मुख्य सामग्रीवर वगळा

वणव्याची मिळेल पूर्वकल्पना

 

 पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्पांमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होतेय. तर यात आता जंगलांना लागणाऱ्या आगींमुळे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होतंय आणि यातून पर्यावरणाचा -हास होण्याचा धोका अधिक असतो. यातून आपला ऑक्सिजनचा एक महत्त्वाचा स्रोतही गमावला जात आहे. जंगल आगीमुळे पर्यावरणाची हानी तर होतेच आहे. पण कार्बन डायऑक्साईडही वातावरणात वाढतो आहे. हा हरितगृह वायू आहे व त्याचा प्रतिकूल परिणाम पृथ्वीचे तापमान वाढीमध्ये दिसून येत असल्याचे संशोधनात पुढे आल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगतात. जागतिक पर्यावरण बदलामुळे आधीच खराब झालेली पर्यावरणीय परिस्थिती जंगलांना लागणाऱ्या आगींमुळे अधिकच बिकट होत चालली आहे असेही पर्यावरणवादी वेळोवेळी आठवण करून देत आहेत. ज्या वेळी जंगलामध्ये आगी लागतात तेव्हा लहान किटकांपासून ते मोठ्या वन्यप्राण्यांपर्यंत सर्वांच्या अधिवासावर त्याचा आघात होतो. या वन्यप्राण्यांना उपलब्ध असलेलं खाद्य हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहत नाही. आग लागल्यानंतर पाऊस पडल्यानंतर तिथल्या जंगलांच पूर्वीसारखं जीवन होत नाही. त्यामुळे अन्नसाठा  कमी झाल्यामुळे आणि त्यांचा तिथला अधिवास नष्ट झाल्यामुळे वन्यप्राणी त्यांच्या अधिवासातून बाहेर येतात आणि मानवी वस्तीकडे येताना दिसतात. यामुळे मानव आणि वन्यजीवन संघर्ष पाहायला मिळतो. त्यामुळे आगीपासून जंगलाचे संरक्षण व्हावे, यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचा अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होता. आता या प्रयत्नांना यश आले असून, जंगलाला आग लागण्यापूर्वी अलर्ट करणारी यंत्रणा विकसित झाली आहे. त्यामुळे आगीच्या घटना नियंत्रित करण्यास मोठी मदत मिळणार आहे.

  केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या एकूण भूभागापैकी २४.६२ टक्के जंगलं आहे. देशातील ८ कोटी ९ लाख हेक्टर्स जमीन जंगलाने आच्छादली आहे. देशात जंगलाला लागणा-या आगीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ती नष्ट होते. एका रिपोर्टनुसार २०१८-१९ मध्ये देशात विविध ठिकाणी जंगलाला लागणा-या घटनांची संख्या २.१० लाख नोंदली गेली होती, तर २०२०-२१ मध्ये जंगलाला लागणा-या आगीच्या घटनांची संख्या ३.४५ लाख नोंदली गेली. यावरून जंगलाला लागणा-या आगीची संख्या लक्षात येते. २०१९ मध्ये २१ फेब्रुवारीला बंदीपूर अभयारण्यात मोठी आग लागली होती जी २५ फेब्रुवारीला विझवण्यात प्रशासनाला यश आले होते. यात सुमारे ८७,४०० हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. जंगल आगीमुळे भारताचे दरवर्षी सुमारे ११०० कोटी रुपयाचे नुकसान होत असते. भारतातील १ जानेवारी ते २९ फेब्रुवारी २०१९ मधील एकूण जंगल आगींपैकी ३७% आगी या आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू व केरळ येथे लागल्या होत्या. ताडमाड उंच वाढलेल्या झाडांची आगीने कत्तल करण्यासाठी खरेतर पहिल्यांदा एका ठिणगीची गरज असते. ही ठिणगी विजेच्या कडकडाटमुळे मिळू शकते किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे. पण यासाठी परिस्थिती अनुकूल असावी लागते. जर स्थानिक पर्यावरण उष्ण व शुष्क असेल व जेव्हा पाण्याची पातळी खाली गेलेली असेल तेव्हा आगीसाठी पर्यावरणीय परिस्थिती अनुकूल बनते. त्या ठिकाणची आर्द्रता सुद्धा कमी असावी लागते व जळण्यासाठी लाकूड व पालापाचोळा पार सुकलेला असावा लागतो. त्याचबरोबर स्थानिक संरचनासुद्धा आग लागणे व ती पसरवण्यामध्ये फार महत्त्वाचे कार्य पार पडत असते. सपाट जागेत आग लवकर पसरत नाही. पण डोंगरांच्या चढावर ती द्रुतगतीने पसरते. खालची पेटती झाडे वरच्या झाडांना आगीच्या जंजाळात पटकन ओढून घेतात. पण या साऱ्या घटनांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा घटक जो असतो तो आहे वारा, त्याची गती आणि त्याची वाहण्याची दिशा. जास्त व कमी दाबाचे जे पट्टे निर्माण होतात त्याच्यामुळे वाऱ्याची गती व दिशा सतत बदलत राहते. आगीची दिशा जास्त आर्द्रता असणाऱ्या वनाकडे कललेली असेल तर ती आग लवकर आटोक्यात येते किंवा आटोक्यात आणता येते. पण जर तिचा रोख कोरड्या व जळाऊ वनस्पतीकडे गेला तर तो वणवा शमवणे कठीण होऊन बसते. 

 जंगलात आग लागण्याच्या घटनांबाबत अलर्ट करण्याची व्यवस्था मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु जंगलात आग लागल्यानंतरच असे अलर्ट जारी केले जात होते. त्यामुळे जंगलात पोहोचेपर्यंत आग भडकलेली असायची. अशा परिस्थितीत आग रोखणे शक्य नसायचे. यातून जंगलाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र नष्ट व्हायचे. जंगलाला लागणा-या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता नवतंत्रज्ञान विकसित झाले असून, हे नवतंत्रज्ञान आठवडाभर अगोदरच आगीबाबत अलर्ट करू शकते. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय आणि भारतीय वन सर्वेक्षणच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१६ पासूनच या तंत्रज्ञानावर काम सुरू करण्यात आले. व्यापक अभ्यास आणि संशोधनानंतर २०१९ मध्ये हे तंत्रज्ञान विकसित केले. त्यानंतर त्याची दीर्घकाळ चाचणीही घेण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे याचे काम थंडावले होते. मात्र, आता नव्या तंत्रज्ञानासह नव्याने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे नवे तंत्रज्ञान फायर वेदर इंडेक्स (एफडब्ल्यूआय) आणि भारतीय हवामान खात्याचे तापमान, पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण करून आगीचा अंदाज लावू शकते. या माध्यमातून जंगलातील तापमानाच्या चढ-उताराचा नियमित अंदाज घेतला जाणार आहे. सातत्याने तापमान वाढत गेले आणि त्यातून ड्रायनेस निर्माण झाला, तर आगीचा धोका असतो. वन क्षेत्राची ओळख जंगल नकाशा आणि जीआयएसच्या मदतीने केली जाऊ शकते. असे झाल्यास ज्या भागात आगीचा धोका आहे, तिथे सर्व यंत्रणा सज्ज ठेवून आग रोखण्यासाठी अगोदरच प्रयत्न केले जाऊ शकतात. एवढेच नव्हे, तर ज्यामुळे आग लागण्याचा धोका आहे, अशा हालचाली रोखण्याचे कामही केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. यंदा राजस्थानमधील सरिस्का वाघ अभयारण्यात आगीच्या अगोदरच अलर्ट जारी केला होता. मात्र, त्याचा गांभीर्याने विचार केला गेला नाही. त्यामुळे आग भडली. त्यानंतर आग विझविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. एका सरकारी अहवालानुसार भारतात जंगलांना आगी मुद्दामहून लावल्या जातात. या आगी लावून शेतीसाठी जमीन मिळवली जाते किंवा शिकारीसाठी जमीन तयार केली जाते. लाकडाच्या वापरासाठीही जंगलाला आग लावली जाते. उत्तर भारतात कमी प्रमाणात जंगल वणवा पेटतो. अशाप्रकारच्या मानवनिर्मित कारणांमुळे जंगलाला लागणा-या वनव्यांना मात्र हे संशोधन रोखु शकणार नाही हे सुद्धा तेवढेच खरे. 

- सुरेश मंत्री. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...