मुख्य सामग्रीवर वगळा

भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम

भारत २०२३ मध्ये पहिली मानवी अंतराळ मोहीम राबवणार आहे. भारत अंतराळात मानवी मोहीम आणि पहिली मानवी सागरी मोहीम समांतरपणे 'गगनयान' या नावाने राबवणार असल्याची माहिती आहे. भारतीयांना अंतराळात पाठवण्याचा संकल्प करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१८ च्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात या मोहिमेची घोषणा केली होती. २०२२ पर्यंत देशातील एखाद्या तरुणाला अथवा तरुणीला अंतराळात पाठवण्यात येईल असं मोदींनी म्हटलं होतं. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अवकाशवीर आहेत. त्यांनी २ एप्रिल १९८४ रोजी रशियाच्या सोयूझ टी-२ या यानातून अवकाशात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत रशियाचे दोन अवकाशवीर होते. राकेश शर्मा भारतीय हवाई दलात वैमानिक होते. त्यावेळी राकेश शर्मा यांनी अवकाशातून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संवाद साधला होता. अंतराळातून भारत कसा दिसतो या इंदिरा गांधी यांच्या प्रश्नावर, ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ असे उत्तर राकेश शर्मा यांनी दिले होते. राकेश शर्मा यांना पुढे अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

इस्रो ही संस्था तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी करणारी संस्था आहे. इस्रोची ही आजवरची सर्वांत महत्त्वाकांक्षी मोहीम असणार आहे. या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांची निवड करण्यात आली आहे. खरं आव्हान होत ते म्हणजे अंतराळवीरांना द्यावं लागणारं प्रशिक्षण. अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याची पूर्ण क्षमता आपल्याकडे अजूनही नाही. या मोहिमेची डेडलाईन लक्षात घेता इतर संस्थांची मदत घेणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांना रशियामधे प्रशिक्षण दिलं जात आहे. तिथं एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते देशाच्या आशा-आकांक्षांची जबाबदारी उचलत अवकाशात झेप घेतील.

जी.एस.एल.व्ही मार्क थ्री हे यान गगनयान कार्यक्रमासाठी वापरलं जाणारं असून त्यात दोन क्रायोजेनिक इंजिन्स असतील. इस्रोद्वारे निर्मित या इंजिनाचं नाव विकास असं ठेवण्यात आलं असून अंतरिक्षात मानवासह मोहिम पाठविण्याच्या दृष्टिनं त्याचं यश विशेष महत्वाचं आहे. तसेच अवकाशात मानवाला घेऊन जाणारे हे यान संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले यान असणार आहे. इस्रोची ही पहिली मानव मोहीम आहे. यासाठी एका विशेष खात्याची स्थापना करण्यात आली आहे. गगनयान नॅशलन अॅडव्हायजरी कौन्सिल असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. या कौन्सिलच्या माध्यमातून संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

गगनयानाच्या महत्त्वाच्या मोहिमा - यानातील व्यक्तींना  संकटकाळी बाहेर पडू देणाऱ्या प्रणालीची चाचणी आणि गगनयानची पहिली मानवविरहित मोहीम (जी-१) या दोन्ही मोहिमा २०२२ च्या उत्तरार्धात होणार आहेत. त्यानंतर २०२२ च्या अखेरीस दुसरी मानवविरहित मोहीम काढली जाईल. त्यामध्ये इस्रोने तयार केलेला 'व्योममित्र' नावाचा अवकाशाला घाबरवणारा यंत्रमानव प्रवास करेल. त्यानंतर २०२३ मध्ये गगनयान ची पहिली मानवी अंतराळ मोहीम काढण्यात येईल.

इस्रोने समानव अंतराळ कार्यक्रम २००७ मध्ये सुरू केला होता. मात्र, निधीच्या कमतरतेमुळे ही योजना पुढे सरकू शकली नव्हती. त्यावेळी इस्रोकडे असलेल्या जी.एस.एल.व्ही ची क्षमता कमी असल्यामुळे अंतराळवीर असलेलं यान पाठवण्यात अडचणी होत्या. पुढे अधिक क्षमतेचे रॉकेट्स किंवा क्रायोजेनिक इंजिन तयार करण्यासाठीचे प्रयोग सुरू झाले. २०१४ साली इस्रोला जी.एस.एल.व्ही मार्क टू बनवण्यात यश मिळालं. क्रायोजेनिक इंजिनांमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगांनाही यश मिळालं. त्यामुळे गगनयान मोहिमेला पुन्हा वेग आला. भारताने त्यानंतर जी.एस.एल.व्ही मार्क थ्री बनवण्यास सुरूवात केली. चंद्रयान-२ हे यानही जी.एस.एल.व्ही मार्क थ्री या रॉकेटच्या मदतीनेच अवकाशात सोडण्यात आलं होतं. अधिक क्षमतेचा लॉन्च पॅड बनवण्यात यश मिळाल्यानंतर इस्रोने २०१७ साली समानव अंतराळ मोहिमेचं काम पुन्हा सुरू केलं.

गगनयान मोहिमेसाठी इस्रोने बंगळुरूमधल्या मुख्यालयात ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर उभारलं आहे. या मोहिमेअंतर्गत या अंतराळवीरांना ७ दिवसांसाठी अंतराळात पाठवून त्यांना सुरक्षित पृथ्वीवर आणण्याचा विचार आहे. अंतराळ मोहिमेच्या कुठल्याही टप्प्यात अंतराळवीरांना धोका निर्माण झाल्यास त्यांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्यासाठी रॉकेटपासून वेगळं करणारी चाचणीही यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. अहमदाबाद इथल्या प्रयोगशाळेनं अंतराळवीरांना लागणारे खास सूट यापूर्वीच विकसित केले आहेत. याशिवाय अंतराळात जिवंत राहाण्यासाठी आवश्यक ती लाईफ सपोर्ट सिस्टिम विकसित करणे, हे मोठं आव्हान असणार आहे. अंतराळवीरांचा हा कार्यक्रम राष्ट्रीय अभिमानात भर घालेलच शिवाय युवकांना विज्ञानात करीअर करण्यासाठी प्रेरणा देईल.

सर्वात आधी रशिया (पूर्वीचे सोव्हियत युनियन) आणि त्यानंतर अमेरिकेने पन्नास वर्षांपूर्वी अंतराळात पाऊल ठेवले होते. या दोन्ही देशांनी मानव मोहिमेपूर्वी प्राण्यांना पाठवले होते. प्राण्यांची चाचणी यशस्वी झाल्यानंतर मानवाला पाठवण्यात आले. या मोहिमांनंतर अनेक दशकांनी २००३ साली चीनने मानवी अंतराळ मोहीम यशस्वी केली. पृथ्वीच्या पाठीवरील सर्वांत जुन्या संस्कृतीपैकी एक म्हणजे भारत आहे. पृथ्वीच्या बाहेर जेव्हा माणसाच्या वसाहती स्थापन करायच्या असतील तेव्हा त्यात भारत कसं काय मागे राहू शकेल ? या मोहिमेसाठी भारताकडे अचूक तंत्रज्ञान आणि वातावरण आहे. यापूर्वी जेंव्हा-जेंव्हा इस्रोला आव्हानात्मक जबाबदाऱ्या दिल्या त्या-त्यावेळी या कसोट्यांवर इस्रोनं स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. २०१४ मध्ये भारतानं मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या उपग्रह सोडला. ही कामगिरी करणारा भारत चौथ्या क्रमांकाचा देश ठरला. हे मिशन फक्त ६ कोटी ७० लाख डॉलरमध्ये पूर्ण झालं. पाश्चात्य देशांशी तुलना करता हा खर्च फारच कमी आहे. तर २००९ मध्ये चंद्रयान-१ मिशन पूर्ण केलं. रडारच्या सहाय्यानं चंद्रावरील पाण्याचा शोध घेणारे हे सर्वांत परिपूर्ण मिशन ठरलं आहे.तर २०१७ मध्ये भारतानं एकाच मोहिमेत १०४ उपग्रहांचं प्रक्षेपण करून यापूर्वीचं रशियाचा एकाच वेळी ३७ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम मोडून काढला. अशी अनेक काम आहेत, जी फक्त मानवी बुद्धिमत्ताच करू शकते. भारतीयांना अंतराळात पाठवण्याची भारताची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. ब्रिटेन, फ्रान्स, जापान यासारख्या राष्ट्रांना अजूनही यात यश आलेले नाही. भारताने या मोहिमेत दहा हजार कोटी रुपये गुंतवले आहेत. तेव्हा काय होते, हे बघावं लागेल. अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये जोखीम अधिक असते. मात्र इस्रो जे म्हणते ते बहुतेकवेळा करतेच. ही मोहीम यशस्वी झाली तर भारत अंतराळात मानवाला पाठवणारा चौथा देश ठरेल.

-सुरेश मंत्री. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...