मुख्य सामग्रीवर वगळा

'चांद्रयान ३' ची अवकाश भरारी

इस्रो आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण काल भारताचे महत्वाकांक्षी तिसरं चांद्रयान-३ मिशन लॉन्च झालं आहे. चांद्रयान-३ ने काल दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी यशस्वी उड्डाण केलं. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे अंतराळयान काल प्रक्षेपित करण्यात आलं. चांद्रयान २ चे चंद्रावर लँडींगआणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर चांद्रयान २ ही मोहीम अपूर्ण राहिली होती. परंतु आता भारताने चांद्रयान ३ मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. चांद्रयान-३ हा इस्रोच्या चंद्रमोहिमेतील तिसरा टप्पा आहे. चंद्रावर जात असलेले हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. या ठिकाणी आतापर्यंत कुठलेही यान पोहोचले नाही अशी माहिती आहे, म्हणून संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांकरिता चांद्रयान ३ मोहीम अत्यंत महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे. या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगने उतरण्याच्या प्रयत्न केला जाईल. या मिशनमध्ये सर्व प्रक्रिया चांद्रयान दोन सारखीच राहणार आहे. चंद्रावर याआधी अमेरिका चीन व रशिया हे देश गेले असून भारताला या मोहिमेत यश मिळाल्यास चंद्रावर यान उतरवणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरेल.

पुढील काही दिवसांत यानाच्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेचा विस्तार करण्यात येईल. या प्रक्रियेतून यानाची गती वाढेल. वाढलेल्या गतीचा उपयोग करून यानाला चंद्राच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येईल. प्रोपल्जन मॉड्यूलच्या साह्याने चंद्राजवळ पोहचल्यावर यानाला चंद्राभोवती दीर्घवर्तुळाकार कक्षेत सोडण्यात येईल. दीर्घवर्तुळाकार कक्षा टप्प्याटप्प्याने कमी करून अंतिमतः ‘चांद्रयान-३’ला चंद्राभोवती १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. २३-२४ ऑगस्टला (किंवा सप्टेंबर अखेरीस) प्रोपल्जन मॉड्यूलपासून विलग झालेले ‘लँडर’ चंद्रावर निश्चित केलेल्या ठिकाणाकडे टप्प्याटप्प्याने उतरण्याची प्रक्रिया पार पाडेल. जेव्हा हे लँडर चंद्रावर उतरेल, तेव्हा त्यातून रोव्हर नावाचं एक वाहन बाहेर पडेल. हे रोव्हर चंद्रावरची माती आणि इतर गोष्टी गोळा करण्याचं काम करेल. चार इंजिनांच्या साह्याने (थ्रस्टर) ‘चांद्रयान-३’ अलगद चंद्रावर उतरेल. हे दोघेही १४ दिवस चंद्रावर प्रयोग करतील, तर प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. मिशनच्या माध्यमातून इस्रो चंद्राचा पृष्ठभाग किती सिस्मिक आहे हे शोधून काढेल, माती आणि धूळ यांचा अभ्यास केला जाईल. लँडिंग साइटची चांद्रयान-२ ने टिपलेली छायाचित्रे ‘चांद्रयान-३’च्या मेमरीमध्ये आधीच टाकण्यात आली असून, ‘चांद्रयान-३’च्या कॅमेराने पूर्वीच्या छायाचित्रांचा आधार घेऊन चंद्रावर उतरण्याची जागा निश्चित करायची आहे.

चांद्रयान २ मोहिम अयशस्वी ठरल्याने या मोहिमेतील त्रुटी चांद्रयान ३ मध्ये दूर करण्यात आल्या आहेत. चंद्रावर यान उतरण्याच्या अपेक्षित जागेची सीमा ५०० मीटर बाय ५०० मीटर वरून चार किमी बाय २.४ किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यानाला ऐनवेळी थोडे दूर जावे लागले तरी स्वयंचलित यंत्रणा त्यात दुरुस्ती करून अडथळा निर्माण करणार नाही. विक्रम ‘लँडर’चे चार पाय अधिक मजबूत करण्यात आले आहेत. चांद्रयान ३ मिशनचा एकूण खर्च ६१५ कोटी रुपये आहे. हा खर्च इतर इतर देशांपेक्षा खूप कमी आहे. इस्रोने ही योजना अशी आखली आहे की कमीत कमी इंधन खर्च करून रॉकेटच्या पूर्ण क्षमतेने चंद्रावर यशस्वीरीत्या लँड करता येईल. याच दृष्टिकोनामुळे इस्रोच्या मोहिमा इतक्या किफायतशीर आणि कमी खर्चात पूर्ण होतात. एक तुलना करायची झाल्यास, सध्याच्या अनेक हॉलिवुड आणि बॉलिवुड सिनेमांचं बजेट यापेक्षा जास्त असतं. एलव्हीएम ३ हे भारताकडे असलेलं सर्वांत मोठं रॉकेट आहे, त्यामुळे त्याच्या सहाय्याने चंद्रापर्यंत जाणं, तेही कमीत कमी इंधनासह, यासाठी इस्रोने एक अनोखी शक्कल लढवली, जिचा वापर आपल्या शेतांमध्ये केला जातो. तुम्हाला गोफण माहिती आहे? शेतात पक्ष्यांना, जनावरांना पळवून लावण्यासाठी शेतकरी एका दोरीला एक दगड बांधून तो दोर पाच-सहावेळा गरागरा फिरवून मग तो दगड वेगाने सोडून देतात. इस्रोने याच गोफणच्या तंत्रज्ञानाचा वापर करून, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने कमीत कमी इंधन खर्च करून चंद्र गाठण्याचा मार्ग आखला. थेट चंद्राच्या दिशेने सरळ प्रवास करण्याऐवजी चांद्रयान हळूहळू आपली कक्षा पृथ्वीपासून दूर वाढवत जातं. एका ठराविक अंतरावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राबाहेर पोहोचल्यावर चांद्रयान चंद्राच्या दिशेने जाऊन मग चंद्राच्या कक्षेत प्रवेश करतं. त्यानंतर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करतं. अशा प्रकारे कमी शक्ती आणि इंधनाचा वापर करून पण जास्त लांबचा प्रवास करून यान चंद्रावर पोहोचतं.

बहुतांश काळ अंधारात असणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाणी असून, त्याचे नेमके स्वरूप भारताच्या या मोहिमेतून समजेल. चंद्राबद्दलची बरीच माहिती आपल्याला मिळेल. तिथली जमीन, वातावरण कसं आहे? याच उलगडा होईल. सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील रहस्ये उलगडण्यासाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील नोंदींचा उपयोग होईल. चंद्रावर पुन्हा माणसाला पाठवण्यासाठी आखण्यात आलेल्या अमेरिकेच्या आर्टेमिस मिशनला चांद्रयान ३ कडून मिळालेल्या माहितीचा उपयोग होईल. ती मोहीमही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवण्यात येणार आहे. इस्रोच्या अध्यक्षांनी या यशस्वी उड्डाणाबद्दल या मिशनवर काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांच अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या.

 -सुरेश मंत्री.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...