेवणे, त्यासाठी नागरिकांचा अधिकाअधिक सहभाग, कृती आणि देखरेख सुनिश्चित करावे लागेल आणि स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन दुर्मीळ संसाधनांच्या कार्यक्षम वापरातून वाढत्या मानवी गरजा पूर्ण करून अन्न व पोषण सुरक्षेची खात्री देणाऱ्या धोरणांवर नव्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. 'अन्न सुरक्षा’ कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ही योजना जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा/ अन्न-सुरक्षा योजना आहे, केवळ याच योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीने अपेक्षित यश मिळू शकते. गरज आहे ती प्रभावी अंमलबजावणीची.

-सुरेश मंत्री. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...